अनेक दशकांपूर्वी भारतीय चित्रपटसृष्टीची पायाभरणी होत असताना दोन मराठी महिलांनी नाटक व चित्रपटांमध्ये दमदार भूमिका वठवल्या. दादासाहेब फाळके यांनी भारताचा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ बनवला होता. त्यात सर्व कलाकार पुरुषच होते आणि महिलांच्या भूमिकाही पुरुषांनीच साकारल्या होत्या. मात्र, जेव्हा फाळकेंनी त्यांच्या दुसऱ्या ‘मोहिनी भस्मासूर’ या चित्रपटाचं काम सुरू केलं, तेव्हा महिलांच्या भूमिकांसाठी महिलांनाच घ्यायचं, असं त्यांनी ठरवलं. याच शोधात ते रंगभूमीवरील कलाकार दुर्गाबाई कामत आणि त्यांची मुलगी कमलाबाई गोखले यांच्यापर्यंत पोहोचले. चित्रपटात दुर्गाबाईंनी ‘पार्वती’ आणि कमलाबाईंनी ‘मोहिनी’ची भूमिका साकारली होती.
कमलाबाईंनी चित्रपटात येण्यापूर्वीच नाटकात चांगले नाव कमावले होते. त्या काळातील लोकप्रिय कलाकारांपैकी त्या एक होत्या. ज्या काळात पुरुष व्यासपीठावर महिलांच्या भूमिका करायचे, त्या काळात कमलाबाईंनी अनेक नाटकांमध्ये पुरुषांच्या भूमिका साकारल्या आणि आपल्या नाटक कंपनीबरोबर देशभर प्रवास केला.
तिने माझ्या प्रेमापोटी घर सोडलं- कमलाबाई गोखले
कमलाबाई गोखले पुरुषाच्या भूमिका इतक्या हुबेहूब वठवायच्या की एका प्रयोगादरम्यान, एक विवाहित महिला कमलाबाईंना पुरुष समजून त्यांच्या प्रेमात पडली. ती महिला आपलं घर सोडून कमलाबाईंच्या मागे थेट धारवाडपर्यंत पोहोचली होती. १९९१ मध्ये रीना मोहन यांना दिलेल्या मुलाखतीत या विचित्र घटनेची आठवण कमलाबाईंनी सांगितली होती. “राजापूरमधील एक महिला मला पुरुष समजू लागली होती. मी ‘मानपमान’ नाटकामध्ये ‘धैर्यधर’ हे पुरुष पात्र साकारत होते, ती माझ्या प्रेमात पडली. तिने घर सोडलं आणि माझ्या मागे मागे थेट धारवाडपर्यंत आली,” असं कमलाबाई म्हणाल्या होत्या.
कमलाबाईंनी आपण महिला असल्याचं कसं पटवून दिलेलं?
आपण स्वतः एक स्त्री आहोत हे त्या महिलेला पटवून देण्यासाठी कमलाबाईंना एक वेगळा मार्ग शोधावा लागला. “ती मला भेटायला आल्यावर, मी तिच्या आणि माझ्या डोक्यावरची पगडी काढली. ती स्वतः पुरुषाच्या वेषात मला भेटायला आली होती. ती विवाहित स्त्री होती पण पळून आली होती. मी तिला एका खोलीत नेलं, तिथे आम्ही दोघींनी कपडे काढले. तेव्हा कुठे तिला सत्य समजलं, नाहीतर ती वेडी झाली असती.”
कमलाबाईंना अभिनेत्री व्हायचं नव्हतं, पण…
आपल्या आईप्रमाणेच कमलाबाईंनीही अभिनेत्री व्हायचं ठरवलं नव्हतं. पण परिस्थितीमुळे दोघींनाही आधी रंगभूमीवर आणि नंतर चित्रपटांमध्ये यावं लागलं. दुर्गाबाई छळ करणाऱ्या पतीला सोडून मुलीसह मुंबईत आल्या होत्या. आईच्या संघर्षाची आठवण सांगताना कमलाबाई म्हणाल्या होत्या, “माझे वडील वाईट होते. ते माझ्या आईला खूप मारहाण करायचे. पोट भरण्यासाठी माझ्या आईने वेश्याव्यवसायाऐवजी कला आणि संस्कृतीचा मार्ग निवडला.”
कमलाबाईंच्या पुढच्या पिढीने जपला अभिनयाचा वारसा
या कठीण प्रवासामुळेच दुर्गाबाई नाटकात आल्या आणि फाळकेंशी झालेल्या अचानक भेटीमुळे अभिनेत्री झाल्या. फाळके व दुर्गाबाई आणि कमलाबाईंची भेट झाली तेव्हा भारतीय चित्रपटसृष्टीची नुकतीच सुरुवात झाली होती. दुर्गाबाई कामत या भारतीय पडद्यावर दिसणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या, तर कमलाबाईंची ओळख भारतातील पहिल्या बाल अभिनेत्री म्हणून झाली. मात्र हा वारसा तिथेच थांबला नाही. कमलाबाईंनी सहा दशकांहून अधिक काळ अभिनय केला, तर त्यांचे सुपुत्र चंद्रकांत गोखले आणि नातवंडे विक्रम गोखले व मोहन गोखले यांनी कुटुंबाचा हा अभिनयप्रवास पुढे चालू ठेवला.
