scorecardresearch

‘द काश्मीर फाइल्स’ला ‘व्हल्गर’ आणि ‘प्रोपगंडा’ म्हणणाऱ्या लॅपिड यांच्याविरोधात तक्रार दाखल; म्हणाले, “हिंदू बलिदानाचा अपमान…”

दिल्लीतील एका वकिलाने ही तक्रार केली आहे.

‘द काश्मीर फाइल्स’ला ‘व्हल्गर’ आणि ‘प्रोपगंडा’ म्हणणाऱ्या लॅपिड यांच्याविरोधात तक्रार दाखल; म्हणाले, “हिंदू बलिदानाचा अपमान…”
नदव लॅपिड ( इंडियन एक्सप्रेस छायाचित्र )

गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चा निरोप समारंभ पार काल ( २८ नोव्हेंबर ) पार पडला. मात्र, हा निरोप समारंभ चांगलाच चर्चेत आला आहे. कारण या समारंभात बोलताना मुख्य ज्युरी नदव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर टीका केली. हा चित्रपट ‘व्हल्गर’ ( अश्लिल ) आणि ‘प्रोपगंडा’ ( प्रचारकी ) असल्याचं मत नदव लॅपिड यांनी मांडलं. यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

इस्रायली चित्रपट निर्माते नदव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटातील अभिनेत्यांनीही नदव लॅपिड यांना लक्ष केलं आहे. त्यात आता दिल्लीतील एका वकिलाने नदव लॅपिड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. गोव्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा : विश्लेषण : ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट व्हल्गर? IFFI मधील विधानांमुळे पुन्हा फुटलं वादाला तोंड; नेमकं झालं तरी काय?

विनीत जिंदाल असे तक्रारदार वकिलाचे नाव आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ट्विटमध्ये जिंदाल यांनी म्हटलं की, “नदव लॅपिड यांनी चित्रपटाचे वर्णन ‘व्हल्गर’ आणि ‘प्रोपगंडा’ करुन काश्मीरमधील हिंदू समुदायाच्या बलिदानाचा अपमान केला. त्यामुळे गोवा पोलिसांकडे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लॅपिड यांचे वक्तव्य ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट आणि हिंदू समुदायाला लक्ष्य करण्याच्या हेतूने करण्यात आले आहे,” असा आरोपही जिंदाल यांनी केला आहे.

हेही वाचा : “ते त्यांचं वैयक्तिक…” लॅपिड यांनी ‘द कश्मीर फाइल्स’बाबत केलेल्या वक्तव्यावर IFFI च्या ज्युरींची स्पष्ट भूमिका

काय म्हणाले होते नदाव लॅपिड?

गोव्यातील पणजी येथे ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात बोलताना इस्रायली चित्रपट निर्माते नदव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर टीका केली. “आम्ही सर्व नाराज आहोत. हा चित्रपट ‘व्हल्गर’ आणि ‘प्रोपगंडा’ वाटला. प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवासाठी ‘द काश्मीर फाइल्स’ योग्य नाही. मी व्यासपीठावर माझ्या भावना मोकळेपणाने बोलू शकतो. ही एक महत्वाची चर्चा आहे, जी न डगमगता व्हायला हवी. कला आणि जीवनासाठी ते आवश्यक आहे,” असे नदव लॅपिड यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 14:13 IST

संबंधित बातम्या