Yamini Krishnamurti: देशातल्या प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार यामिनी कृष्णमूर्ती यांचं निधन झालं. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यामिनी कृष्णमूर्ती यांचे सचिव गणेश यांनी पीटीआयला ही माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून त्या काही आजारांशी लढत होत्या. मागील सात महिन्यांपासून यामिनी कृष्णमूर्ती यांच्यावर उपचार सुरु होते. दिल्लीतल्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. यामिनी कृष्णमूर्ती यांचं पार्थिव यामिनी स्कूल ऑफ डान्स या ठिकाणी ठेवलं जाणार यामिनी कृष्णमूर्ती ( Yamini Krishnamurti ) यांचं पार्थिव यामिनी स्कूल ऑफ डान्स या ठिकाणी अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर रविवारी यामिनी कृष्णमूर्ती यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. मात्र याविषयीचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. यामिनी कृष्णमूर्ती ( Yamini Krishnamurti ) यांच्या निधनाने भरतनाट्यम, ओडिसी, कुचिपुडी नृत्यविश्वात शोककळा पसरली आहे. नृत्य शिकवणारं विद्यापीठ हरपल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे. हे पण वाचा- “सकल बन”, स्पेनच्या रस्त्यावर ओडीसी आणि भरतनाट्यम नृत्यांगणांमध्ये रंगली जुगलबंदी, सुंदर व्हिडीओ बघाच यामिनी कृष्णमूर्ती यांचा परिचय यामिनी कृष्णमूर्ती ( Yamini Krishnamurti ) यांचा जन्म आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातल्या मदनपल्ली या ठिकाणी झाला. तामिळनाडूतल्या चिदम्बरम या ठिकाणी त्यांचं बालपण गेलं. यामिनी कृष्णमूर्ती यांनी १९५७ मध्ये पहिल्यांदा नृत्य सादर केलं होतं. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या निवासी नर्तिका होण्याचा सन्मानही त्यांना मिळाला होता. त्यांनी भरतनाट्यम हे एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. तसंच कुचिपुडी हा नृत्यप्रकारही पुढे घेऊन जाण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. संगीत नाटक अकदामीने काय म्हटलं आहे? संगीत नाटक अकदामीने एक्सवर एक पोस्ट करत यामिनी कृष्णमूर्ती यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केलं आहे. यामिनी कृष्णमूर्ती यांच्या निधनाचं वृत्त हे चटका लावणारं आहे. यामुळे नृत्यविश्वाची कधीही भरुन न येणारी हानी झाली आहे. देव आपल्या सगळ्यांनाच या दुःखातून बाहेर येण्याची शक्ती देओ या आशयाची पोस्ट संगीत नाटक अकादमीने केली आहे. प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार यामिनी कृष्णमूर्ती काळाच्या पडद्याआड नृत्यविश्वावर शोककळा १९६८ मध्ये यामिनी कृष्णमूर्ती ( Yamini Krishnamurti ) यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्यानंतर २००१ मध्ये पद्मभूषण आणि २०१६ मध्ये पद्मविभूषण असे पुरस्कारही त्यांना मिळाले. देशातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या या तीन पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं. आज त्यांच्या जाण्याने नृत्यविश्व हळहळलं आहे. यामिनी कृष्णमूर्ती यांनी अ पॅशन फॉर डान्स हे आत्मचरित्र लिहीलं यामिनी कृष्णमूर्ती यांनी आत्मचरित्रही लिहिलं आहे ज्याचं नाव अ पॅशन फॉर डान्स असं आहे. यामिनी कृष्णमूर्ती यांनी भरतनाट्यमचे धडे त्यांचे गुरु एलप्पा पिल्लई यांच्याकडे गिरवले होते. तसंच वेदांत लक्ष्मीनारायण शास्त्री आणि वेणुगोपाल शर्मा यांच्या मार्गदर्शनात त्या कुचिपुडी नृत्यही शिकल्या. भरतनाट्यम, कुचिपुडी आणि ओडिसी अशा तिन्ही नृत्यप्रकारांवर त्यांचं प्रभुत्व होतं. नृत्याविष्कारातील भावनावेग, गती, लय, चैतन्या मोहकता यांचा संगम त्यांच्या कलेत दिसून आला. भारतातील प्रमुख शहरांमध्ये तसंच नेपाळ, ऑस्ट्रेलियासह इतर देशांमध्येही त्यांचे नृत्याचे कार्यक्रम झाले होते. यामिनी कृष्णमूर्ती यांचे शिष्य रामा वैद्यनाथन यांनी सांगितली आठवण यामिनी कृष्णमूर्ती यांचे शिष्य आणि प्रसिद्ध नर्तक रामा वैद्यनाथन यांनी त्यांची आठवण सांगितली. ते म्हणाले, "भरतनाट्यम हा त्यांचा श्वास होता. त्या भरतनाट्यम शब्दशः जगल्या आहेत. एकदा मी आणि यामिनी कृष्णमूर्ती ट्रेनने प्रवास करत होतो. मी अप्पर बर्थवर होतो आणि त्या लोअर बर्थवर. मध्यरात्री मला जाग आली त्यावेळी मी पाहिलं की त्या त्यांच्या बर्थवर बसल्या होत्या आणि अंधारात भरतनाट्यमच्या पुढच्या काही मुद्रा आणि तसंच त्यामध्ये काही बदल करता येतील का याबाबत विचार करत होत्या. भरतनाट्यम त्यांच्या रक्तात भिनलं होतं." ही आठवण त्यांनी पीटीआयला सांगितली.