Kunal Kamra vs Manisha Kayande: काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्याप्रकरणी चर्चेत आलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. आधी विधिमंडळ समितीसमोर माफी मागण्यास नकार देणाऱ्या कुणालने आता शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. स्टँड-अप कॉमेडियन्सना कथितपणे धमक्या दिल्याबद्दल आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याबद्दल त्याने एक्सवर पोस्ट लिहीत संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र सरकार मला राज्यात कुठेही शो करू देत नाही, असा मोठा दावा त्याने केला आहे.
कुणाल कामरा नेमकं काय म्हणाला?
कुणाल कामराने मंगळवारी त्याच्या एक्स अकाउंटवर पोस्ट करून मनीषा कायंदे यांना उत्तर दिलं. तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर महाराष्ट्र सरकारने आपल्याला राज्यात एकही स्टँड-अप कॉमेडी शो करू दिलेला नाही, असा दावा कुणालने केलाय. “महाराष्ट्रातील आमदारांना आपल्या घटनात्मक स्वातंत्र्याची व्याख्या नव्याने लिहायची आहे, असं दिसतंय. मला आतापर्यंत अनेक कायदेशीर खटल्यांमध्ये अडकवलं आणि राज्यात मला शो करण्यासाठी एकही जागा मिळू देत नाहीये, इतकं करूनही त्यांचं समाधान झालेलं दिसत नाही,” असं कुणालने लिहिलं.
कुणालने पुढे लिहिलं, “मनीषा कायंदे यांना मला अजून शिक्षा द्यायची आहे, असं दिसतंय. तुमच्या धमक्या मला माझं काम करण्यापासून रोखू शकणार नाहीत. त्यामुळे तुमच्या पक्षाच्या नेत्यांना खूश करण्यासाठी अशा प्रतिक्रिया देणं बंद करा आणि स्वतःचं काम करा, असा मी तुम्हाला सल्ला देतोय.”

मनीषा कायंदे काय म्हणाल्या होत्या?
काही दिवसांपूर्वी प्रणित मोरेच्या शोमधील ‘३७० रुपयांची बिर्याणी’ क्लिपवरून वाद झाला होता. त्याबद्दल मनीषा कायंदे यांनी पीटीआयशी बोलताना स्टँड-अप कॉमेडियन्सवर टीका केली होती. “अशा स्टँड-अप कॉमेडियन्सना चांगलाच धडा शिकवला पाहिजे. ते सर्व मर्यादा ओलांडून कोणाचीही खिल्ली उडवत आहेत. त्यांना जे वाटेल तसं ते बोलतात. अशा प्रकारांविरोधात मी आगामी पावसाळी अधिवेशनात प्रस्ताव मांडणार आहे,” असं मनीषा कायंदे म्हणाल्या होत्या.
यावेळी त्यांनी कुणाल कामराच्या एका व्हायरल पॅरडी गाण्याचा उल्लेखही केला होता. “ते कोणाचीही खिल्ली उडवून पैसे कमावतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ते वाटेल ते बोलतात. महाराष्ट्रात हे खपवून घेतले जाणार नाही,” असं त्यांनी म्हटलं होतं. या महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कॉमेडियन्सना दुसऱ्यांचा अपमान करून आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करू नये, असा सल्ला दिला होता.
एकनाथ शिंदे व कुणाल कामराचा वाद
कुणाल कामराने आपल्या एका शोमध्ये एकनाथ शिंदे यांचं थेट नाव घेतलं नव्हतं. मात्र, यश चोप्रा यांच्या १९९७ मधील ‘दिल तो पागल है’ या गाजलेल्या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकचा वापर करून त्याने महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांवर पक्षाशी गद्दारी केल्याचा टोला लगावला होता. या शो नंतर, शिवसेना कार्यकर्त्यांनी ‘द हॅबिटॅट’ या शोच्या ठिकाणी तोडफोड केली होती आणि कामराला सोडून निघून जावं लागलं होतं.
