Horror Movie The Mummy: सध्या सिनेविश्वात हॉरर-थ्रिलर चित्रपटांचे वारे वाहत असून प्रेक्षकांना भीतीचा थरार अनुभवायला आवडत आहे. चित्रपट प्रेमींमध्ये हॉरर चित्रपटांची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळतेय. प्रेक्षकांची हीच आवड लक्षात घेऊन निर्माते आता अशाच चित्रपटांची निर्मिती मोठ्या प्रमाणात करत आहेत. नुकताच अक्षय कुमारचा हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूत बंगला’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून तो बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कमाई करत आहे. दरम्यान, १७ एप्रिल रोजी एक हॉलीवूड चित्रपट प्रदर्शित झाला आहे, जो पूर्णपणे हॉरर आहे.

हा चित्रपट कोणता आहे, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर हा चित्रपट आहे ‘ली क्रोनिन’स द मम्मी’ (Lee Cronin’s The Mummy). या सुपरनॅचरल हॉरर चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ चित्रपटालाही मागे टाकलं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘ईव्हिल डेड राईज’चे दिग्दर्शक ली क्रोनिन यांनी ‘द कॉन्ज्यूरिंग’च्या दिग्दर्शकाबरोबर मिळून केले आहे.

हा चित्रपट पाहिल्यानंतर असं म्हटलं जातंय की, हा जुन्या ‘मम्मी’ चित्रपट सीरिजचा भाग नाही. त्याऐवजी, हा एक नवीन चित्रपट तयार करण्यात आला आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होताच या चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

‘ली क्रोनिन’स द मम्मी’ची कथा काय आहे?

‘ली क्रोनिन’स द मम्मी’ची कथा नेमकी काय आहे? हे जाणून घेऊयात. तर हा चित्रपट एका अशा कुटुंबाभोवती फिरतो, ज्यांची मुलगी अनेक वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झालेली असते. जेव्हा ती बऱ्याच कालावधीनंतर परत येते, तेव्हा तिचं वागणं असामान्य असतं. हळूहळू असं जाणवतं की, तिच्यावर एका प्राचीन इजिप्शियन शापाचा प्रभाव आहे. यानंतर कथेत पिरॅमिड, ममी बनवण्याची प्रक्रिया आणि प्राचीन संस्कृतीशी निगडित अनेक रहस्ये उलगडत जातात, ज्यामुळे चित्रपट अधिक रंजक होतो.

चित्रपटाचे कलाकार आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘ली क्रोनिन’स द मम्मी’ या चित्रपटात जॅक रेनर, लाइआ कोस्टा, मे कॅलमावी आणि नताली ग्रेस यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या बजेट आणि कमाईबद्दल बोलायचं झाल्यास, सिनेमाचं बजेट साधारण १८० ते २०० कोटी रुपयांच्या आसपास आहे. या चित्रपटाने अवघ्या एका आठवड्यात ३५० कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय केला आहे. भारतात या चित्रपटाने आतापर्यंत १५ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.