Kadambari Kadam Talks About Hindi Serial : कलाकार मंडळींना मिळणाऱ्या प्रसिद्धी, लोकप्रियतेमागे त्यांची खूप मेहनत, कष्ट, अनेक आव्हानं असतात, ज्यांचा सामना करीत ते इथपर्यंत पोहोचलेले असतात. त्यात काम मिळाल्यानंतरही सगळं सुरळीतच सुरू राहील याची शाश्वती या क्षेत्रात नसते. त्यामुळे मनोरंजन विश्वात काम करणं सोपं नाही, असं अनेक जण म्हणताना दिसतात. अशातच लोकप्रिय अभिनेत्री कादंबरी कदम हिनेसुद्धा तिच्या आयुष्यातील एक खडतर प्रसंग सांगितला आहे.
‘चारचौघी’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘तुजविन सख्या रे’ यांसारख्या कलाकृतींसाठी ओळखली जाते. सध्या ती तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. येत्या १ जानेवारीला हा चित्रपट सिनेमागृहांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कादंबरी यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. अशातच त्यानिमित्त तिने ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली आहे.
कादंबरीला मुलाखतीत सुरुवातीच्या काळात आपण आपल्या वाट्याला ज्या गोष्टी येतात, त्यातून शिकत असतो. एक अभिनेत्री म्हणून तुला उत्तम घडवणारी मालिका कोणती होती? असं विचारल्यानतंर ती म्हणाली, “एक कटू सत्य सांगते. सगळ्याच कलाकृतींमधून आपण काही ना काही शिकत असतो. मी एका हिंदी मालिकेत काम करीत होते आता मी त्या मालिकेचं नाव नाही सांगू शकत. एका नावाजलेल्या हिंदी चॅनेलवरची ती मालिका होती, ज्याचं शूटिंग सुरू होतं. मोठ्या निर्मात्यांची मालिका होती; पण मानधनच येईना. म्हणजे मालिका सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांनी मानधन सुरू होतं. तीन महिन्यांनंतर तुमचा पहिला चेक येतो. कधी कधी चार महिन्यांनीही पहिला चेक येतो.”
कादंबरी कदमने सांगितला ‘तो’ अनुभव
कादंबरी याबद्दल पुढे म्हणाली, “माझ्या लक्षात आलं की, चार महिने गेले, पाच महिने गेले, सहा महिने गेले. आपण रोज शूटिंगला जातोय, पेट्रोल भरतोय, बाकीच्या गोष्टींसाठी पैसे जातायत. आपण सेटवर १७-२० तास काम करतोय आणि पैसेच येत नाहीयेत. ती माझ्यासाठी खूप तणवपूर्ण परिस्थिती होती. हे असे अनुभव कामाच्या तणावापेक्षाही जास्त भयंकर असतात. माझ्यासाठी अर्थार्जनाचं माध्यम हेच आहे. त्या काळी मला रात्री झोपच नाही यायची. मी माझ्याच कष्टाचे पैसे कसे मिळवू हा विचार करायचे.”
कादंबरी पुढे म्हणाली, “हा अनुभव या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला येतो. पण देवाच्या कृपेनं ती मालिका संपली. मला कळत नव्हतं की, ही मालिका सुरू ठेवायची की सोडायची. सोडली तर पैसे मिळणारच नाहीत. त्यांनी फार ठरावीक म्हणजे खूपच कमी रक्कम मला दिली आणि तुम्हाला पूर्ण पैसे मिळालेत अशा करारावर सही करायला सांगितली. अशी ती एक मालिका मी जवळजवळ १० महिने केली आणि तो अनुभव खूपच तणावपूर्वक होता.”
