संगीतकार वसंत पवार एक दिवस अचानक त्यांच्या घरी आले आणि चित्रपटासाठीची एक लावणी मला तुमच्याकडूनच गाऊन घ्यायची आहे, असे त्यांनी सांगितले. लावणी आणि तीही आपण गायची या कल्पनेने त्या क्षणभर गांगरल्या. लावणी गाऊ शकणार नाही, असे त्यांनी सांगितले. पण वसंत पवार यांनी आपला हट्ट सोडला नाही. अखेर त्या ती लावणी गायला तयार झाल्या. ती लावणी होती ‘नाव गाव कशाला पुसता मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हनत्यात लवंगी मिरची’. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली ती लावणी ‘रंगल्या रात्री अशा’ चित्रपटातील होती. या लावणीने ज्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले आणि आचार्य अत्रे यांनी ज्यांना ‘लावणीसम्राज्ञी’ हा किताब दिला त्या ज्येष्ठ पाश्र्वगायिका सुलोचना चव्हाण आजच्या ‘पुनर्भेट’च्या मानकरी आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सेलिब्रेटी’पणाचा कोणताही तोरा नसलेल्या सुलोचानाबाई यांना घरात आणि परिचितांमध्ये ‘माई’ या नावाने संबोधले जाते. त्यांच्याकडे पाहिले तर या व्यक्तिमत्त्वाने लावणीचा तो ठसका, खटय़ाळपणा, शृंगार गाण्यातून पुरेपूर पोहोचवला यावर विश्वासच बसत नाही. प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर असतानाही त्या जशा साध्या होत्या तशा त्या आजही आहेत. कपाळावर मोठे कुंकू आणि अंगभर लपेटून घेतलेला पदर हे त्यांचे रूप आजही तसेच आहे.

‘नाव गाव कशाला पुसता..’ या लावणीचा किस्सा अधिक विस्ताराने सांगताना त्या म्हणाल्या, माझे पती शामराव चव्हाण हे मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक-कॅमेरामन म्हणून काम करत होते. त्यांचा आणि वसंत पवार यांचा परिचय होता. मी पाश्र्वगायन करते हे पवार यांना ठाऊक होतेच. पण तेव्हा मी हिंदीत जास्त गात होते. मराठीत नुकतीच सुरुवात केली होती. पवार घरी आले आणि चव्हाणांना (मी आशा भोसले यांच्या सांगण्यावरून शामरावांना ‘अहो’च्या ऐवजी चव्हाण अशी हाक मारू लागले.) म्हणाले, ‘नाव गाव कशाला पुसता’ ही लावणी मला सुलोचनाबाईंकडूनच गाऊन घ्यायची आहे. चव्हाणांना मी खुणेने नाही नाही असे म्हणत होते. चव्हाण यांनी मला थांब अशी खूण केली. पवार यांनी ही लावणी गाऊन घेणार तर तुमच्याकडूनच असा प्रेमळ हट्ट धरला. चव्हाण यांनीही तू लावणी गाऊ शकशील असे प्रोत्साहन दिले.

