Lata Mangeshkar Passes Away : भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लतादीदी यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे कुटुंबियांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला आणि लतादीदी या अनंतात विलीन झाल्या. लतादीदी यांना निरोप देण्यासाठी अलोट गर्दी शिवाजी पार्क परिसरात पाहायला मिळाली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पचक्र अर्पण करत लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच मंगेशकर कुटुंबियांना धीर देत त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, सचिन तेंडुलकर, श्रद्धा कपूर, शाहरुख खान, आमिर खान या सिनेसृष्टीतील दिग्गजांसह, राजकीय, क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी पुष्पचक्र अर्पण करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली.
लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यांना करोनाची सौम्यं लक्षणं जाणवत होती. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण उपचादारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
Lata Mangeshkar Passes Away : लता मंगेशकर यांच्या जाण्याने कलाविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या आठवणी शेअर केल्या जात असून अंत्यदर्शनासाठी सर्वसामान्यांसोबतच राजकीय नेतेही पोहोचत आहेत. शिवाजी पार्कात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
लतादीदी यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार
त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अलोट गर्दी पाहायला मिळाली
लतादीदींना तिन्ही दलांकडून मानवंदना, भारताचा राष्ट्रीय ध्वज हा मंगेशकर कुटुंबियांकडे सुपूर्द, अंत्यविधींना सुरुवात
लता मंगेशकर यांच्या पार्थिवावरील अंत्यविधीला सुरुवात, शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, शंकर महादेवन यांनी पुष्पचक्र अर्पण करत वाहिली श्रद्धांजली, लतादीदींना श्रद्धांजली अर्पण करताना सर्वच क्षेत्रातील मान्यवर भावूक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून पुष्पहार अर्पण करत लतादीदींना वाहिली श्रद्धांजली, तर सुप्रिया सुळे, शरद पवार, अजित पवार यांसह अनेक राजकीय दिग्गजांनी पुष्पचक्र अर्पण करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीही वाहिली श्रद्धांजली, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करत वाहिली श्रद्धांजली
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुष्पचक्र अर्पण करत लतादीदींना वाहिली श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पचक्र अर्पण करत वाहिली श्रद्धांजली, पंतप्रधान मोदींकडून मंगेशकर कुटुंबियांचे सांत्वन
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्क मैदानावर दाखल, लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत, पुष्पचक्र अर्पण करत वाहिली श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई विमानतळावर दाखल, काही मिनिटात शिवाजी पार्कमध्ये पोहोचणार


सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे शिवाजी पार्कवर दाखल
लतादीदी यांचे पार्थिव शिवाजी पार्कवर दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा शिवाजी पार्क मैदानावर पोहोचला
सचिन तेंडुलकर शिवाजी पार्कवर दाखल
लतादीदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार
शिवाजी पार्कवर लतादीदींच्या पार्थिवाचे सर्वसामान्यांना दर्शन करता येणार
लतादीदींच्या अंत्ययात्रेला सुरुवात
लतादीदींना निरोप देण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी
शिवाजी पार्कच्या मैदानावर होणार अंत्यसंस्कार
संध्याकाळी ६.३० च्या सुमारास होणार अंत्यसंस्कार
लतादीदींच्या अंत्ययात्रेला सुरुवात, अखेरचं दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी



