प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास कोलकाता येथे आकस्मिक निधन झालं. या प्रकरणामध्ये आता कोलकाता पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केल्याने चर्चांना तोंड फुटलं आहे. न्यू मार्केट पोलीस स्थानकामध्ये केकेचा मृत्यू हा अनैसर्गिक कारणामुळे झाल्याची नोंद पोलिसांनी केलीय. आज केकेच्या पार्थिवाचं शवविच्छेदन केलं जाणार आहे. केकेचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र आता पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केल्याने या प्रकरणासंदर्भातील तपास होण्याचीही शक्यता व्यक्त केली जातेय.

नक्की पाहा >> Video: ‘हम रहें या न रहें कल…’ ठरलं ‘केके’चं शेवटचं गाणं; कॉन्सर्टमधील शेवटचे काही क्षण झाले Viral

३१ मे रोजी केके कॉन्सर्टवरुन परत आल्यानंतर ग्रॅण्ड हॉटेल येथे कोसळला. हे हॉटेल मार्केट पोलीस स्थानकाच्या हद्दीत येतं. केकेला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. तिथे त्याला मृत घोषित केलं गेलं. तो ५४ वर्षांचा होता. केके कोलकात्यामधील गुरुदास कॉलेजमधील नाझरुल मंचच्या कार्यक्रमामध्ये गात असतानच त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तो त्याच्या हॉटेल रुममध्ये परतला होता. तिथेच तो कोसळला आणि त्याला ततडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.  त्याला कोलकात्यामधील सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला ब्रॉट डेड म्हणजेच रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, असं घोषित केलं. 

नक्की वाचा >> मृत्यूच्या काही वेळ आधीच ‘केके’ने Instagram वरुन पोस्ट केलेले दोन फोटो; कॅप्शनमध्ये म्हणाला होता, “आज रात्री…”

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांच्या सुत्रांनी केकेच्या चेहऱ्यावर आणि डोक्याजवळ जखमांचे निशाण दिसून आले आहेत. आज कोलकात्यामधील सएसएकेएम रुग्णालयामध्ये केकेच्या पार्थिवाचं शवविच्छेदन केलं जाणार आहे. पोलीस ग्रॅण्ड हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहणार आहेत. तसेच ते या हॉटेलमधील कर्मचारी आणि कार्यक्रमाच्या आयोजकांचीही चौकशी करणार आहेत.

नक्की वाचा >> विश्लेषण : ‘नव्वद’ची पिढी नि ‘केके’चे गारूड… काय होते हे समीकरण?

केकेने एएआर रेहमानसोबतच्या ‘कल्लुरी साले’ आणि ‘हॅलो डॉक्टर’ या गाण्यांच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने गुलझार यांच्या माचिस चित्रपटामधील ‘छोड आऐ हम वो गलीया’ गाणं गायला. त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही. हम दिल दे चुके सनममधील ‘तडप तडप के..’ गाणंही त्याचंच आहे.