‘सलमान खानचा सिद्धू मुसेवाला करून टाकू’ अशी धमकी ५ जून रोजी पत्राच्या माध्यमातून थेट अभिनेता सलामान खानच्या घरी त्याच्या वडिलांपर्यंत पोहचवणाऱ्या बिष्णोईने टोळीने आता सलमानला माफ करण्यासंदर्भातील तयारी दर्शवलीय. सलमान खानने काळवीट हत्या प्रकरणामध्ये माफी मागितल्यास आम्ही त्याला माफ करु असं बिष्णोई टोळीचा मोऱ्हक्या असणाऱ्या लॉरेन्स बिष्णोईच्या भावाने एका मुलाखतीमध्ये म्हटलंय.

नक्की वाचा >> विश्लेषण: बिष्णोई गँगकडून सलमानला काळवीट शिकारीवरुन धमकी; पण बिष्णोई समाजासाठी काळवीट एवढं महत्वाचं का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे पत्र प्रकरण काय?
सलमानचे वडील सलीम खान यांना ५ जून रोजी त्यांच्या घराच्या आवारामध्ये एक पत्र आढळून आले. या पत्रात त्यांना आणि त्यांचा मुलगा म्हणझेच अभिनेता सलमान खानला धमकी देण्यात आली होती. ‘सलमान खानचा सिद्धू मुसेवाला करून टाकू’ असे या पत्रात लिहण्यात आले होते. हे पत्र वाचल्यानंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून ही धमकी देण्यामागे बिष्णोई टोळीच असल्याचा खुलासा झालाय. बिष्णोईचा सहकारी विक्रम बराडने तीन लोकांच्या माध्यमातून हे पत्र सलीम खान यांच्यापर्यंत पोहचवलं असल्याचं पंजाबमधील गायक, काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील संशयित तसेच मोक्का कायद्यान्वये कारवाई केल्यानंतर फरार झालेला गुंड सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकालच्या चौकशीमधून समोर आलं आहे.

आता सलमानला माफ करण्याची तयारी
बिष्णोईचा मानलेला भाऊ असणाऱ्या राजवीर सोपू याने सलमान हा आमचं पुढलं लक्ष्य असल्याचं उघडपणे सांगितलंय. मात्र सलमानने काळवीट प्रकरणासंदर्भात माफी मागितल्यास आम्ही त्याला माफ करु, असंही सोपूने म्हटलंय. मुसेवाला यांच्या हत्येनंतर सोपूने एका मुलाखतीमध्ये आता आमचं पुढील लक्ष्य सलमान खान असल्याचं सांगितलंय. “सलमान खानने काळवीट मारलं आहे. त्याला सर्व प्रकरणांमधून दोषमुक्त करण्यात आलंय. त्याने काळवीटाची शिकार करुन माफ मोठी चूक केली आहे. आम्ही उघडपणे सांगतोय की पुढे आम्ही सलमानचा कार्यक्रम करणार. यामध्ये कोणतीच शंका नाहीय,” असं सोपूने एका मुलाखतीमध्ये सांगितल्याचं वृत्त ‘अमर उजाला’ने दिलं आहे.

फक्त सलमानचा कार्यक्रम करु द्या…
सोपूचं हे उत्तर ऐकून मुलाखतकाराने, ‘तुम्ही माझ्या मुलासारखे आहात म्हणून सांगतोय स्वत:ही जगा आणि इतरांनाही जगू द्या,’ असं म्हटलं. त्यावर सोपूने, “तुम्हाला शब्द देतो, सलमानचा कार्यक्रम करु द्या, त्यानंतर आम्ही कोणालाही काहीही करणार नाही,” असं म्हटलं. सलमानने कधीच या प्रकरणात आपली चूक कबूल केली नाही केवळ मुलाखती दिल्या असा आक्षेपही सोपूने घेतलाय. त्याने केवळ स्वत:ची चूक मान्य केली तरी आम्ही त्याला माफ करु असंही सोपूने मुलाखतीत म्हटलंय.

चार वर्षांपूर्वीही लॉरेन्स बिष्णोईने सलमानला ठार मारण्याची धमकी दिलेली. जेव्हा सलमान जोधपूरला येईल तेव्हा त्याला ठार करुन असं लॉरेन्स म्हणालेला. लॉरेन्स सध्या तुरुंगामध्ये आहे. मात्र त्याची टोळी सक्रीय आहे. सलामान खानला धमकावण्यात आल्यापासून त्याची सुरक्षा वाढवण्यात आलीय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lawrence bishnoi brother said if salman khan apologizes in the blackbuck hunting case he will be spared scsg
First published on: 10-06-2022 at 11:27 IST