भारतात क्रिकेट या खेळाला चांगलीच प्रसिद्धी आणि लोकप्रियता प्राप्त आहे हे तर सर्वजण जाणतात. बॉलिवूडपासून ते अगदी राजनितीच्या क्षेत्रातही या खेळाचे चाहते आहेत. याच काही सेलिब्रिटी चाहत्यांमधील एक नाव म्हणजे गानसम्राज्ञी लता मंगेशकर. लतादीदींचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट हे त्यांनी आतापर्यंत दिलेल्या विविध मुलाखतींमध्ये स्पष्ट केले आहे. त्याचाच प्रत्यय आता पाहायला मिळत आहे. भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडच्या संघावर मुंबईत झालेल्या कसोटी मालिकेत दणदणीत विजय मिळवल्यानंतर विविध क्षेत्रातून भारतीय संघाचे कौतुक करण्यात आले. या कसोटी सामन्यामध्ये सर्वात जास्त लक्षवेधी खेळी ठरली ती म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची.

इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलेच पेचात पाडत विराट कोहलीने २३५ धावांची दमदार खेळी करत या सामन्याला खऱ्या अर्थाने रंजक बनवले. त्याच्या आणि भारतीय संघातील इतर खेळाडूंच्या बळावर धावांचा इतका मोठा डोंगर रचण्यात यश आले होते. विराट कोहलीच्या याच खेळीबद्दल लता मंगेशकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत त्याचे तोंड भरुन कौतुक केले आहे. यासोबतच त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचेही कौतुक केले आहे. या ट्विटमधून त्यांनी एक गाणेही विराटसाठी समर्पित केले. ‘आकाश के उस पार भी आकाश है…’ हे गाणे लतादीदींनी विराटसाठी समर्पित केले आहे.

एखाद्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याचे कौतुक करण्यासाठी ट्विट करण्याची किंवा जाहीरपणे त्या खेळाडूची प्रशंसा करण्याची लतादीदींची ही पहिलीच वेळ नाहीये. पण, विराटसाठी लतादीदींनी दिलेल्या या शुभेच्छा नक्कीच एक महत्त्वाची बाब ठरणार आहे. दरम्यान, वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धची चौथी कसोटी भारताने एक डाव आणि ३६ धावांनी जिंकली आणि मालिकासुद्धा ३-० अशी आरामात खिशात घातली. त्यानंतर संघनायक विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मैदानावर विजयी फेरी मारत भारतीय संघाने क्रिकेटरसिकांना अभिवादन केले. या कसोटीवर आणि मालिकेवर कोहलीच्या सातत्यपूर्ण फलंदाजीची तसेच उमद्या नेतृत्वाची छाप असल्यामुळे या ऐतिहासिक क्षणांना ‘विराटोत्सव’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.