‘लागीरं झालं जी’ फेम शितली-आज्या दिसणार एका वेगळ्या अंदाजात

शिवानी बावकर आणि नितीश चव्हाणची जोडी पुन्हा झळकणार

‘सजलं रूप तुझं, रुजलं बीज नवं
उधाण वारं हसतंय
धजलं तुझ्या म्होर, फसलं आता खरं
पाखरागत उडतंय…’

अशा गावरान भाषेत नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सध्या रसिक प्रेक्षकांमध्ये रोमँटिक गाण्यांची क्रेझ जास्त आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ‘लागीरं झालं जी’ फेम शिवानी बावकर आणि नितीश चव्हाण म्हणजेच आपले शीतली आणि आज्या यांची जोडी या गाण्यातून रोमँटिक अंदाजात दिसणार आहेत.

प्रेम ही भावना मनात तरंग उमटवणारी आहे. आयुष्यात प्रत्येकजण एकदा तरी प्रेमातच पडतो. अशा हव्याहव्याशा वाटणाऱ्या एका गुलाबी नात्याचे पदर उलगडणारे आणि प्रेमाच्या जगातील भावनांच्या हिंदोळ्यावर सफर घडवणारे एक प्रेमगीत अभिनेत्री शिवानी बावकर आणि अभिनेता नितीश चव्हाण प्रेक्षकांच्या भेटीस एका आगळ्या वेगळ्या अंदाजात घेऊन येत आहेत. ‘एव्ही प्रॉडक्शन’प्रस्तुत ‘मन उनाड’ या यशस्वी गाण्यानंतर त्यांचे हे नवेकोरे ‘चाहूल’ गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘एव्ही प्रॉडक्शन’सह ‘मराठी म्युझिक टाऊन’ या म्युझिक लेबलने ही या गाण्याला प्रस्तुत केले असून या म्युझिक लेबल अंतर्गत असलेले हे पहिलंवहिलं गाणं आहे.

या गाण्याचं दिग्दर्शन ओंकार मानेनं केलं आहे. ओंकार याआधी ‘बेखबर कशी तू’ या म्युझिक व्हिडिओमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. शिवाय ‘चंद्र झुल्यावर’, ‘तू ये साथीला’ याही गाण्यांच्या दिग्दर्शनाची धुरा ओंकारने सांभाळली. निर्माता विश्वजितचे हे मराठीसृष्टीतील दुसरे गाणे असून याआधी त्याने ‘दिल बुद्धू’ या हिंदी गाण्यातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. आपल्या दमदार आणि सुमधुर आवाजात गायक विजय भाटे याने हे गाणे गायले आहे. तर गाण्याचे बोल राहुल थोरात यांचे असून आशिष आणि विजय यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Lagir jhala ji fame shitali aka shivani baokar in a new song ssv

ताज्या बातम्या