बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा वादात सापडली आहे. कंगना रणौतने एका कार्यक्रमादरम्यान १९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य भीक मागून होते, देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले, असे विधान केले आहे. कंगनाच्या या विधानावरुन आता नवा वाद सुरु झाला आहे. विविध राजकीय नेत्यांनी कंगनावर निशाणा साधत टीका केली आहे. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कंगनावर जोरदार टीका केली आहे. इतिहासाच्या ज्ञानाच्या कमतरतेमुळे अशा लाजिरवाण्या चुका होऊ शकतात असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

कंगनाने नुकतीच टाइम्स नाऊच्या एका समिटमध्ये हजेरी लावली होती. यावेळी दिलेल्या मुलाखतीत, “सावरकर, राणी लक्ष्मीबाई, सुभाषचंद्र बोस यांना स्वातंत्र्यासाठी रक्त सांडणार हे माहित होतं. मात्र भारतीयांकडूनच भारतीयांवर वार होणार नाही हे ध्यानात ठेवायला हवं. स्वातंत्र्यासाठी नक्कीच त्यांचं मोलाचं योगदान आहे. मात्र ते स्वातंत्र्य नव्हतं ती भीक होती. जे स्वातंत्र्य मिळालं ते २०१४ सालामध्ये मिळालं” असे वादग्रस्त वक्तव्य कंगनाने केलं आहे.

त्यावर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कंगनावर ट्विटच्या माध्यमातून टीका केली आहे. “इतिहास हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून सर्व विद्यार्थ्यांनी व तरुणांनी त्याचा चांगला अभ्यास केला पाहिजे. इतिहासाच्या ज्ञानाच्या कमतरतेमुळे खाली दिलेल्या सारख्या लाजिरवाण्या चुका आणि गैरसमज होऊ शकतात,” असे म्हणत वर्षा गायकवाड यांनी कंगनाच्या मुलाखतीचा तो व्हिडीओ पोस्ट केला आहे.

कंगनाच्या या वक्तव्यावरुन तिच्यावर सर्वच क्षेत्रातून टीका केली जात आहे. भाजपा खासदार वरुण गांधींनी कंगानाचा व्हिडीओ शेअर करत “या विचारांना वेडेपणा म्हणावा की देशद्रोह असा सवाल उपस्थित केला आहे. “कधी महात्मा गांधींच्या बलिदानाचा आणि तपश्चर्येचा अपमान तर कधी त्यांच्या मारेकऱ्याचा सन्मान आणि आता तर थेट शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा अपमान! या विचारांना मी वेडेपणा म्हणू की देशद्रोह?” असा सवाल उपस्थित करत वरुण गांधींनी कंगानाच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

तर अनुपम खेर यांनीही अप्रत्यक्षपणे कंगनावर निशाणा साधला आहे. “गेल्या हजारो वर्षांपासून काही लोक हे हिंदुत्वाला चांगलं-वाईट म्हणत आहेत. त्याला शिव्या देत आहेत. याला वेगवेगळी नावं देत आहेत. मात्र अशा भटकलेल्या प्राण्यांना एकतर माफ केले पाहिजे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. कारण अशा प्रसंगी हिंदुत्व हे अधिक मजबूत होते, हे त्यांना माहीत नाही. कारण हिंदुत्व हा केवळ धर्म नसून ती एक जीवनपद्धती आहे,” असे अनुपम खेर यांनी म्हटले आहे.