रवींद्र पाथरे

सत्तरच्या दशकात भारतातून शिक्षण आणि त्या पश्चात नोकरीसाठी लंडन आणि अमेरिकेत स्थलांतरणाची एक लाटच आली. देशातील कुचंबलेल्या अर्थव्यवस्थेने बुद्धिमान, कष्टाळू आणि महत्त्वाकांक्षी तरुण-तरुणी आपल्या स्वप्नांच्या शोधात देशांतर करू लागले. त्यांच्या पालकांचाही याला पाठिंबाच होता. परंतु शिक्षण पूर्ण झाल्यावर, आर्थिक सुबत्ता आल्यावर आपली मुलं आपल्या घरटय़ात परततील अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र उच्च शिक्षणानंतर त्याचं चीज करणाऱ्या संधी आपल्या देशात नाहीत याची जाणीव झालेली तरुणाई मग तिथंच स्थिरावली. जीवनशैली आणि सुबत्तेच्या मोहाने त्यांचे परतीचे मार्ग खंडित केले. इकडे आई-वडिलांवर डॉलर्सची उधळण करून, प्रसंगी त्यांना आपल्याकडे बोलावून त्यांनाही या सुबत्तेत सामील करून घेऊन त्यांचे आपल्यावरील ऋण फेडण्याची प्रामाणिक इच्छाही त्यांना होतीच. पण उतारवयात एका जागी खोलवर रुतलेली मुळे उखडून नव्या जागी ती रुजविण्याचा हा खटाटोप व्यर्थ होता. नवा देश, वेगळी संस्कृती, वेगळी मानसिकता, वेगळी माणसं असलेल्या त्या देशांत ही जुनी मुळं रुजणं अवघडच होतं. त्यामुळे मग दोन-तीन वर्षांनी कधी कधी भारतात येणाऱ्या मुला-नातवंडांची वाट पाहत उर्वरित आयुष्य कंठणं त्यांच्या नशिबी आलं. आजवर ज्या संस्कारांत, मानसिकतेत ते लहानाचे मोठे झाले होते त्या निवृत्तिपश्चात मुलं-सुना- नातवंडांचं गोकुळ अवतीभोवती असेल असं त्यांनी गृहीत धरलं होतं. पण त्याऐवजी हे एकाकीपण त्यांच्या वाटय़ाला आलं; जे पचवणं त्यांच्यासाठी फार फार अवघड होतं. त्यातून जे प्रश्न उभे राहिले त्यावर नाटककार जयवंत दळवींनी ‘संध्याछाया’ हे शोकान्त नाटक लिहिलं. ८०च्या दशकात ते रंगभूमीवर आलं.

due to events of previous years causes global warming
गतवर्षांतील घटनांमुळे जागतिक तापमानवाढीला दुजोरा; ‘अ‍ॅडव्हान्सेस इन अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स’च्या अभ्यास अहवालाचा निष्कर्ष
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
mohammed abdul arfath,
एका महिन्यापासून अमेरिकेत बेपत्ता असलेला हैदराबादचा युवक मृतावस्थेत आढळला
America Police
अमेरिकेत चाललंय काय? आणखी एका भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू, वाणिज्य दूतावासाने दिली माहिती

