Megha Ghadge Angry On Sheetal Mhatre : महाराष्ट्राला लावणीची मोठी परंपरा आहे. अनेक कलावंतांनी या लावणीसाठी स्वतःचं आयुष्य वाहिलं आहे; पण याच महाराष्ट्रात नुकत्याच एका लावणी कलावंतांचा अपमान झाला आहे. त्याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू असून अनेक जण आपापली मतं व्यक्त करीत आहेत. अशातच मेघा घाडगेनंसुद्धा संबंधित प्रकरणी निषेध व्यक्त केला आहे.
नुकत्याच झालेल्या शिवजयंतीनिमित्त मुंबईच्या कांदिवली परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात लावणी कलावंत आकांक्षा कदमची लावणीदेखील होती. मात्र, ती लावणी सादर करणार इतक्यात तिला थांबवण्यात आलं. या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी लावणीविषयी अपमानास्पद वक्तव्य केलं. या वक्तव्यामुळे चिडलेल्या आकांक्षा कदमनं कार्यक्रम अर्ध्यातच सोडला. घडलेला संपूर्ण प्रकार तिनं व्हिडीओद्वारे शेअर केला आहे. त्यावर आता मेघा घाडगेनं संताप व्यक्त केला आहे.
लावणी कलावंताच्या अपमानाबद्दल मेघा घाडगेचा संताप
मेघाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करीत म्हटलं, “दोन दिवसांपूर्वी आकांक्षाबरोबर जी घटना घडली होती, ती प्रचंड लज्जास्पद व लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हात्रेमॅडम, जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत नसेल, लावणी कलावंतांचा इतिहास माहीत नसेल, शाहिरी परंपरा, लोकपरंपरा माहीत नसेल, तर कृपया तुम्ही एखादं पुस्तक उघडून पाहावं. कारण- त्या काळात सैन्यांचं आणि मावळ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी शाहिरी हे एकमेव माध्यम होतं, जे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कवन रचायचे. हे कलावंत सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी नेहमी तत्पर असायचे.”
पुढे तिनं म्हटलं, “शाहीर सदानंदभाऊ असतील, शाहीर होनाजी बाळा असतील, परशुराम असेल यांच्याबद्दल कृपया वाचा. अण्णाभाऊ साठे वाचा, पट्ठे बापूराव वाचा, रा. म. जोशी वाचा, कारण- या कलेविषयी तुम्हाला काहीतरी माहिती असू देत. तुम्ही त्या कलाकाराचा अपमान केला आहे, याची मला लाज वाटतेय. स्त्रीच स्त्रीचा अपमान करतेय, हे फार वाईट आहे. हे काही आताच जन्माला आलेले कलाकार नाहीयेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील २०-२५ वर्षं या कलेसाठी वाहिली आहेत.”
“तुम्हाला ही माणसं साधी वाटत असतील, छोटी वाटत असतील; पण ही माणसं प्रचंड स्वाभिमानी असतात. त्यांचा स्वाभिमान दुखावण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. जर तुम्ही मेहनत केली नसेल, तुम्हाला सगळ्या गोष्टी अशाच मिळाल्या असतील, तर तुम्हाला त्याची कदर नसेल. जर कदर नसेल, तर अशिक्षित माणसं अशा पद्धतीनं वागतात. तिचा अपमान झालेला आहे आणि तिचा अपमान भरून काढणं तुमचं कर्तव्य आहे. कोणत्याही कलाकाराच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचवणं हा अन्याय असतो. मला असं वाटतं की, दोन दिवसांत तिची माफी मागा आणि शिवचरित्र नक्की वाचा. जय शिवराय, जय भीम,” असंही ती म्हणाली.
आकांक्षा कदमबद्दल मेघा घाडगेने शेअर केला व्हिडीओ
मेघानं व्हिडीओ शेअर करीत कॅप्शनमध्येसुद्धा आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “झालेल्या अपमानाचा जाहीर निषेध… अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. लावणी कलावंतांना ज्या पद्धतीनं तुम्ही वागणूक देता, हा त्या कलावंताचाच नाही, तर आपल्या लोककलेचा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान आहे. मी असते, तर कदाचित रंगमंचावरून जाऊन त्याच वेळी प्रत्युत्तर दिलं असतं आणि झालेल्या अपमानाची जाणीव करून दिली असती. शीतल म्हात्रेताई एवढंच बोलायला सुचतं, तर महाराष्ट्रात जो नंगा नाच चाललाय ना, तो थांबवून दाखवा आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तोंडी घ्या. गर्दी जमवण्यासाठी, तरुण मुलांना फितवण्यासाठी निर्लज्जपणे नंगा बाजार मांडलाय ते थांबवून दाखवा. आमच्यासारख्या लावणी कलावंतांवर कसला जोर दाखवताय? खूप साधी आणि स्वाभिमानी माणसं आहेत ही. आमच्या विठाबाई नारायणगावकर यांच्याबद्दलही तुम्हाला काही माहीत नसेल याची खात्री आहे. पद्मश्री पुरस्कारविजेते यमुनाबाई वाईकर आणि आमचे रघुवीर खेडकर हेही माहीत नसतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शाहीर हे समाजप्रबोधन आणि मावळ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी कवन रचत. शाहिरी कलेतून तमाशाचा जन्म झाला; पण हे सांगून उपयोग काहीच होणार नाही. ‘गाढवापुढे गायली गीता’ हेच होणार आहे. तुम्हाला सदबुद्धी लाभो आणि केलेल्या अपमानाची जाणीव होवो हीच अपेक्षा.”
लावणी कलावंत आकांक्षा कदमने शेअर केलेला व्हिडीओ
दरम्यान, आकांक्षानं तिच्या सोशल मीडियावर संबंधित प्रकरणाचा व्हिडीओ शेअर करीत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आहे. झालेल्या अपमानामुळे आकांक्षाला अश्रू अनावर झाल्याचंसुद्धा या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
