प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’यांचे मंगळवारी (३० मे) रात्री कोलकात्यामध्ये निधन झाले. ‘केके’यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. आज २ जून ‘केके’ च्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. यासंदर्भातली एक पोस्ट शेअर करत केके यांची मुलगी तामारा केकेने एक मेसेज लिहिलाय.

तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तामाराने तिचे वडील केके यांच्या अंत्यसंस्काराचे तपशील शेअर केले. त्यासोबत “लव्ह यू फॉरएव्हर डॅड” असा मेसेज लिहित एक रेड हार्ट इमोजी टाकला आहे. तामाराने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर स्वतःला गायिका, संगीतकार आणि निर्माती म्हटलंय. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे बरेच फोटो आणि व्हिडीओ आहेत. त्यात ती हातात मायक्रोफोन घेऊन स्टुडिओमध्ये गाणी गाताना, म्युझिक तयार करताना दिसत आहे.

केकेची मुलगी तामाराने शेअर केलेली पोस्ट

दरम्यान, ‘केके’चं मंगळवारी रात्री कोलकाता येथे आकस्मिक निधन झालं. ‘केके’च्या शवविच्छेदन अहवालात नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगण्यात आले आहे.  

‘केके’ने एएआर रेहमानसोबतच्या ‘कल्लुरी साले’ आणि ‘हॅलो डॉक्टर’ या गाण्यांच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने गुलझार यांच्या माचिस चित्रपटामधील ‘छोड आऐ हम वो गलीया’ गाणं गायला. त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही. पण ‘केके’ ला खरी ओळख ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातून मिळाली. त्यात त्याने ‘तडप तडप के इस दिल से’ हे गाणे गायले होते. ‘केके’ याचा जन्म २३ ऑगस्ट १९६८ रोजी दिल्लीत झाला होता. ‘केके’ यांनी हिंदी व्यतिरिक्त तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली आणि गुजराती चित्रपटांमध्ये गाणी गायली होती.