तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं! असं काही काही जणांचं नशीब असतं. पण सगळेच कलाकार इतके नशीबवान नसतात. अनेक कलाकार असे आहेत ज्यांना त्यांची कारकीर्द घडवण्यासाठी झटावं लागतं, कष्ट उपसावे लागतात. मूर्तीकार जसा दगडाला आकार देऊन मूर्ती घडवतो अगदी तसंच स्वतःला घडवावं लागतं त्यावेळी लोक ओळखू लागतात. असाच एक उमदा कलाकार आहे ज्याचं नाव आहे पंकज त्रिपाठी. तुम्हाला जर रन नावाचा एक सिनेमा येऊन गेला होता तो आठवत असेल तर त्यातला एक जबरदस्त कॉमेडी सीन आहे. विजयराज हा कलाकार एके ठिकाणी बिर्याणी खातो. तो एकाला प्रश्न विचारतो ‘अरे मै हिचकी ले रहाँ हूँ तब कौए की आवाज क्यूँ आ रही है?’ त्यावर तो माणूस विचारतो क्या खाये थे? विजयराज म्हणतो ‘चिकन बिर्यानी..’ त्यावर तो माणूस हसू लागतो म्हणतो ‘अरे वो कौआ बिर्यानी था. जब कौआ बिर्यानी खाओगे तो वैसेही आवाज आएगी.’ विजयराजबरोबर हा सीन करणारा कलाकार होता पंकज त्रिपाठी. २००४ मध्ये आलेल्या ‘रन’ नावाच्या सिनेमातल्या या एक्स्ट्राच्या भूमिकेपासून ते मागच्या महिन्यात आलेल्या ‘ओ माय गॉड-२’ सिनेमातल्या मुख्य भूमिकेपर्यंतचा पंकज त्रिपाठीचा प्रवास थक्क करणारा आहे.
बिहारमधल्या शेतकरी कुटुंबात पंकज त्रिपाठींचा जन्म
पंकज त्रिपाठी यांचा जन्म २८ सप्टेंबर १९७६ ला बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातल्या बेलसँड गावात झाला. हिंदू ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या पंकज त्रिपाठींच्या घरातला मुख्य व्यवसाय शेती आणि पौरोहित्य होता. त्यांचे वडील या दोन्ही गोष्टी करत असत. पंकज त्रिपाठी हे कुटुंबातल्या त्यांच्या भावंडांपैकी चौथे भाऊ. ते देखील वडिलांना शेती करण्यात मदत करत. होखेवाला नाटक ज्याला म्हणतात त्यात त्यांनी एका मुलीची भूमिका केली होती. त्यांच्या भूमिकेचं सगळ्यांनीच कौतुक केलं. त्यावेळी त्यांना वाटलं की आपण अभिनयात करिअर केलं पाहिजे. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. तसंच महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ते महाविद्यालयाच्या राजकारणातही सक्रिय होते. तसंच आपलं अभिनयात काही जमलं नाही तर काय? या भीतीने त्यांनी मौर्य हॉटेलमध्ये शेफ म्हणूनही काम केलं. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलेला किस्सा आहे. पंकज त्रिपाठी १२ वर्षांचे होते. त्यांच्या बहिणीचं लग्न झालं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी एक ज्योतिषी आले होते. त्यांनी पंकज त्रिपाठींना भविष्य सांगितलं होतं की तू परदेशवारी करणार.
ज्योतिष्याने पंकज त्रिपाठींबाबत काय सांगितलं होतं?
माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं आणि तिला सासरी पाठवण्यात आलं. त्यावेळी घरातले सगळेच जण रडले होते. मी देखील रडलो होतो. मला आजही एखाद्या मुलीची जेव्हा सासरी पाठवणी करतात तेव्हा रडू येतं. माझं लग्न झालं आणि मी पत्नीला घरी आणत होतो तेव्हाही मला रडू येत होतं. मला वाटलं होतं हे सगळं माझ्यामुळेच घडतं आहे. मी भावनाप्रधान माणूस आहे आजही माझ्या डोळ्यात पाणी येतं. मी तेव्हा ११-१२ वर्षांचा होतो. दुसऱ्या दिवशी घर आम्हाला सगळ्यांनाच सुनं सुनं वाटत होतं. सगळेच घरातले मोठे बसले होते. लग्नासाठी माझे जिजाजी आले होते, त्यांचा हस्तरेखा भविष्यशास्त्राचा अभ्यास झाला होता. त्यांनी अगदी सहज माझा हात पाहिला. त्यावेळी ते म्हणाले की अरे याच्या नशिबात परदेशवारी आहे. त्यावर घरातले म्हणू लागले अरे परदेशवारी? तेव्हा आमच्या घरातले एक सदस्य म्हणाले हा नेपाळला जाईल. नेपाळ माझ्या घरापासून ५० किमी अंतरावर आहे. आम्ही त्याला परदेश मानतही नाही. त्यावर जिजाजी म्हणाले नेपाळ नाही हो हा अनेकदा परदेशवाऱ्या करेल. कारण पूर्वांचलमध्ये जे लोक राहतात त्यांच्यासाठी नेपाळ वेगळा देश नाहीच. लोक त्यावेळी आपसांत बोलू लागले. त्यानंतर चर्चेअंती या निष्कर्षावर पोहचले की हा बहुदा एअर इंडियाच्या मेन्टेनन्स स्टाफमध्ये नोकरीला लागेल.मला तिथेही पायलट होईल असं म्हटलं नाही. टेक्निकल स्टाफमध्ये असेल नट-बोल्ट फिरवेल, युरोपात वगैरे याची पोस्टिंग होईल. मी हे सगळं बोलणं ऐकत होतो. त्यानंतर अनेक दिवस माझा विश्वास बसला होता की मी एअर इंडियाच्या मॅकेनिकल आणि टेक्निकल स्टाफमध्ये असेन आणि तेच काम करेन. पण नियतीला वेगळ्याच गोष्टी मंजूर होत्या. हा सगळा प्रसंग मी एका आगामी सिनेमात घेतला आहे. असंही पंकज त्रिपाठींनी या मुलाखतीत सांगितलं होतं. भविष्य, जन्मपत्रिका, हस्तरेखा याबाबत मला फारशी माहिती नाही. मात्र मी त्यावर अविश्वास दाखवत नाही असंही पंकज त्रिपाठींनी सांगितलं होतं.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामानंतर गाठली मुंबई
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातून डिग्री घेतल्यानंतर पंकज त्रिपाठी मुंबईत आले. त्यावेळी त्यांना टाटा टी ची जाहिरात मिळाली ज्यामध्ये त्यांनी नेत्याची भूमिका केली. त्यानंतर २००२ मध्ये आलेला ‘रन’ हा त्यांचा पहिला सिनेमा ठरला. या सिनेमात अभिषेक बच्चन, भूमिका चावला, विजयराज यांच्या भूमिका होत्या. त्यानंतर ‘बंटी और बबली’, ‘ओमकारा’, ‘मिथ्या’, ‘शौर्य’, ‘अग्निपथ’ अशा चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. मात्र त्यांच्या करिअरला कलाटणी दिली ती अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘गँग्ज ऑफ वासेपूर’मधल्या सुलतानच्या भूमिकेने. याचवेळी पंकज त्रिपाठी एका सीरियलमध्येही काम करत होते. मात्र त्या सीरियल्समधून वेळ काढत त्यांनी ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ केला आणि त्यांनी साकारलेला सुलतान अजरामर ठरला.
सुलतानच्या भूमिकेने प्रसिद्धी दिली
सुलतान साकारण्याआधी पंकज त्रिपाठी यांची स्क्रिन टेस्ट घेण्यात आली होती. अनुरागने पंकजची पावडर ही सीरियल पाहिली होती. त्यातला पंकज त्रिपाठीचा रोल त्याला आवडला म्हणून त्याने सुलतानची भूमिका पंकज त्रिपाठीला दिली आणि ती भूमिका पंकज त्रिपाठी अक्षरशः जगला आहे. क्रूर आणि खुनशी सुलतान आणि बैल कापणारा कसाई पंकजने जिवंत केला. याच सिनेमाने थंड डोक्याचा आणि खुनशी डोळ्यांचा व्हिलन सिनेमा इंडस्ट्रीला मिळाला. त्यातला आपल्या काकाच्या मागे बूट घेऊन सुलतान जे काही धावला आहे तो फक्त पंकज त्रिपाठीच करु शकतो. या सिनेमाच्या निमित्ताने पंकज त्रिपाठींचं एक स्वप्न पूर्ण झालं ते होतं मनोज वाजपेयींसह काम करण्याचं. मनोज वाजपेयी यांना पंकज त्रिपाठी आदर्श मानतात.
