‘शादी का लड्डू खाए तो भी पछताए और ना खाए तो भी पछताए’, अशीच बहुधा सगळ्या माणसांची स्थिती असते. मग ती स्त्री असो वा पुरुष! तरीही माणसं लग्न करतच असतात. आणि त्यानंतर मग सतत जोडीदाराबद्दल कुरबुरी, तक्रारीदेखील करत राहतात. त्यामुळेच साहित्य, नाटक, चित्रपटांतून हा एक चिरंतन चिंतनाचा विषय ठरला आहे. ते वाचून वा पाहून माणसाच्या वर्तनात काही फरक पडतो असंही नाही. उलट पालथ्या घड्यावर पाणी असलाच प्रकार बहुतेकदा होत असतो. अर्थात व्यक्ती तितक्या प्रकृती! तर ते असो. व्यावसायिक रंगभूमीवर या विषयावरचं आणखीन एक नाटक अलीकडेच दाखल झालेलं आहे… ‘लग्नपंचमी’! लेखिका मधुगंधा कुलकर्णी आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी! शिवाय स्वप्नील जोशी आणि पहिल्यांदाच रंगमंचावर पदार्पण करणारी अमृता खानविलकर ही जोडी यात असल्याने उत्सुकता वाढणं स्वाभाविकच! अशी सगळी सणसणीत मंडळी एकत्र आल्याने नाटकाबद्दल कुतूहल न वाढतं तरच नवल. याआधीही लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनी हा विषय हाताळलेला आहेच. त्यामुळे त्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन यावेळी काय असणार आहे, याबद्दल उत्सुकता होती. निपुण धर्माधिकारीही सहसा गंभीर प्रवृत्तीची नाटकं आणि सिनेमा करणारे म्हणून परिचित असल्याने ते इथं वेगळं काय करणार आहेत याबद्दलची उत्सुकता होती. मधुगंधा कुलकर्णी यांनी त्यांच्या नेहमीच्या हसतखेळत विषय मांडण्याच्या पद्धतीनंच हे नाटक रचलं आहे, तर निपुण धर्माधिकारी यांनी आपला ठरीव साचा मोडत त्यातल्या उपहासगर्भ विनोदाला उत्तम न्याय दिला आहे.
नाटकाची सुरुवात होते ती फॅन्टसीच्या अंगानं. यमराज सात्विकचा प्राण न्यायला येतो आणि त्याच्या बायकोच्या- सूर्यजाच्या तावडीत सापडतो. ती त्याला सात्विकचे प्राण घेण्याऐवजी आपले प्राण घ्यावेत अशी कळकळीची विनंती करते. पण यमराज ‘असं काही करता येणार नाही,’ असं निक्षून सांगतो. तर सात्विकही सूर्यजाचे नाही, तर ठरल्याप्रमाणे माझेच प्राण घ्यावेत अशी यमराजाला विनंती करतो. दोघांच्याही ‘तू तू, मैं मैं’मध्ये गोंधळून यम वरच्या श्रेष्ठींना फोन लावतो. आणि त्यांना सहा महिन्यांची मुदत देतो… ‘तुम्ही जर या काळात सुखानं एकत्र संसार करून दाखवलात तर त्यानंतर याबद्दल आपण निर्णय घेऊ,’ असं तो त्या दोघांना सांगतो. तेही याला कबूल होतात.
पण मुळातच त्यांच्यात एवढ्या तेवढ्यावरून इतकी सतत भांडणं होत असतात, की त्यांचं लग्न टिकणं अवघडच असतं. याचं कारण दोघांचे परस्परभिन्न स्वभाव, जगण्याच्या पद्धती आणि टोकाच्या आवडीनिवडी! त्यामुळे त्यांच्यात कायमच भांडणं होत असतात. सात्विक मालिका लेखक असतो. त्याला आपल्या पद्धतीनं मालिका लिहायची असते. पण चॅनलच्या सततच्या हस्तक्षेपानं आणि नको त्या तडजोडीचा आग्रह धरण्याने तो वैतागतो आणि मालिका लिहिण्याचं बंदच करतो. इकडे सूर्यजाही ऑफिसमध्ये तिने जुळवून आणलेला व्यवहार बॉसच्या सांगण्यावरून दुसरीच्याच हातात दिला गेल्याने चिडते आणि राजीनामा देऊन मोकळी होते. दोघांच्याही हातचं काम गेल्याने घर, हप्ते वगैरे कसे मॅनेज करायचे हा यक्षप्रश्न त्यांंच्यापुढे उभा ठाकतो. तशातही त्यांची आपापसातली भांडणं थांबत नाहीत. त्यातच सूर्यजाला सात्विकच्या विशाखा नावाच्या मैत्रिणीशी त्याचं काहीतरी लफडं आहे असा संशय असतो. त्यामुळेही त्यांची भांडणं होत असतात. आता ती इतकी टोकाला जातात, की दोघंही घटस्फोटासाठी सल्ला घ्यायला वकील गाठतात. त्यातही सात्विकची वकिलीण बाई शक्यतो त्या दोघांनी आपापसात जुळवून घेण्याच्या बाजूची असते. तर सूर्यजाचा वकील बृृहस्पती उभयतांचा घटस्फोट घडवून आणण्यासाठी काय काय करता येईल याचाच अतिरेकी सल्ला तिला देतो. दुसरीकडे सात्विकचे आई-वडील त्यांच्यात सगळं सुरळीत होण्यासाठी धडपडत असतात. या सगळ्या गदारोळात शेवटी काय निष्पन्न होतं हे नाटकातच पाहणं उचित.
लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनी लग्नसंस्थेतील खाचाखोचांचं दर्शन या नाटकात घडवायचा प्रयत्न केला आहे. तोही विनोदी उपहासाच्या अवगुंठनात! ठसठशीत पात्रं, त्यांचे स्पष्ट, ठाशीव व्यवहार, त्यातून उभे राहणारे मतभेद आणि मग निष्पन्न होणारी भांडणं यांचा धमाल ऊहापोह त्यांनी नाटकात केला आहे. टिपिकल पात्रांपेक्षा काहीशी वेगळा व्यवहार आणि वर्तन करणारी पात्रं हे या नाटकाचं वैशिष्ट्य ठरावं. त्यामुळे एकुणात लग्नाची तीच ती गोष्ट पाहत असतानाही आपण त्यात गुंग होऊन जातो. आपल्याला अजिबातच कंटाळा येत नाही. म्हटलं तर ही पात्रं प्रेडिक्टेबलच आहेत. तरीही ती आपल्याला धरून ठेवतात. याचं कारण त्यांच्याबद्दलचा लेखिकेचा वेगळा, पठडीबाज नसलेला दृष्टिकोन! दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनीही नाटकाची जातकुळी ओळखून त्यानुसार ते बसवलं आहे. टोकाचा वर्तन व्यवहार असलेली यातली माणसं ठसठशीतपणे त्यांनी उभी केली आहेत. त्यांंच्यातला उपहास, उपरोध, वक्रोक्ती त्यांनी नेमकेपणाने बाहेर काढली आहे. यातले भावनात्मक प्रसंगही तेवढ्याच ठेहरावाने त्यांनी चित्रित केले आहेत. त्यामुळे नाटक स्वीकारार्ह झालं आहे.
संदेश बेंद्रे यांनी सात्विक-सूर्यजाचं घर तपशिलांत साकारलं आहे. इतर नाट्यस्थळंही सूचकतेनं उभी केली आहेत. शीतल तळपदे यांनी यातले नाट्यात्म प्रसंग ठळक करणारी प्रकाशयोजना केली आहे. तन्मय भिडे यांनी परेश मोकाशींच्या गीताला संगीतातून न्याय दिला आहे. सारंग कुलकर्णी यांचं पार्श्वसंगीत नाट्यपरिणामात भर घालणारं. पूर्णिमा ओक यांची वेशभूषा आणि संतोष गिलबिले यांची रंगभूषा व केशभूषा पात्रांना बाह्य व्यक्तिमत्त्व प्रदान करणारी. स्वप्नील जोशी हे बर्याच काळानंतर रंगमंचावर अवतरले आहेत. त्यांचा प्रसन्न वावर, झटकन चिडका स्वभाव, त्यातून टोकाला जाणं हे स्वभावगत वर्तन त्यांनी छान दाखवलंय. मुळात पसारा घालण्याची सवय, एवढ्या तेवढ्यावरून चिडणं आणि लगेचच शांतही होणं… या भावच्छटा त्यांनी सहजतेनं व्यक्त केल्यात. सूर्यजा झालेल्या अमृता खानविलकर यांचं हे रंगमंचावरचं पहिलंच पदार्पण आहे असं बिलकूल वाटत नाही, इतक्या सहजतेनं त्या वागल्या, वावरल्या आहेत. त्यांचं अवखळ, पण व्यवहारी व्यक्तिमत्त्व, भावनाप्रधानता आणि त्यात वाहवून जाणं त्यांनी अत्यंत उत्कटतेनं पोहोचवलंय. उभयतांची व्यक्तिमत्त्वंच इतकी भिन्न आहेत की त्यांचं भांड्याला भांडं लागणारच. तसं होतंही. मधुगंधा कुलकर्णी यांनी यात तिहेरी भूमिका साकारल्यात. टीव्ही चॅनलची फिक्शन हेड, सात्विकची आई आणि वकील कम् समुपदेशक. या तिन्ही भूमिकांचा आपला आपला आब, मागणी ओळखून त्यांनी त्या वठवल्या आहेत. त्यासाठी संवादफेक, लकबी वगैरेचं स्वच्छ भानही त्यांनी कसोशीनं राखलंय. सुनील अभ्यंकर यांनी सात्विकचे वेंधळे बाबा आणि अतिउत्साही वकील बृहस्पती या दोन भूमिकांचे ताणेबाणे ओळखून त्या जिवंत केल्या आहेत. सात्विकच्या पडखाऊ बाबांचं वाकलेपण आणि घटस्फोटांच्या केसेसमध्ये आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील फ्रस्ट्रेशन्स बाहेर काढू पाहणारा अतिउत्साही वकील त्यांनी तितक्याच जोमदारपणे रंगवलेत. एकुणात सगळ्याच कलाकारांनी नाटक उचलून धरलं आहे. म्हणूनच जरी ही लग्नाची चिरपरिचितच गोष्ट असली तरी एकदा नक्कीच अनुभवण्याजोगी आहे.