काळ पुढे सरकत राहिला. ९१ सालच्या जागतिकीकरणाने खासगीकरण, उदारीकरणाचे वारे भारतात निर्बंध उठवून आत घेण्यात आले. त्याने तर अक्राळविक्राळ घुसळण झाली. एकीकडे जागतिकीकरणाने सुबत्ता आणली, दुसरीकडे मूल्यांचा ऱ्हास, सांस्कृतिक सपाटीकरण, व्यक्तिवादाचे स्तोम, करुणेचा स्पर्श नसलेली नृशंस व्यावहारिकता यांनी आपलं जीवन व्यापून टाकलं. सत्तरच्या दशकातला नात्यांतला ओलावा पुरता सुकून गेला. ‘मी, माझं, मला’ यापलीकडे माणसं विचार करीनाशी झाली. विज्ञान-तंत्रज्ञानाने आपला कब्जा घेतला. पूर्वीसारखं पत्रं, दोन-तीन वर्षांनी होणाऱ्या आप्तांच्या गाठीभेटी यांचं अप्रूप उरलं नाही. आली आठवण की लावा व्हिडीओ कॉल आणि बोला मनसोक्त.. आमनेसामने! त्यामुळे ‘एम्प्टी नेस्ट सिंड्रोम’चा काच कमी झाला असला तरी व्यक्तिवाद आणि व्यावहारिकतेचा अतिरेक यांनी दुरावलेल्या बंधांमुळे नाती विसविशीत झाली. त्यातून मग आई-वडिलांचे अंत्यसंस्कारांचे ‘लाइव्ह’ प्रक्षेपण करून दूरदेशी मुलांना दाखविण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले.. स्वीकारले गेले. आता आई-वडिलांची आठवण होते ती फक्त पत्नीचं बाळंतपण काढण्यासाठीच! माणसांचं माणूसपणच नष्ट करणारी ही प्रगती रोखणं कुणाच्याही हातात नाही. त्यातूनच जन्म घेतला आहे नाटककार प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘संज्या छाया’ या नाटकानं! ‘जीगिषा – अष्टविनायक’ संस्थेची ही निर्मिती!

गोष्टी या थराला आल्यावर त्यातून काहीतरी मार्ग काढणं क्रमप्राप्तच.. ‘संज्या छाया’ हे नाटक हा मार्ग दाखवतं. ‘विस्तारित कुटुंब’ (एक्स्टेंडेड फॅमिली) हाही काहींनी त्यावर काढलेला एक मार्ग! खरं तर दूरदेशीची मुलं आणि त्यांचे एकाकी आयुष्य कंठणारे आई-बाबा ही आता सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. ती स्वीकारण्यावाचून गत्यंतर नाही. मग यावर उपाय काय? तर स्वत:ला आपल्या आवडीच्या कामात, छंदात गुंतवून घेणं. त्यातही निवृत्तिपश्चातचं आयुष्य अभावग्रस्तांच्या, रंजल्यागांजल्यांच्या जीवनात चार सुखाचे क्षण निर्माण करण्यासाठी कारणी लावले तर..? तर त्यांच्याइतकं परमसुखाचं, कृतार्थ समाधानाचं दुसरं आनंदनिधान नसेल! याचा अर्थ मुलांमध्ये गुंतायचंच नाही, त्यांच्यावर मायेची पाखर घालायचीच नाही असा नाही. पण त्यांच्यात इतकंही गुंतून राहू नये, की जेणेकरून आपलं आयुष्य नरकवत बनेल. ‘संज्या छाया’ मधले संज्या हे पात्र मंत्रालयातील निवृत्त उपसचिव आहे. तर त्यांची पत्नी छाया ही महिला बचत गटाच्या साहाय्याने जेवणाचे डबे बनवून देण्याचा उपक्रम राबवते. त्यांचा ‘हॅपीनेस सेंटर’ नावाचा ग्रुप आहे. त्यात निरनिराळय़ा क्षेत्रांतील निवृत्त मंडळी आहेत; जी सर्वसामान्यांची मंत्रालय, सरकारी खाती, पोलीस, न्यायालयीन कज्जे, आरोग्यसेवा वगैरे क्षेत्रांतील गरजू, गरीब नाडलेल्यांना मदतीचा हात देतात. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मदत करतात. आपल्या उर्वरित आयुष्याचा हेतू त्यांना सापडला आहे. मुलंबाळं, त्यांच्या समस्या यांत स्वत:ची फरफट करवून घेण्यापेक्षा आपल्याला समाधान देईल, मन आनंदानं गुंतून राहील अशा कामांत ही मंडळी बिझी आहेत. पण याचा अर्थ त्यांना व्यक्तिगत समस्या नाहीएत का? तर आहेत! त्या ते कशा हाताळतात, हे या नाटकातच पाहणं इष्ट!

