scorecardresearch

Lata Mangeshkar Health Update : लतादीदींची प्रकृती स्थिर, प्रवक्त्यांची माहिती; खोट्या बातम्या न पसरवण्याचं आवाहन

लतादीदींची प्रकृती स्थिर असून त्यांच्याबद्दल खोट्या बातम्या पसरवू नये, अशी विनंती लता मंगेशकर यांच्या प्रवक्त्याने केली आहे.

Lata Mangeshkar Health Update : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना करोनाची लागण झाली आहे. गेल्या ८ जानेवारीपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. करोनासोबत त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाली आहे. काल रात्रीच्या सुमारास त्यांच्या प्रकृतीत अधिकच बिघाड झाल्याची अफवा पसरली होती. मात्र लतादीदींची प्रकृती स्थिर असून त्यांच्याबद्दल खोट्या बातम्या पसरवू नये, अशी विनंती लता मंगेशकर यांच्या प्रवक्त्याने केली आहे.

लता मंगेशकर यांच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवदेनानुसार, त्यांची प्रकृती स्थिर आहे. लतादीदींबाबत खोट्या बातम्या पसरवताना पाहून त्रास होतो. त्यामुळे कृपया लक्षात घ्या की लतादीदींची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. कृपया त्या घरी लवकर परतण्यासाठी प्रार्थना करा, असे ते म्हणाले.

आशा भोसले यांची प्रतिक्रिया

लता मंगेशकर यांची बहिण आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी ई टाईम्सशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लतादीदींच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे. लतादीदी यांची तब्येत जास्त प्रमाणात बिघडली असल्याचे सांगितले जात आहे. पण तसे काहीही नाही. मी, अर्चना, उषा यांनी अर्धा तासापूर्वी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी डॉक्टरांनी आपण सर्वांनी दीदींच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली पाहिजे, असे सांगितले.

ती आमच्या कुटुंबातील प्रत्येकाच्या आईसारखी आहे. तिच्या घरी (प्रभाकुंज, पेडर रोड) याठिकाणी भगवान शिवाचा रुद्र स्थापित केला आहे आणि आम्ही तिच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहोत, असेही आशा भोसले म्हणाल्या.

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा – राजेश टोपे

तसेच महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मी ब्रीच कँडी रुग्णालयाच्या अधिकार्‍यांशी बोललो आहे, ज्यांनी मला त्याच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिले आहे. त्यावेळी मी त्यांना विनंती केली की, रुग्णालयातील एका प्रवक्त्याने गायिकेच्या प्रकृतीबद्दल अपडेट द्यावा. कारण लोकांना त्यांची प्रकृती कशी आहे, याबाबत जाणून घ्यायचे आहे. लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतरच रुग्णालय त्यांच्या प्रकृतीबाबत अपडेट देऊ शकेल, असे ते म्हणाले.

लता मंगेशकर या ९२ वर्षांच्या आहेत. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. शनिवारी रात्रीच त्यांना करोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्या लवकर बरे व्हाव्यात यासाठी अनेक जण प्रार्थना करत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lata mangeshkar health update spokesperson rubbishes off fake news and says she is stable nrp

ताज्या बातम्या