असे अनेक कलाकार असतात जे त्यांच्या कामाप्रती प्रामाणिक असूनही आणि अनेक कलाकृतींमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करुनही त्यांना पुरेशी ओळख, लोकप्रियता मिळालेली नसते. त्यामुळे बऱ्याचदा असे कलाकार ज्यांच्यामध्ये अनेक कलागुण असूनही ते मागे पडतात. असंच काहीसं झालेलं एका लोकप्रिय गायिकेबरोबर. ज्यांचं लता मंगेशकर यांनीही कौतुक केलं होतं.

भारतरत्न आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजाचे आजही कोट्यवधी चाहते आहेत. त्या आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या सुरेल गाण्यांमुळे त्या चाहत्यांच्या मनात कायम जिवंत असतील. मात्र, लता दीदींना स्वतः कोणत्या गायिकेचा आवाज आवडायचा, हे तुम्हाला माहीत आहे का?

२५ हजारांहून अधिक गाण्यांना दिला आवाज

लता मंगेशकर यांनी अनेकदा त्यांच्याबरोबरच्या गायक-गायिकांच्या गायनाचं कौतुक केलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे प्रसिद्ध पार्श्वगायिका के. एस. चित्रा (पूर्ण नाव – कृष्णन नायर शांताकुमारी चित्रा). त्यांना ‘केरळची बुलबुल’ म्हणूनही ओळखलं जातं. के. एस. चित्रा यांनी त्यांच्या कारकिर्दीत सुमारे २५ हजार गाण्यांना आवाज दिला असून, त्यांच्या नावावर सहा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत.

के. एस. चित्रा यांची एक खास सवय म्हणजे त्या आपल्या कामाकडे अत्यंत श्रद्धा आणि आदराने पाहतात. त्यामुळे कोणत्याही मंचावर सादरीकरण करताना किंवा स्टुडिओमध्ये गाण्याचे रेकॉर्डिंग करताना त्या नेहमी चप्पल बाहेर काढून गाणे गातात. संगीत आणि गायनकलेबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी त्या ही परंपरा आजही जपतात. भारतीय संस्कृतीत संगीतकलेला देवी सरस्वतीचा आशिर्वाद मानला जातो. त्यामुळे अनेक ज्येष्ठ गायक-गायिका संगीतसाधना करताना किंवा गाताना चप्पल काढतात. अशाच गायिकांपैकी एक म्हणजे के. एस. चित्रा. संगीताविषयी असलेला त्यांचा आदर आणि श्रद्धा आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

दिग्गज गायिका लता मंगेशकर यांनीही के. एस. चित्रा यांच्या गायनाचं भरभरून कौतुक केलं होतं. एका मुलाखतीत चित्रा यांनी सांगितलं होतं की, त्यांची आणि लता मंगेशकर यांची पहिली भेट चेन्नईमध्ये झाली होती. त्या भेटीत लता दीदींनी त्यांना, “मी तुझं गाणं ऐकलं आहे,” असं सांगितलं होतं. लता मंगेशकर यांच्याकडून मिळालेली ही दाद के. एस. चित्रा यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय आठवणींपैकी एक बनली.

इतकंच नाही, तर के. एस. चित्रा यांच्या एका महत्त्वाच्या गाण्यानंतर लता मंगेशकर यांनी त्यांना स्वतः फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच त्यांच्या गायनाचं मनापासून कौतुकही केलं होतं. के. एस. चित्रा यांनी मल्याळम, तेलुगू, कन्नड, हिंदी, बंगाली यांसह अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी आतापर्यंत हजारो गाण्यांना आवाज दिला असून आज त्या त्यांचा ६३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या प्रतिष्ठेच्या सन्मानांनी गौरविले आहे.

के एस.चित्रा यांनी आतापर्यंत अनेक लोकप्रिय हिंदी गाणी गायली आहेत. त्यामध्ये ‘कहना ही क्या’, ‘रूप सुहाना लगता है’, ‘ये हसीं वादियां’, ‘पिया बसंती’, ‘रात का नशा’, ‘तुम बिन’. यांसारख्या गाण्यांचा समावेश आहे.