नाटककार प्रशांत दळवी आणि सामाजिक प्रश्न यांचं अतूट नातं आहे. आजवरच्या त्यांच्या ‘चारचौघी’, ‘ध्यानीमनी’, ‘चाहूल’, ‘सेलिब्रेशन’, ‘गेट वेल सून’ यांसारख्या नाटकांतून त्यांनी समाजातील कळीच्या मुद्दय़ांना हात घातलेला आहे. ‘संज्या छाया’ हे नाटक जरी शीर्षकातून काहीतरी वेगळं निर्देश करत असलं तरी त्यातला आशयही गंभीर सामाजिक प्रश्न मांडणाराच आहे. फक्त यावेळी त्यांनी त्याची मांडणी हसत्या खेळत्या स्वरूपात केली आहे; जी त्यांच्या पिंडप्रकृतीशी काहीशी फटकून असल्याचं कुणाला वाटू शकतं. मात्र, त्यांचं हे वेगळं रूपही त्यांच्या धक्कातंत्री सादरीकरणाशी मेळ खाणारंच आहे. एक वेगळे प्रशांत दळवी या नाटकात समोर येतात. समस्या तीच.. ‘संध्याछाया’ मधली; पण दळवींनी तिला कसं सामोरं जायचं त्याचा मार्ग सांगितला आहे. त्यांची नाटकं सहसा कुठल्याही प्रश्नाचं ‘सोल्युशन’ देण्याच्या भानगडीत पडत नाहीत; ते विचारप्रवृत्त करतात, आणि प्रत्येकाने आपापल्या परीने त्यास सामोरं जावं असं सुचवतात. इथं मात्र त्यांनी ‘सोल्युशन’ दिलं आहे. व्यक्तिगत आणि सार्वजनिकचा लोभस गुंता त्यांनी ‘संज्या छाया’ मध्ये आकारला आहे. तोही हसत – खेळत. त्यामुळे प्रेक्षक त्यात सहजी सामील होतो. ‘नाथाघरची उफराटी खूण’ पद्धतीनं त्यांनी एकूण नाटकाची रचना केली आहे. सामाजिकतेकडून व्यक्तिगततेकडे हे नाटक हिंदूोळे घेत राहतं. मुलं आपल्यापासून दुरावू नयेत म्हणून त्यांचं वेगवेगळय़ा प्रकारे संगोपन करणारी दोन जोडपी यात आहेत. त्यांच्या संगोपनाच्या पद्धतीतून मुलं कशी घडतात, कशी संस्कारित होतात आणि बाहेरच्या जगात गेल्यावर त्यांचं काय होतं, हे त्यातून लेखकाला दाखवायचं आहे. या सगळय़ात लेखकानं कुणा एकाला ‘व्हिलन’ केलेलं नाही, तर परिस्थितीच्या गुंत्यात सापडलेली माणसं आजच्या जगात कशी वागतात, व्यक्त होतात, हे लेखकाला दाखवायचंय. त्यात ते पुरते यशस्वी झाले आहेत, हे नाटकाअखेरीस हसता हसता प्रेक्षकांच्या पाणावलेल्या डोळय़ांतून पाहायला मिळतं.

दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचं लेखक प्रशांत दळवींशी इतक्या वर्षांचं साहचर्य आणि त्यातून ‘हृदयी संवादिजे’ स्वरूपातील कलात्मक एकरूपता ‘संज्या छाया’ मध्येही प्रतीत होते. नाटकाचा ‘सार्वजनिक ते व्यक्तिगत’ हा बाज त्यांनी अत्यंत नाजूक, तरलतेनं हाताळलाय. भावनिक मेलोड्रामाचे क्षण त्यांनी बुद्धय़ाच टाळलेत. प्रेक्षकाने मेलोड्रामात वाहवून न जाता सत्याशी त्यानं सामना करावा, हा विचार नाटकात कुठंही त्यांनी दृष्टीआड होऊ दिलेला नाही. व्यक्तिरेखाटन हा तर त्यांचा हातखंडा. विभिन्न प्रकृतीची पात्रं यात आहेत. ती ठसठशीतपणे सामोरी येतात. तरीही त्यांची आपापसातील आंतर लय बिघडणारं नाही याची खबरदारी त्यांनी घेतली आहे. एक आहे: नाटकात खूप पात्रं असल्याने त्यांच्या परिचयात जरा वेळ जातो. संज्या आणि छाया ही नाटकातली मध्यवर्ती पात्रं. त्यांच्या स्वभाव-विभावातून, वागण्या-बोलण्यातून, व्यक्त- अव्यक्ततेतून नाटक आकारत जाते. या दोन पात्रांच्या मानसिकतेचा, लोणच्यासारख्या मुरलेल्या त्यांच्या नात्याचा आंबट-गोड आलेख दिग्दर्शकानं चढत्या भाजणीनं नाटकात रेखाटला आहे. त्यालाच समांतरपणे काहीशा अर्कचित्रात्मक पद्धतीनं माजी न्या. कानिवदे आणि त्यांची मुख्याध्यापिका पत्नी सौ. कानिवदे हे जोडपं नाटकाची गोडी वाढवतं. या परस्परविरोधी जोडप्यांच्या इंटरअ‍ॅक्शनमधून एक धमाल हसरं, खेळतं वातावरण नाटकभर प्रसन्नतेचा शिडकावा करतं. प्रदीप मुळय़े यांनी सकारात्मक वातावरणाचं संज्या – छायाचं घर त्यातल्या तपशिलांनिशी साकारलं आहे. रवि-रसिक यांची प्रकाशयोजना नाटकाचा मूड ठळक करते. पुरुषोत्तम बेर्डेच्या पाश्र्वसंगीताने ‘तरुणाई’ फील संबंध नाटकभर जाणवत राहतो. दासू वैद्य यांच्या गीताला अशोक पत्कींनी संगीत दिलं आहे. उल्हेश खंदारे यांनी रंगभूषेतून पात्रांना ‘चेहरा’ दिला आहे, तर प्रतिमा जोशी – भाग्यश्री जाधव यांनी वेशभूषेतून! नृत्यरचना खुशबू जाधव यांची आहे.

वैभव मांगले या जात्याच बुद्धिमान, अभिनयाची सखोल जाण असलेल्या कलाकाराने संज्याचं संयमित, नर्मविनोदी आणि स्थिरबुद्धी व्यक्तिमत्त्व अप्रतिम साकारलं आहे. त्यांच्यातल्या विनोदी नटाला त्यांनी यात कुठंही वाहवू दिलेलं नाही. त्यांचा सहज वावर, संवादफेकीचं अचूक टायिमग वाखाणण्याजोगंच. विशेषत: एका नाटकी प्रसंगातील त्यांनी कथनी आणि करणीतला विरोधाभास इतका लोभस दाखवलाय, की ‘हॅट्स ऑफ’ आपसूक तोंडी. निर्मिती सावंत याही चतुरस्र कलावती. छायाचं मोकळंढाकळं रूप, साधे-सरळपणा त्यांच्या नेहमीच्या आक्रमक व्यक्तिमत्त्वाला छेद देणारी ही भूमिका. पण त्यांनी ती तितक्याच निगुतीनं केली आहे. नाटकातले भावनात्मक क्षण, त्यातली वेदना दाखवत असतानाच इतरांपासून ती लपवण्याची त्यांची धडपड त्यांच्यातल्या सशक्त अभिनेत्रीचं दर्शन घडवणारी. सुनील अभ्यंकर यांनी न्यायालयीन भाषा आणि वातावरणाचा गंज चढलेला न्या. कानिवदे अर्कचित्रात्मक रूपात फर्मास वठवलाय. त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत – मास्तरकी हाडीमांसी मुरलेल्या हेडमास्तरणीच्या रूपात योगिनी चौक- बोऱ्हाडे मस्त शोभल्यात. आत्मविश्वासाचा अभाव असलेला आणि त्यातून दोन पावलं पुढे – चार पावलं मागे अशा गोंधळलेल्या अवस्थेतला किशोर – राजस मुळे यांनी लक्षवेधी केलाय. अभय जोशी (डॉ. भागवत), आशीर्वाद मराठे (रघू), मोहन साटम (सदावर्ते मास्तर) आणि संदीप जाधव (इन्स्पे. गायकवाड) यांनीही आपापल्या भूमिका चोख साकारल्या आहेत. निवृत्तिपश्चातच्या आयुष्याचं दिशा दिग्दर्शन करणारं हे हसतं – खेळतं ‘संज्या छाया’ काळाच्या गोचीवरचा उतारा आपल्याला देतं.. निश्चित!