मौर्य हॉटेलमधला तो किस्सा
मनोज वाजपेयींनी सांगितलं, ‘गँग्ज ऑफ वासेपूर’चं शुटिंग सुरु होतं, त्यावेळी एकदा पंकज मला म्हणाला म्हणाला, तुम्हाला माहित आहे का तुमची एक चप्पल चोरीला गेली होती. त्यावर मनोज म्हणाला कधी? तर पंकज म्हणाला तुम्ही मौर्य हॉटेलमध्ये थांबला होतात ‘शूल’ सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी तेव्हा. हो बरोबर..असं मनोज म्हणाल्यावर पंकज म्हणाला त्या चपला मी घेऊन गेलो होतो. हा किस्सा मनोज वाजपेयींनी सांगितला आणि त्यापुढचा किस्सा पंकज त्रिपाठींनी सांगितला. मी मौर्य हॉटेलमध्ये किचन सुपरवायजर म्हणून काम करत होतो. त्यावेळी मला कळलं की मनोज वाजपेयी आले आहेत. तेव्हा मी सांगितलं होतं मनोज वाजपेयींकडून कुठलीही ऑर्डर आली तर मला सांगा. कारण आम्ही नाटकात काम करणारे सगळेच लोक मनोज वाजपेयींना आदर्श मानत होतो. त्यावेळी मनोज वाजपेयींच्या रुममधून एक सूप हवंय आणि सफरचंद हवेत अशी ऑर्डर आली. ती ऑर्डर मी स्वतः तयार केली होती. मी एका वेटरमार्फत मनोज वाजपेयींना निरोप पाठवला की मला त्यांना भेटायचं आहे. मनोज वाजपेयींना भेटलो नमस्कार केला आणि निघालो. दुसऱ्या दिवशी मनोज वाजपेयी हॉटेलमधून एअरपोर्टला गेले. त्यानंतर हाऊसकिपिंगने मला सांगितलं मनोज वाजपेयी एक हवाई चप्पल विसरले आहेत. मी त्याला सांगितलं बाबा रे ती चप्पल जमा करु नकोस ती मला दे. का? एकलव्याप्रमाणे मी त्यांची चप्पल जर घातली तर कदाचित.. मलाही थोडाफार अभिनय येईल असं मला वाटलं. हे सांगताना पंकज त्रिपाठींचे डोळे भरुन आले होते. पंकज त्रिपाठीने व्हिलन जितक्या ताकदीने साकारला तितक्याच ताकदीने विनोदी भूमिकाही केल्या. ‘न्यूटन’, ‘फुकरे रिटर्न्स’, ‘स्त्री’, ‘मिमी’, ‘ल्यूडो’ अशा विविध सिनेमांमधून आपल्या अभिनयाची चुणूक पंकज त्रिपाठीने दाखवून दिली.
सेक्रेड गेम्समधला ‘गुरुजी’ आणि मिर्झापूरचा ‘कालीन भय्या’
पंकज त्रिपाठी एकीकडे सिनेमांमधून विविध भूमिका साकारत होताच. पण त्याची जादू चालली ती ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘मिर्झापूर’ या दोन वेबसीरिजमधून. सेक्रेड गेम्समधला पंकजने साकारलेला गुरुजी हा थेट ८० च्या दशकातल्या ओशोंची आठवण करुन देणारा ठरला. दोन्ही पात्रांचा तसा थेट काहीही संबंध नव्हता. मात्र त्याचं अहम ब्रह्मास्मी म्हणणं, आपलं म्हणणं पटवून देण्यासाठीची शैली.. शांत आणि निश्चल तसंच सात्विक चेहऱ्याआड लपलेला खरा चेहरा हे सगळं सगळं पंकज त्रिपाठीने लिलया साधलं. स्वतःला देव मानू लागलेल्या गणेश गायतोंडेला गुरुजी ज्या प्रकारे कंट्रोल करतात आणि त्याचा जो काही ब्रेनवॉश करतात ते सगळं अनुभवणं म्हणजे अस्सल पर्वणी. सेक्रेड गेम्समधला इतका जबरदस्त रोल साकारल्यानंतर पंकजने आपली वेगळी छटा दाखवली ती कालीन भय्याच्या रुपाने. अहम ब्रम्हास्मी म्हणताना, त्रिपाठीशी संवाद साधत असताना, गणेश गायतोंडेशी फोनवर आणि प्रत्यक्ष संवाद साधत असताना, आश्रमात सगळ्यांना ज्ञानाचे डोस पाजत असतानाचे जे काही हावभाव पंकज त्रिपाठीने चेहऱ्यावर आणले आहेत त्याला तोड नाही.
मिर्झापूर या वेबसीरिजमधला अखंडानंद त्रिपाठी अर्थात ‘कालीन भय्या’ ही भूमिका तर पंकज त्रिपाठी सोडून इतर कुणी करुच शकणार नाही असं वाटतं. त्याचा वावर, खून करण्याचा आदेश देत असतानाही चेहऱ्यावरचा थंडपणा. राजकारणात मुरलेला राजकारणी हे सगळं त्याने लिलया साकारलं आहे यात काहीच शंका नाही.
पंकज त्रिपाठी हा मातीतून आलेला कलाकार आहे आणि त्या कलाकाराने आपल्या सिनेमा करिअरचा ग्राफ उंचावत ठेवला असला तरीही त्याचे पाय अजूनही जमिनीवर कायम आहेत. आगामी काळात त्याचा मै अटल हूँ हा सिनेमा येतो आहे. त्यात तो अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत दिसणार आहे. पंकज त्रिपाठीचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तो कुठल्याही साच्यात अडकलेला कलाकार नाही. तो प्रत्येक भूमिकेत त्याचं वेगळेपण राखून आहे आणि तिथे आपणच कसे लक्षात राहू याची काळजीही तो पूर्णपणे घेत असतो. त्याच्या या वेगळेपणाला सॅल्यूट!