Kushboo Sundar Birthday Special: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि राजकीय नेत्या खुशबू सुंदर यांचा आज २९ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. मुस्लीम कुटुंबात ‘नखत खान’ म्हणून जन्माला आलेल्या खुशबू यांनी बालकलाकार म्हणून बॉलिवूडच्या ‘द बर्निंग ट्रेन’ चित्रपटातून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत तब्बल २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. दिग्दर्शक सुंदर सी यांच्याशी विवाह केल्यानंतर त्यांनी हिंदू नाव स्वीकारले. मात्र, खुशबू सुंदर यांच्यावर वडिलांनीच लैंगिक अत्याचार केला होता.
खुशबू सुंदर यांचा जन्म २९ सप्टेंबर १९७० रोजी चेन्नईत नजमा खान यांच्या घरी झाला. खुशबू सुंदर यांचं खर नाव नखत खान आहे. खुशबू सुंदर यांनी बालकलाकार म्हणून ‘द बर्निंग ट्रेन’ सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी अभिनेत्री म्हणून ‘दीवाना मुझ सा नहीं’, ‘बेमिसाल’, ‘लावारिस’, ‘कालिया’, ‘दर्द का रिश्ता’, ‘नसीब’, ‘व ‘जानू’सारखे चित्रपट केले. त्यानंतर खुशबू सुंदर यांनी दाक्षिणात्य चित्रपट केले आणि प्रचंड यश मिळवलं. त्यांनी ‘कलियुग पांडावुलु’ मधून तेलुगू इंडस्ट्रीत पदार्पण केलं. मग त्यांनी जवळपास २०० चित्रपट केले.
खुशबू सुंदर यांनी वडिलांवर केले अत्याचाराचे आरोप
खुशबू सुंदर यांनी २०२३ मध्ये आपल्या वडिलांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. खुशबू यांनी बरखा दत्त यांना दिलेल्या मुलाखतीत या दुर्दैवी घटनेचा खुलासा केला होता. “मला वाटतं जेव्हा एखाद्या मुलावर अत्याचार होतो, तेव्हा त्या घटनेचा आघात मुलावर आयुष्यभर राहतो. हे मुलगा किंवा मुलीबद्दल नाही. माझ्या आईने तिच्या वैवाहिक जीवनात फक्त अपमान आणि मार सहन केला होता. बायकोला मारहाण करणे, मुलांना मारहाण करणे, एकुलत्या एक मुलीवर लैंगिक अत्याचार करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असे मानणारा माणूस माझा पिता होता. माझ्यावर अत्याचार सुरू झाले तेव्हा मी फक्त आठ वर्षांची होते आणि मी १५ वर्षांची असताना त्याच्याविरुद्ध बोलण्याचे धाडस केले होते,” असं खूशबू सुंदर म्हणाल्या होत्या.
खुशबू सुंदर यांची राजकीय कारकीर्द
खुशबू सुंदर गेल्या दीड दशकापासून राजकारणात सक्रिय आहेत. २०१० मध्ये त्यांनी ‘डीएमके’ पक्षात प्रवेश केला होता, मात्र २०१४ मध्ये त्यांनी तो पक्ष सोडला. त्याच वर्षी त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून काम केलं. २०२० मध्ये त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि त्याच वर्षी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. सध्या त्या तमिळनाडू भाजपाच्या उपाध्यक्ष आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या सदस्या आहेत.
