Teejan Bai Passed Away: दिग्गज लोकगायिका तीजन बाई यांचे आज (रविवार, ५ जुलै २०२६) ला निधन झाले. त्या दीर्घ काळापासून आजारी होत्या. रायपूर येथील एम्स येथे त्यांना उपाचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्या ७० वर्षांच्या होत्या.

रायपूर येथील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी पीटीआयशी संवाद साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ मे पासून तीजन बाई यांच्यावर उपचार सुरू होते.

तीजन बाई छत्तीसगडच्या पारंपरिक पंडवानी लोककथा सादर करत असत. त्यांनी या लोककलेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. महाभारतातील प्रसंगांचे नाट्यमय पद्धतीने कथन करणे, गायन आणि वाद्यसंगीताच्या साथीने सादरीकरण करणारी पंडवानी ही छत्तीसगडची पारंपरिक लोककला आहे.

दुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तीजन बाई यांना छत्तीसगडच्या पारंपरिक पंडवानी लोककलेच्या प्रभावी आणि अग्रगण्य कलाकार म्हणून ओळखले जात होते. दमदार आवाज, स्टेजवर आत्मविश्वास व प्रभावीपणे वावरणे आणि भावपूर्ण सादरीकरणाच्या शैलीमुळे त्यांनी पंडवानी लोककलेला केवळ भारतातच नाही तर जगभरात पोहोचवले. त्यांचा संपूर्ण जगभरात चाहतावर्ग होता. देशातील सर्वोत्तम लोककलावंतपैकी एक म्हणून त्यांची ओळख होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली

तीजन बाई यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एक्सवर पोस्ट करत त्यांनी लिहिले, “सुप्रसिद्ध पंडवानी गायिका तीजन बाई यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. त्यांनी छत्तीसगढच्या या लोककलेला त्यांच्या भव्य सादरीकरणातून जगभरात एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या निधनानंतर कला व संस्कृतीच्या क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे जाण्याने कला व संस्कृतीच्या क्षेत्रातील जे नुकसान झाले आहे, ते नुकसान कधीही निघणार नाही”, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीजन बाईंना श्रद्धांजली वाहिली.

भारतीय लोककलेतील त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारने त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले होते. त्यांना भारत सरकारकडून १९८७ मध्ये पद्मश्री, २००३ मध्ये पद्मभूषण आणि २०१९ मध्ये ‘पद्मविभूषण’ या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.