पवार यांनी खिशातून लावणी लिहिलेला कागद काढला आणि त्यांनी केलेल्या संवादिनीच्या साथीवर लावणी गायले. त्यांना ती आवडली. पुढे लावणीचे ध्वनिमुद्रण झाले आणि त्या एका लावणीने माझे आयुष्य बदलून गेले. पुढे लावणी गायिका म्हणून प्रसिद्ध झाले, त्याचा पाया ‘नाव गाव कशाला’ने घातला होता. आठवणींचा पट उलगडताना त्यांनी सांगितले, मी मूळची गिरगावचीच. माहेरची सुलोचना कदम. गिरगावातील फणसवाडी येथील चाळीतच लहानाची मोठी झाले. माझा मोठा भाऊ दीनानाथ कदम याने मेळा काढला होता. त्या मेळ्यात अभिनेत्री संध्या, त्यांची बहीण वत्सला देशमुख काम करायच्या. माझी मोठी बहीण शकुंतलाही त्यात असायची. घरचाच मेळा असल्याने मीही त्यात लहानसहान कामं करायची. आमच्या घरचे वातावरण बाळबोध. एकदा भावाने वत्सलाबाई कुमठेकर यांनी गायलेल्या ‘सांभाळ गं दौलत लाखाची तुझ्या ज्वानीची..’ ही ध्वनिमुद्रिका घरी आणली. ग्रामोफोनवर ती लावली. मला ते गाणे आवडले. ते मी सतत म्हणू लागले. आमच्या आईला काही ते आवडले नाही. लावणी किंवा असली गाणी घरात आणि तीही मुलीने म्हणायची, असा तो काळ  नव्हता. ही अशी गाणी घरात लावतात का, म्हणून ती ओरडायची. प्रसंगी मला तिच्या हातचा मारही खावा लागला. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. कारण पुढे लावणी गायिका म्हणूनच मी प्रसिद्ध झाले.

मेळ्यात काम करत असताना काही भजने व गाणी गायचे. आमच्या मेळ्यातील रंगभूषाकार दांडेकर एके दिवशी मला संगीत दिग्दर्शक श्यामबाबू पाठक यांच्याकडे घेऊन गेले. माझा आवाज त्यांनी ऐकला आणि ‘कृष्ण सुदामा’ या हिंदी चित्रपटातील गाणे गायची संधी मला मिळाली. पाश्र्वगायन केलेले ते माझे पहिले गाणे. गाण्याचे ध्वनिमुद्रण फ्रॉकमध्ये केले होते. तेव्हा मी जेमतेम आठ ते दहा वर्षांची होते. पुढे काही वर्षांनी मा. भगवान यांच्या चित्रपटांसाठी मी पाश्र्वगायन केले. सी. रामचंद्र, मन्ना डे, मोहंमद रफी, मुकेश, जोहराबाई, आमीरबाई, शमशाद बेगम आणि त्या काळातील सर्व मान्यवर गायक-गायिकांबरोबर द्वंद्वगीते, तसेच माझी स्वत:ची वैयक्तिक गाणीही त्या वेळी ध्वनिमुद्रित झाली. ‘चोरी चोरी’, ‘जो बिगड गयी वो किस्मत हू’, ‘नजर से नजर लड गई’, ‘जिगर में छुरी गड गई’ ‘हाए राम’या , ‘आँखो से मिली आँखे’, ‘आरमानोंकी दुनिया मे एक’, ‘रात अंधेरी मत कर देरी तु मेरा मै तेरी’, ‘अब तू ही बता तेरा दिल किसको पुकारे’,  ही आणि अशी अनेक हिंदी गाणी मी गायले असून त्यांची संख्या सुमारे अडीचशे इतकी आहे. ही सर्व गाणी त्या काळात खूप लोकप्रिय झाली. मी गायलेली ही हिंदी गाणी माझ्या वाढदिवसाच्या (१३ मार्च) दिवशी ‘रेडिओ सिलोन’वरून दरवर्षी सकाळी दीड ते दोन तास वाजवली जातात. ती ऐकून रसिक श्रोते व चाहत्यांकडून आजही प्रतिसाद मिळतो, आपल्यासाठी ती आनंदाची गोष्ट असल्याचेही सुलोचनाबाई यांनी सांगितले.

लावणी गायनाने मला प्रसिद्धी व यश मिळवून दिले. मला मोठे केले. लावणी गायनाला मी प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून दिली. स्वत:चा आब, मर्यादा राखूनच मी लावणी गायनाचे अक्षरश: हजारो कार्यक्रम केले. महाराष्ट्रातील असे कोणतेही छोटे-मोठे शहर, गाव, तालुका किंवा खेडे नसेल की जेथे मी कार्यक्रम केला नाही.  आणि खरे सांगू का, कोणत्याही प्रकारचे संगीत असो ते कधीही कमी दर्जाचे नसते. प्रत्येक संगीत प्रकाराची स्वत:ची स्वतंत्र ओळख आणि वैशिष्टय़ आहे, हे विसरता कामा नये.

