Palash Muchhal legal case : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनासोबतचे लग्न मोडल्यानंतर संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लग्न मोडल्यामुळे त्याच्यावरील वादाचे सावट गडद झाले असताना तो आता कायदेशीर अडचणीत सापडला आहे. पलाशवर पैशांच्या फसवणुकीचे आरोप असून, आता शाब्दिक वादामुळे तो कायद्याच्या चौकटीत अडकला आहे. त्याने स्मृती मानधनाच्या बालमित्राला जातिवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आणि धक्कादायक आरोप समोर आला आहे. सांगलीमध्ये संगीतकार पलाश मुच्छलविरोधात तक्रारीची नोंद करण्यात आली आहे.
हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, संगीतकार पलाशविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अनुसूचित जाती/जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या कलम ३(१) अन्वये, तसेच कलम ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याने संगीतकार पलाश मुच्छल कायदेशीर अडचणींमध्ये अडकला आहे.
पलाश मुच्छल विरोधात सांगलीत तक्रार दाखल
सांगली येथील रहिवासी व स्मृतीचा बालपणीचा मित्र असलेल्या विज्ञान प्रकाश माने याने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. या तक्रारीत पलाश मुच्छलने विज्ञान प्रकाश माने यांना जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना २२ नोव्हेंबर २०२५ रोजी सांगली-आष्टा रस्त्यावरील एका टोल प्लाझावर घडली. त्यावेळी पैशांवरून झालेल्या वादादरम्यान पलाशने जातिवाचक आणि अपमानजनक शिवीगाळ केल्याचा दावा स्मृतीचा बालमित्र विज्ञान माने याने केला आहे.
अर्थिक व्यवहारातून वाद निर्माण
मीडिया रिपोर्टनुसार, पलाश मुच्छल आणि विज्ञान प्रकाश माने यांच्यामध्ये आर्थिक देवाण-घेवाणीतून वाद निर्माण झाला. पलाशने एका चित्रपट निर्मितीसाठी विज्ञान माने यांच्याकडून २५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, कालांतराने माने यांनी ही रक्कम परत मागण्यासाठी पलाशबरोबर संपर्क साधला. तेव्हा माने यांनी पैसे परत मागितल्यावर पलाश मुच्छल आणि त्यांच्यात शाब्दिक चकमक होऊन, वाद निर्माण झाला.
त्यासंबंधी सांगलीतील शास्त्रीनगर परिसरात राहणारे ३४ वर्षीय विज्ञान प्रकाश माने यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये पलाशने विज्ञान प्रकाश माने यांना जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न ठरले वादग्रस्त
टीम इंडियाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं २०२५ मधील सर्वात चर्चेत असलेलं लग्न मोडले. लग्न मोडल्यानंतर विविध चर्चांना उधाण आले होते. स्मृती मानधनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत लग्न मोडल्याची माहिती दिली होती. तर, पलाश मुच्छलनेदेखील याबाबत पोस्ट करीत त्यांचे नाते संपल्याचे सांगितले होते. सांगलीमध्ये मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा सुरू असताना अचानकपणे तो थांबवून लग्न मोडल्याने ते चर्चेत राहिले. आता मात्र पलाश मुच्छल हा आर्थिक फसवणूक आणि जातिवाचक शिवीगाळ अशा दोन प्रकरणांमुळे वादामध्ये अडकला आहे.
