Laal Singh Chaddha Internationational Box Office Collection: आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ला भारतात फारसा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सपशेल आपटला. पण आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर मात्र या चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत २०२२ मधील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाने ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘भूल भुलैया २’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ सारख्या हिट चित्रपटांनाही मागे टाकलं आहे.

‘लाल सिंग चड्ढा’ने प्रदर्शनानंतर पहिल्या आठवड्यात ७.५ मिलियन डॉलर म्हणजेच ५९ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाने ‘गंगूबाई काठियावाडी’ (७.४७ मिलियन डॉलर), ‘भूल भुलैया २’ (५.८८ मिलियन डॉलर) आणि ‘द काश्मीर फाइल्स’ (५.७ मिलियन डॉलर) यांना मागे टाकले आहे. तिन्ही चित्रपट भारतात सुपरहिट ठरले होते. तर, तेलुगू चित्रपट ‘RRR’ ने आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर २० मिलियन डॉलरची कमाई केली होती.
आणखी वाचा-“प्रत्येकाला आपलं मत…” आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ बॉयकॉट करण्यावर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया

‘लाल सिंह चड्ढा’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर ५५ कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी १८० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती आहे. चित्रपटाचं शूट कोरोनाच्या आधी सुरू झालं होतं. पण करोना आणि लॉकडाऊनमध्ये चित्रपट तयार होण्यासाठी जवळपास तीन वर्षे लागली. यादरम्यान अनेकदा चित्रपटाचं शूटिंग थांबवून सुरू करावं लागलं होतं.

आणखी वाचा- Amitabh Bachchan Corona Positive: अमिताभ बच्चन यांना पुन्हा करोनाची लागण, ट्वीट करत बिग बी म्हणाले…

दरम्यान ‘लाल सिंह चड्ढा’ ११ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या सुट्ट्यांचा फायदा चित्रपटाला मिळाला. ‘लाल सिंग चड्ढा’ची जगभरातील कमाई आता १२६ कोटींवर गेली आहे. चीनमध्ये बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला तर चित्रपट आणखी कमाई करू शकतो. पण त्यांना चीनमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते की नाही यावर ते अवलंबून आहे.