ईशा देओलने ऑक्टोबर महिन्यात आपल्या पहिल्या मुलीला जन्म दिला. ईशाची आई प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी आणि लता मंगेशकर यांच्यात फार जवळचे संबंध आहेत. लतादीदींनी ईशाला खूप सारे आशीर्वाद आणि काही भेटवस्तूही पाठवल्या. लता दीदींसोबत असलेल्या नात्याबद्दल बोलताना हेमामालिनी म्हणाल्या की, ‘या सिनेसृष्टीत जिथे दर शुक्रवारी नाती तयार होतात आणि बिघडतात, तिथे मी स्वतःला फार भाग्यवान समजते की माझी इथे काहींसोबत आयुष्यभराची नाती जोडली गेली आहेत.’

हेमा आणि लतादीदी अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. लतादीदींबद्दल असलेल्या नात्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, ‘लतादीदींनी १९६९ मध्ये ‘सपनों के सौदागर’ या सिनेमात माझ्यासाठी गाणे गायले होते. या सिनेमानंतर माझ्या सिनेमांसाठी त्यांचाच आवाज वापरला जाऊ लागला. त्यांच्या आवाजामुळे स्क्रिनवर माझा परफॉर्मन्स अधिक खुलून यायचा.’

हेमामालिनी यांचा त्यांच्या प्रत्येक सिनेमात लतादीदींनीच गावे असा हट्ट असायचा. असे म्हटले जाते की, हेमा यांनी गुलजार यांचा ‘मीरा’ हा सिनेमा सोडण्याचे मुख्य कारण लतादीदी होत्या. याआधी दीदींनी मीरावर आधारित एक भजन भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांच्यासाठी गायले होते. म्हणून गुलजारांच्या सिनेमात त्यांनी नकार दिला.

‘आम्ही दोघी नेहमीच एकमेकांसाठी उभे असतो’, असे हेमा म्हणाल्या. ‘तर हेमा एवढ्या ग्रेसफूल आणि रॉयल आहेत की भन्साळी यांनी २० वर्षांपूर्वी पद्मावती सिनेमा तयार केला असता तर त्यांची ‘पद्मावती’ही ही हेमामालिनीच असती,’ असे लता मंगेशकर यांनी म्हटले.