scorecardresearch

‘झी चित्रगौरव पुरस्कारां’च्या मंचावर श्रीवल्लीचे लावणी नृत्य

आपल्या चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी मराठी कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या हिंदी कलाकारांना हल्ली मराठी चित्रपट पुरस्कार सोहळय़ासाठी बोलावण्याचाही पायंडा पडून गेला आहे.

man srivalli dance
‘झी चित्रगौरव पुरस्कारां’च्या मंचावर श्रीवल्लीचे लावणी नृत्य

सध्या हिंदीतील अनेक कलाकार प्रसिद्धीसाठी मराठी कार्यक्रमांची वाट चोखाळताना दिसतात. आपल्या चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी मराठी कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या हिंदी कलाकारांना हल्ली मराठी चित्रपट पुरस्कार सोहळय़ासाठी बोलावण्याचाही पायंडा पडून गेला आहे. गेल्या वर्षी रोहित शेट्टी, कतरिना कैफ यांनी झी चित्रगौरव पुरस्कार सोहळय़ाला हजेरी लावली होती. यंदा झी चित्रगौरव पुरस्कार सोहळय़ात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाची खास उपस्थिती असणार आहे.

या वर्षीच्या ‘झी चित्र गौरव २०२३’ सोहळय़ाचं खास आकर्षण ठरली आहे ती म्हणजे कन्नड, हिंदी, तेलगू आणि तमिळ या चार भाषांमध्ये काम करत असलेल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक रश्मिका मंदाना. ‘पुष्पा’ चित्रपटातील श्रीवल्लीची भूमिका आणि ठुमका या दोन्हींमुळे ती देशभरात लोकप्रिय झाली आहे. गेल्या वर्षी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘गुड बाय’ या चित्रपटातून तिने हिंदीतही पदार्पण केलं आहे. तर हीच रश्मिका लवकरच झी चित्रगौरव पुरस्कार सोहळय़ात चक्क लावणी नृत्य करताना दिसणार आहे. रश्मिकाने लावणी नृत्य करण्यासाठी सोहळय़ाच्या व्यासपीठावर केलेली एंट्री, तिला पाहून सूत्रसंचालन करणाऱ्या अभिनेता श्रेयस तळपदेने म्हटलेला ‘पुष्पा नाम सुनकर फ्लॉवर समझी क्या..’ हा संवाद आणि मराठीशी लहानपणी ‘ऐका दाजिबा’वर नृत्य करण्याच्या निमित्ताने जुळलेले नाते असा खुद्द रश्मिकाने सांगितलेला किस्सा ही सगळी धमाल अनुभवता येणार आहे. रश्मिकाने ‘नमस्कार मंडळी’ म्हणत केलेलं धमाल अप्रतिम लावणी नृत्यही रविवारी, २६ मार्चला ‘झी मराठी’ वाहिनीवर सायंकाळी ७ वाजता दाखवण्यात येणाऱ्या झी चित्रगौरव २०२३ या पुरस्कार सोहळय़ात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे ही लावणी तिने वन टेकमध्ये साकारली आहे. तिला या वेळी बोलतं करण्याचं काम सूत्रसंचालक नीलेश साबळे आणि गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांनी पार पाडलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 00:02 IST