हल्लीचे लावणी सादरीकरण, गायन याविषयी आपले मत स्पष्टपणे मांडताना त्या म्हणाल्या, आज लावणी सादर करण्यापेक्षा त्याचे प्रदर्शन अधिक प्रमाणात केले जाते. श्रोते किंवा प्रेक्षकांपर्यंत लावणी पोहोचवण्यासाठी तोकडे कपडे, अश्लील हावभाव, भडक रंगभूषा, अंगप्रदर्शन याची काहीही गरज नसते.

‘शिवाजी मंदिर नाटय़गृहा’चे उद्घाटन माझ्या लावणी गायन कार्यक्रमाने झाले. तसेच ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनप्रसंगीही माझ्या गाण्याचा कार्यक्रम झाला असल्याची आठवण त्यांनी सांगितली.

गायन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना विविध सन्मान पुरस्कार मिळाले. राज्य शासनाच्या लता मंगेशकर पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले. पण केंद्र शासनाच्या पद्मश्री, पद्म  पुरस्कारासाठी अद्याप त्यांची दखल घेण्यात आलेली नाही. या दिग्गज पाश्र्वगायिकेला स्वत:चे हक्काचे घर नाही. आजही त्या गिरगावात एका चाळीत छोटय़ा घरात भाडय़ाच्या जागेत राहात आहेत.  मोठी सून प्रफुल्ल, (मोठा मुलगा जय आता या जगात नाही) व त्यांची मुलगी आरती, धाकटा मुलगा विजय, त्यांची पत्नी कविता आणि त्यांचा मुलगा अजय असा त्यांचा परिवार. विजय हे प्रसिद्ध ढोलकी वादक असून अन्यही लोकतालवाद्ये ते वाजवितात. मराठी, हिंदूीसह काही भारतीय प्रादेशिक भाषांमधील मान्यवर संगीतकारांकडे ते संगीतसाथ करतात.  लौकिक अर्थाने केवळ चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या आणि गाण्यातील कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण न घेतलेल्या सुलोचनाबाई यांनी अथक परिश्रम, सतत शिकण्याची वृत्ती यामुळे गाण्याच्या क्षेत्रात विशेषत: लावणी गायनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.

आचार्य अत्रे यांच्या ‘हीच माझी लक्ष्मी’ चित्रपटात संगीतकार वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली ‘मुंबईच्या कॉलेजात गेले पती, आले होऊनशान बी.ए. बी.टी.’ ही लावणी त्यांनी गायली. पुढे ‘कलगीतुरा’ चित्रपटासाठी काही लावण्या त्या गायल्या. लावणी गायनाने त्यांना प्रसिद्धी मिळाल्यानंतर पुढे अनेक तमाशाप्रधान चित्रपटांतील लावण्या त्यांनी आपल्या दमदार आणि खडय़ा आवाजाने लोकप्रिय केल्या. लावणी आणि सुलोचना चव्हाण असे एक अतूट नाते तयार झाले. ‘औंदा लगीन करायचं’, ‘कसं काय  पाटील बरं हाय का’, ‘कळीदार कपुरी पान’, ‘खेळतांना रंग बाई होळीचा’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’, ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘फड सांभाळ गं तुऱ्याला आला’, ‘मी बया पडले भिडची, ग बाई भिडची’, ‘सोळावं वरिस धोक्याचं’ या आणि इतरही अनेक लावण्या आजही लोकप्रिय आहेत. त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. विविध पुरस्कार वितरण सोहळ्यांत या लावण्यांवर नृत्य सादरीकरण केले जाते ते मूळ गाणे सुलोचना यांच्याच आवाजातील असते.

शेखर जोशी shekhar.joshi@expressindia.com

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lavni singer sulochana chavan chat with loksatta shekhar joshi
First published on: 30-04-2017 at 02:56 IST