Lady Gaga Welcomes First Baby Michael Polansky Hollywood News: जगप्रसिद्ध पॉप स्टार लेडी गागा आणि तिचा होणारा पती मायकल पोलान्स्की यांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. ४० वर्षांची लेडी गागा अखेर आई झाली असून तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. उत्तर कॅलिफोर्नियामध्ये लेडी गागा आणि मायकल त्यांच्या नवजात बाळाबरोबर अतिशय साध्या अन् कॅज्युअल लूकमध्ये फिरताना दिसले असून त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
पेज सिक्सने दिलेल्या वृत्तानुसार, ४० वर्षांची लेडी गागाला ऑगस्ट महिन्यात उत्तर कॅलिफोर्नियात एका चाहत्याबरोबर फोटो काढतान दिसली होती. त्याआधी मे महिन्यात ती लॉस एंजेलिसमधील एका शॉपिंग सेंटरमध्ये दिसली होती. पेज सिक्सने प्रसारित केलेल्या फोटोंनुसार, लेडी गागा व तिचा जोडीदार दोघेही बाळाला घेऊन फिरताना दिसले. दोघांचाही लूक अतिशय साधा आणि कॅज्युअल होता. तर, लेडी गागाने आपल्या बाळाला प्रेमाने सांभाळताना दिसली.
लेडी गागाने एप्रिल महिन्यात तिची ९ महिन्यात जगभरात ८६ शो असलेली ‘मेहेम बॉल’ ही वर्ल्ड टूर पूर्ण केली होती. दरम्यान, मार्च २०२५ मध्ये ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तिने आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. आई होणं हेच आयुष्यातील अंतिम ध्येय असल्याचं तिने म्हटलं होतं. त्यानंतर एका शोमध्ये तिने मातृत्व ही तिची पुढची मुख्य भूमिका असेल असं सांगितलं होतं.
मायकल पोलान्स्कीसोबतच्या नात्याबद्दल लेडी गागा काय म्हणाली?
लेडी गागा आणि उद्योगपती मायकल पोलान्स्की यांच्या नात्याची चर्चा २०२० च्या सुरुवातीला झाली होती. त्यानंतर जुलै २०२४ मध्ये पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान फ्रान्सच्या मुख्यमंत्र्यांशी बोलताना लेडी गागाने मायकलबरोबर तिचा साखरपुडा झाल्याचं सांगितलं होतं. ‘जोकर: फॉली आ ड्यु’च्या प्रीमिअरदरम्यान लेडी गागाने मायकलचं कौतुक केलं होतं. “माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. तो माझा सर्वात चांगला मित्र आणि पार्टनर आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या सर्वात चांगल्या मित्राबरोबर असता, तेव्हा सगळं काही बदलून जातं,” असं लेडी गागाने म्हटलं होतं.
त्याआधी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिने मायकलबद्दल भावना व्यक्त केल्या होत्या. “मी मायकलसारख्या हुशार आणि प्रेमळ व्यक्तीला आधी कधीच भेटले नव्हते. आमचं आयुष्य खूप वेगळं आहे, पण आम्ही एकमेकांसाठी परफेक्ट आहोत म्हणूनच तो माझ्यासोबत आहे,” असं लेडी गागाने म्हटलं होतं. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत या दोघांनी आपले वैयक्तिक आयुष्य लाइमलाइटपासून दूर ठेवले आहे. सध्या ती मायकल व बाळाबरोबर शांत व निवांत आयुष्य जगतेय.
