Krutika Deo shared her experience working with Ranbir Kapoor & Madhuri Dixit : कृतिका देव मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत नाटक, चित्रपट, सीरिज अशा विविध माध्यमांमध्ये काम केलं आहे. सध्या ती ‘स्टार प्रवाह’वरील ‘लपंडाव’ या मालिकेत काम करत आहे. ही तिची पहिलीच मालिका आहे. पण, कृतिकाने आतापर्यंत हिंदी व मराठीत अनेक लोकप्रिय कलाकारांसह काम केलं आहे. अशातच आता तिने माधुरी दीक्षित व रणबीर कपूर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
कृतिका देवने आतापर्यंत विविध भूमिका साकारत तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिने माधुरी दीक्षितच्या ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटात काम केलं होतं. यामध्ये तिने रिया हे पात्र साकारलेलं. महत्त्वाचं म्हणजे माधुरी दीक्षितचा हा पहिलाच मराठी चित्रपट होता आणि यामध्ये बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर पाहूणा कलाकार म्हणून झळकलेला. कृतिका रणबीर कपूरची खूप मोठी चाहती असून तिने या चित्रपटाच्या सेटवरचा एक किस्सा ‘दुरदर्शन सह्याद्री’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे.
चित्रपटासाठी बदलली लग्नाची तारीख
या मुलाखतीत कृतिकाने या चित्रपटासाठी तिला त्यांच्या लग्नाची तारीख बदलावी लागली असं म्हटलं आहे. कृतिका व अभिषेक देशमुख आधी १२ जानेवारी २०१८मध्ये लग्न करणार होते. परंतु, या चित्रपटाच्या शूटिंगमुळे त्यांना लग्नाची तारीख बदलून ६ जानेवारी करावी लागली आणि लग्नाच्या दिवशी चित्रपटाच्या शूटिंगमुळे कृतिकाने तिच्या हातावर मेहंदीसुद्धा काढली नसल्याचं तिने यामधून म्हटलं आहे.
कृतिकाने सांगितला माधुरी दीक्षित व रणबीर कपूरबरोबरचा किस्सा
मुलाखतीत कृतिकाला रणबीर कपूरबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, “मी ११वी मध्ये असल्यापासून तो मला आवडतो. तो माझा आवडता अभिनेता आहे. बकेट लिस्टमध्ये तो पाहुणा कलाकार म्हणून होता. तेव्हा आमच्या लग्नाचे किस्से सेटवर सगळ्यांना कळलेच होते. अभिषेकलाही आमचे दिग्दर्शक ओळखत होते. आमचे दिग्दर्शक तेजस देवसकर यांनी अभिषेकला सांगितलं की तू पण ये शूटला रणबीर येणार आहे तुमची भेट होईल. पण, तो म्हणाला नको. उगाच त्याला वेळ मिळेल नाही मिळेल आणि आपण कशाला दुसऱ्याच्या सेटवर जायचं वगैरे. पण, ते म्हणाले येऊ शकतो तू असं काही नाही. मग तो सेटवर आला.”
कृतिका याबद्दल पुढे म्हणाली, “जेव्हा रणबीर कपूर सेटवर आला तेव्हा मला तर कुतूहल होतंच की तो कसा असेल, सेटवर कसा वावरत असेल. हे सगळं मी बघत होते. तेव्हा माधुरी दीक्षित तिथे होत्या आणि आमचा एकत्र सीन सुरू होता. तेव्हा माधुरी दीक्षित त्याला म्हणाल्या तुला माहितीये का हिचं लग्न झालं आहे. त्यावर रणबीर म्हणाला नाही तू मस्करी करतेयस ना? त्यावर मी म्हटलं नाही खरंच लग्न झालं आहे. मग तो म्हणाला कुठे आहे तुझा नवरा बोलव त्याला बोलव. नंतर आम्ही फोटो काढत होतो तेव्हासुद्धा तो तुझ्या नवऱ्याला बोलव असं म्हणत होता. त्यामुळे ही खूप छान आठवण आहे.”
