दिलीप ठाकूर
क्षणभर संभ्रमात पडला असाल ना की, मुंबई-कोल्हापूर विमानसेवेचा प्रारंभ आणि चित्रपटसृष्टी यांचा असा काय बरे संबंध आहे? तो तसा आहे म्हणूनच तर त्यावर ‘फोकस’ टाकायचाय. कोल्हापूर हे मराठी चित्रपटाच्या इतिहासातील खूपच महत्वपूर्ण ठिकाण आहे हे तर तुम्हाला नक्कीच माहित्येय? तेथे जयप्रभा स्टुडिओ व शांतकिरण स्टुडिओ होते. कोल्हापूर परिसरात १९२० सालापासून म्हणजेच मूकपटापासून अनेक वर्षे मराठी चित्रपटांची निर्मिती झालीय, अगदी काही हिंदी चित्रपटांचेही चित्रीकरण झालेय. काही कारणास्तव हे स्टुडिओ बंद झाले. पण कोल्हापूर शहर, पन्हाळा वगैरे ठिकाणी आजही चित्रीकरण होते. ‘नटरंग’, ‘पैजेचा विडा’ तेथेच चित्रीत झाले. कोल्हापूरच्या वातावरणात चित्रपट  देखील मुरलाय हे जाणवते. अगदी तेथील चित्रपटगृहांचीही खूप संख्या आहे. मल्टिप्लेक्सही आलीत. पूर्वी मराठी चित्रपटांचे प्रीमियर देखील येथे होत. आणि एक गंमत माहित्येय? सत्तर-ऐंशीच्या दशकात सकाळीच कोल्हापूरात महालक्ष्मी एक्सप्रेसने दाखल झालेल्या सिनेमावाल्याला रिक्षावाल्याने ओळखताच त्याला तो सवयीने लक्ष्मी पुरीतील अवंती हॉटेलमध्ये घेऊन जाई. हे हॉटेल व मराठी चित्रपटसृष्टी यांचे नाते अगदी घट्ट होते. ‘मुंबईचा फौजदार’मधील काही प्रसंग येथेच चित्रीत झालेत.

पण कोल्हापूरला जाणे-येणे तेव्हा खूपच लांब वाटे. ट्रेन वा रस्त्याने रात्रभरचा दहा तासाचा प्रवास. आता एक्स्प्रेस वेने तो थोडा जलद होतोय. पण त्या काळात मराठीतील स्टार्सकडे स्वतःची गाडी नसे. त्याचे त्याला वैषम्यदेखिल वाटत नव्हते. कारण त्या काळात कलेशी बांधिलकी खूपच मोठी व प्रामाणिक होती. मोठे स्टार महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या सेकंड क्लासने प्रवास करीत. कारण माणूस म्हणून वागणे त्यांच्या स्वभावात होते. पण एवढ्यावरच ही गोष्ट संपत नाही. ‘पांडू हवालदार’च्या खणखणीत यशानंतर सखाराम हवालदारच्या भूमिकेतील अशोक सराफ प्रचंड लोकप्रिय झाला असतानाच असाच महालक्ष्मी एक्सप्रेसच्या सेकंड क्लासने कोल्हापूरला जात असताना नेमक्या त्याच्याच बर्थसमोर खरेखुरे हवालदार होते. सुरुवातीस त्यांना ‘हा अशोक सराफच आहे’ हे खरेच वाटेना. तो या डब्यात कसा बरे असेल हा त्यांचा भाबडा प्रश्न. पण ‘हा तर खरोखरचा अशोक सराफ आहे’ हे पटताच त्यांनी काही शेरेबाजी सुरु करताच अशोक सराफने डोक्यावर चादर घेऊन पाठ करून झोपणे पसंद केले आणि कोल्हापूर आल्यावरच तो उठला. आजही अशोक सराफ हा अनुभव विसरलेला नाही. तर कधी याच प्रवासाची तिकिटे कन्फर्म नसत. मग काय करणार? एकदा एक आघाडीची अभिनेत्री व एक नाटकात बिझी असलेला अभिनेता असे दोघे तिकीट कन्फर्म होईल या आशेने कोल्हापूरला ट्रेनमध्ये चढले पण टीसी खमक्या होत्या. त्याने त्या दोघांनाही मिरजला उतरवले. काय करणार बिचारे? एका खाजगी गाडीने प्रवास केला. त्या काळात तीदेखील सहजी मिळत नसे. काही कलाकार खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसने प्रवास करीत. मोहन जोशी हमखास बर्थ असणाऱ्या बसचेच तिकीट काढत (त्याही कमीच असत)  आणि गाडीत शिरताच डाव्या बाजूचा पहिलाच बर्थ ते पसंत करीत. रमेश देव (ते मूळचे कोल्हापूरचे), अलका आठल्ये, किशोरी शहाणे यांच्यापासून आशुतोष गोवारीकरपर्यंत (तोही कोल्हापुरचा) अनेक जण या प्रवासातील चाहत्यांपासून घरचा डबा घेऊन जाण्यापर्यंत (या ट्रेनला खानपानसेवा नाही) अनेक आठवणी सांगतील. कोल्हापुरातील चंद्रकांत, सूर्यकांत, राजशेखर असे अनेक कलाकार मुंबईत शूटिंग, प्रीमियर अथवा राज्य शासनाच्या चित्रपट महोत्सवासाठी येत. त्यांनाही प्रवासाची दगदग व अनेक अनुभव. कालांतराने नंतरच्या पिढीतील स्टार्सना कोल्हापुरातील इव्हेंट्स, उदघाटने,  शॉपची रिबिन कापणे याची आमंत्रणे फारच वाढली. या पिढीत स्वतःची गाडी असणारे स्टार खूप. अथवा आयोजक गाडीची व्यवस्था करतात. ही व्यवहारी पिढी आहे. कोल्हापुरात एव्हाना प्रशस्त हॉटेल्सही वाढलीत. त्यामुळेच आपण कोणत्या हॉटेलमध्ये उतरु हे स्टारच सांगतात. पण ते काही असले, तरी गाडीचा वेग वाढवला तरी मुंबई-कोल्हापूर सात तास हवेतच. तेवढेच यायला हवेत. त्यापेक्षा विमानाने तासाभरात जाता येईल. त्याच्या वेळेनुसार इव्हेंट्स वा सुपारीची (स्पाचे उदघाटन वगैरे)  वेळ ठरवता येईल. कोल्हापूर परिसरात मराठी मालिकांची शूटिंग सुरु आहेत,  आता चित्रपटांचीही पुन्हा सुरु व्हावीत किंवा होतील. मध्यंतरी त्यातीलच काही कलाकारांना मुंबईत एका मराठी वाहिनीच्या ग्लॅमरस पार्टीला यायचे होते. तेवढ्यासाठीच तेथे एका प्रशस्त गाडीने प्रवास करत आले तरी खूपच लांबचा प्रवास असल्यानेच ते कंटाळलेले दिसले. गंमत म्हणजे मुंबई विमानतळाच्या जवळच्याच हॉटेलमध्ये ही पार्टी पहाटेपर्यंत रंगली. तेव्हा सकाळचे पहिले विमान पकडून ते कोल्हापूरला जावून सेटवर हजर राहू शकले असते. मनोरंजन क्षेत्रातील अनेक गोष्टी वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असतात हे प्रकर्षाने जाणवते.   चित्रपट क्षेत्रात प्रवासाचा वेळ व दगदग वाचवणे अत्यावश्यक झालेय. त्याचा अभिनयावर काही परिणाम होतो की नाही हे सांगता येणार नाही. पण  तब्येतीवर नक्कीच होतो. मध्यंतरी एका मराठी स्टारने विमानतळ असणाऱ्याच शहरात आपण चित्रपटाच्या प्रमोशनला येऊ असे स्पष्ट सांगितले. विमानसेवेमुळे आता कोल्हापुरात मराठी चित्रपटाचे प्रमोशन वाढायला मदतच होईल. मागील दोन तीन पिढ्यातील कलाकार आज नक्कीच म्हणतील,  पूर्वी कोल्हापुरला शूटिंगला/ प्रीमियरला जायचे म्हणजे खूपच अगोदर तारखा द्याव्या लागत व ट्रेन की बस याचा निर्णय घ्यावा लागे. पण एकदा गेलो की, महालक्ष्मी मंदिरात पहिले जाणार. आताही सुखावह विमान वाहतूकीने आजचे स्टार सर्वप्रथम महालक्ष्मी मंदिरातच जातील हे निश्चित. बऱ्याच काळापासून रखडलेली ही विमानसेवा अखंडित सुरू राहून मनोरंजन क्षेत्रालादेखील याचा फायदा मिळावा हीच सदिच्छा.