‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळते आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून ‘कोण होणार करोडपती’ला चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर करत आहेत. हॉटसीटवर आलेल्या प्रत्येकाशी आपुलकीने बोलून त्यांना मानसिक पाठबळ देत आहेत. ‘कोण होणार करोडपती’मध्ये आठवड्यातून एक दिवस ‘कर्मवीर विशेष’ भाग असतो. येत्या कर्मवीर भागात देशाचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती देणारे मेजर कौस्तुभ राणे यांची पत्नी लेफ्टनंट कनिका राणे सहभागी होणार आहेत.

मेजर कौस्तुभ राणे यांचे देशसेवेचं व्रत पुढे नेण्यासाठी त्यांच्या पत्नी लेफ्टनंट कनिका राणे या स्वतः सैन्यात भरती झाल्या. नोव्हेंबर २०२० मध्ये कनिका आर्मीमध्ये रुजू झाल्या. आता कनिका यांना कौस्तुभ यांची स्वप्नं पूर्ण करायची आहेत आणि अनेक वीरपत्नींसाठी काम करायचं आहे. ‘कोण होणार करोडपती’ या शोमधील कर्मवीर विशेषमध्ये बॅटल कॅज्युअल वेल्फेअर फंड या संस्थेसाठी त्या खेळायला येणार आहेत. या मंचावर जिंकलेल्या पैशातून लेफ्टनंट कनिका राणे आणि सोनाली कुलकर्णी या संस्थेला मदत करणार आहेत.

या खेळात त्यांना साथ देणार आहेत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. अनेक हिंदी-मराठी चित्रपटांतून प्रेक्षकांनी सोनालीला पाहिलेलं आहे. सोनाली आणि लेफ्टनंट कनिका मिळून हा खेळ खेळणार आहेत. कनिका यांनी मंचावर कौस्तुभ यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय कसा घेतला, हेही सांगितलं. या वेळी कनिका यांनी आपल्या कोटला एक पिन लावली होती, सचिन खेडेकरांनी त्याबद्दल विचारल्यावर ‘ती मेजर कौस्तुभ यांची असून त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ती लावली असल्याचं’ त्यांनी सांगितलं.