भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती ठिक नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. दरम्यान वय जास्त झाल्याने लतादीदी गाणी गात नव्हत्या. परंतु त्यांचं शेवटचं गायलेलं गाणं कोणतं आहे, हे माहितीये का?. तर लतादीदी यांनी शेवटचं गीत इशा अंबानीच्या लग्नासाठी रेकॉर्ड केलं होतं.
Video: क्रिकेट, फोटोग्राफी, मासे खाण्याचं प्रेम…; लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील काही किस्से




स्वर कोकिळा लता मंगेशकर यांनी खास ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नासाठी शुभेच्छा संदेशासह गायत्री मंत्राचे रेकॉर्डिंग केले होते. १२ डिसेंबर २०१८ रोजी या जोडप्याचे लग्न झाले आणि लग्नादरम्यान लता मंगेशकर यांचे रेकॉर्ड केलेले गायत्री मंत्र वाजवण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेशकर यांनी एकाच वेळी गायत्री मंत्राचे पठण करून ते रेकॉर्डिंग पूर्ण केले होते.
दरम्यान, लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यांना करोनाची सौम्यं लक्षणं जाणवत होती. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. उपचारासाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आले होते. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. आज सकाळी ८.१२ मिनिटांनी त्यांचे निधन झाले.