Laalo Budget & Box Office Collection : २०२५ मध्ये ‘सैयारा’सारखे अनेक लहान बजेटचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले, तर ‘वॉर २’ सारखे सिनेमे सपशेल आदळले. प्रादेशिक चित्रपटही पॅन इंडिया चित्रपटांना कमाईच्या बाबतीत टक्कर देत आहेत. दीड महिन्यांपूर्वी रिलीज झालेला गुजराती चित्रपट ‘लालो – कृष्ण सदा सहायते’ याचं उत्तम उदाहरण आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.
‘लालो – कृष्ण सदा सहायते’ हा ५० कोटींहून जास्त कमाई करणारा पहिला चित्रपट आहे. अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ चा रेकॉर्ड ‘लालो – कृष्ण सदा सहायते’ मोडेल, अशी शक्यता आहे. १० ऑक्टोबरला रिलीज झालेल्या या सिनेमाची अजूनही क्रेझ आहे. प्रेक्षक हा सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. पहिल्या दिवशी फक्त २० लाख रुपये कमावणाऱ्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ५० दिवस पूर्ण केले आहेत.
गुरुवारी ४९ व्या दिवशी ५० लाखांचे बजेट असलेल्या ‘लालो – कृष्ण सदा सहायते’ ने बॉक्स ऑफिसवर ९३ कोटी रुपयांचा टप्पा गाठला. ‘लालो – कृष्ण सदा सहायते’ हा ९० कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा पहिला गुजराती सिनेमा आहे. यापूर्वी ६ वर्षांआधी आलेल्या ‘चाल जीवी लइये’ सिनेमाने सर्वाधिक ५० कोटी रुपये कमावले होते.
‘पुष्पा २’ चा रेकॉर्ड मोडणार ‘लालो’?
आतापर्यंत गुजरातमध्ये पॅन इंडिया चित्रपटांनी सर्वाधिक कमाई केली होती. यापैकी सर्वाधिक कमाईचा रेकॉर्ड अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ च्या नावावर होता. अर्जुनच्या चित्रपटाने गुजरातमध्ये जवळपास १०० कोटी रुपये कमावले होते.
सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘लालो’ने भारतात आतापर्यंत ९३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे शो फक्त गुजरातमध्येच होते. पण चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता तो हिंदीमध्ये डब करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. पण अद्याप हिंदीत हा चित्रपट उपलब्ध नाही. राज्याबाहेर बऱ्याच ठिकाणी गुजरातीमध्येच ‘लालो’ दाखवण्यात येत आहे. मात्र या सिनेमाने सर्वाधिक कमाई गुजरातमध्येच केली आहे.
येत्या दोन ते तीन दिवसांत गुजरातमध्ये ‘लालो – कृष्ण सदा सहायते’ ची कमाई १०० कोटींचा टप्पा गाठेल, अशी शक्यता आहे. १०० कोटी कमावल्यास ‘लालो – कृष्ण सदा सहायते’ अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ चा रेकॉर्ड मोडेल. ‘लालो – कृष्ण सदा सहायते’ ची बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई ही प्रादेशिक चित्रपटासाठी मोठी गोष्ट आहे.