नाशिक विद्यापीठाचा 07 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित एकविसावा दीक्षान्त समारंभ स्थगित करण्यात आला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहिर करण्यात आला आहे यामुळे सदर कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 07 फेब्रुवारी 2022 रोजी ऑनलाईन पध्दतीने संपन्न होणार होणार होता. राष्ट्रीय दुखवटयामुळे दीक्षांत समारंभाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाची पुढील तारीख कळविण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
लतादीदींनी जो अनुभव दिलाय तेव्हा त्यांचा तेजस्वी सूर, श्वास आणित्यांचा संगीतमय पाॅज आठवतो. त्या पाॅजही सुंदर घ्यायच्या. प्रत्येक ओळीतून पोहोचणारा भावही महत्त्वाचा असायचा. माझे जीवन त्यांनी समृद्ध केले. काळजाला भिडून जाणारा त्यांचा स्वर होता. – प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर,
स्वतंत्र भारतात जन्मलेल्या प्रत्येकाचे पोषण दोन कारणांनी होत होतं. मातेचे दूध आणि लतादीदींचा सूर. भारतीयांच्या जीवनातला एकही क्षण असा नाही की श्वासांबरोबर सोबतीला लताचा आश्वासक सूर नाही. हा सूर सर्वसामान्यांच्या जगण्यातला सांस्कृतिक विसावा होता. तो तसाच अविनाशी राहील. आकाशगंगेत आता अढळ ध्रुव ताऱ्यांच्या तितकाच अढळ सारथीदार आता विराजमान झाला आहे – ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर
लताजींचा आणि माझा प्रत्यक्ष असा फारसा संबंध आला नाही. पण, त्यांच्या आवाजामुळे त्या सतत माझ्याबरोबर आहेत. संगीताच्या क्षेत्रात न कळत माझं पाऊल पडलं होतं त्या काळात ज्या कलाकारांचे माझ्यावर संस्कार झाले त्यात बडे गुलाम अली खाँ, सिनेअभिनेत्री नूरजहाँ तशाच लताजीही होत्या. संगीत प्रस्तुतीमध्ये आवाजाचं माध्यम कसं असायला हवं, याची जाणीव या कलाकारांच्या स्वरांनी मला करून दिली. आवाजाची फेक, शब्दांचे उच्चार, भावनिर्मिती अशा किती तरी गोष्टींचा त्यामुळे मी विचार करायला लागले. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे संगीत ही मुळात एक कला आहे. ते केवळ शास्त्र नाही, हे ध्यानात घ्यायला हवं. शास्त्रीय संगीत हे शास्त्र दाखविण्यासाठी नसतं. तिथे राग सौंदर्याचं दर्शन होणं अपेक्षित असतं. लताजींचा आवाज, सादरीकरण यामुळे शास्त्रीय संगीताचा पोत, लालित्य, भाव अशा गोष्टींकडे कलाकार अधिक लक्ष देऊ लागले आहेत. लताजींचं गाणं हे खऱ्या अर्थाने भारताचं रत्न आहे. – ज्येष्ठ गायिका डाॅ. प्रभा अत्रे
भारतरत्न, गानसम्राज्ञी आणि माझ्या गुरु लता मंगशेकर यांच्या निधनाची माहिती समजताच मी बऱ्याच वेळापासून उदास होते. कुणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. लतादीदींकडून बरेच काही शिकले. मला त्यांच्याकडून खूप प्रेम मिळाले. एकही दिवस असा गेला नाही की मी त्यांचा आवाज ऐकला नाही. त्या माझ्या आयुष्याचा एक हिस्सा होत्या. वयाच्या पंधराव्या वर्षी मला त्यांच्यासोबत बंगाली गाणे गाण्याची संधी मिळाली. त्यांची आठवण म्हणजे मी त्यांच्यासाठी खूप गाणी डब केली. चित्रिकरणासाठी मी गात होते, त्याची कॅसेट लता मंगेशकर यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्या आवाजात अंतिम गाणे रेकाॅड होत होते. त्यांच्यासाठी मी खूप गाणी गायली असून माझ्यासाठी गाणे शिकवणारा अनुभव होता. या प्रक्रियेतून मी खूप काही शिकले. दर चित्रपटात मी लताजींबरोबर गाणे गायले. त्यांची सर्वच गाणी आवडती आहेत. त्यात देशभक्तीचे ऐ मेरे वतन के लिऐ बरोबरच अल्लाह तेरो नाम, इश्वर तेरो नाम हे सर्वधर्मसमभावाचे महत्व विषद करणारे त्यांनी गायलेले गाणेही फारच सुंदर आहे. अशा माझ्या आवडत्या व्यक्तीच्या जाण्याने मला खूप दुख झाले आहे. – पाश्वर्गायिका कविता कृष्णमूर्ती
लतादीदींचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीहून मुंबईत दाखल, थोड्याच वेळात शिवाजी पार्क या ठिकाणी पोहोचणार, संध्याकाळी ५.१५ ते ६ वाजता पंतप्रधान शिवाजी पार्क येथे दाखल होणार
लतादीदी अमर रहे, लतादीदींना अखरेचा निरोप देण्यासाठी चाहत्यांची रस्त्याच्या दुर्तफा गर्दी
लता मंगेशकर यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी रवाना, प्रभूकुंज ते शिवाजी पार्क असा लतादीदींच्या अखेरच्या प्रवासाला सुरुवात, संध्याकाळी ६.३० वाजता होणार अंत्यसंस्कार

भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, “आज (रविवार, ६ फेब्रुवारी) भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.”
लतादीदी यांचे पार्थिव थोड्याच वेळात लष्कराच्या सजवलेल्या गाडीतून शिवाजी पार्क येथे घेऊन जाण्यात येणार


भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
लतादीदी यांच्या पार्थिवावर प्रभूकुंज निवासस्थानाबाहेर पोलिसांचे बँडपथक सलामी देण्यात येणार आहे.


लता मंगेशकर यांचे पार्थिव थोड्याच वेळात अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्कात नेले जाणार, संध्याकाळी ६ नंतर अंत्यसंस्कार होणार,
पोलीस पथकाकडून मानवंदना देण्यात येणार,
विशेष बँडपथक प्रभूकुंज निवासस्थानी दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळात मुंबईसाठी रवाना होणार, शिवाजी पार्कवर जाऊन अंत्यदर्शन घेणार
लतादिदींच्या जाण्याने आयुष्य खर्या अर्थाने पोरकं झालं आहे. मायेची उब हरवल्याची जाणीव आज होते आहे. गेले काही दिवस त्या आजारी होत्या आणि त्यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा ते सत्य स्वीकारणं कठीण होतं. परंतु, काही गोष्टी अटळ असतात आणि त्या स्वीकाराव्या लागतात. तसंच लतादिदींचं जाणं आता मनाला स्वीकारावं लागतंय.
आपल्या घरात लहानपणापासून वडिलधार्यांचा सहवास जसा महत्त्वपूर्ण असतो. संगीतक्षेत्रात तेच अमूल्य महत्त्व लतादिदींचे होते. संगीतक्षेत्रातील माऊली सगळ्यांना पोरकं करून गेली. त्यांचं स्थान, योगदान, त्यांची गाणी कायम स्मरणात राहतील. त्या देहरुपातून गेल्या आहेत मात्र, आठवणी आणि गाण्यांमधून त्या सदैव आपल्यात राहतील. त्यांचे स्वर कायम सोबत राहतील, अशा शब्दात गायक आणि संगीतकार राहुल देशपांडे यांनी श्रद्धांजली वाहिली.
गानसम्राज्ञी लता मंगशेकर यांचे निधन ही दुखद बातमी आहे. मात्र ही बातमी संगीतक्षेत्रातील आम्हाला कुणालाही ऐकायचीच नव्हती. माझ्यासाठी हे वैयक्तिक नुकसान आहे. संगीतक्षेत्राचीही हानी आहे. त्यांचे या क्षेत्राला खूप मोठे योगदान आहे. त्या देशाची शान होत्या. भारतरत्न होत्या. गाणे कसे असावे, सूर कसे असावे हे शिकण्यासारखे होते. त्यांनी खूप पिढ्यांसोबत काम केले आणि त्यांच्याकडून बरेच गायक, संगीतकार खूप काही शिकले. आम्ही फार कमी भेटलो, पण जेव्हा भेटलो तेव्हा त्यांचे आशीर्वाद लाभले, अशा शब्दात पार्श्वगायिका साधना सरगम यांनी श्रद्धांजली वाहिली
पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात मुंबईसाठी रवाना होणार

राज ठाकरे त्यांच्या पत्नी आणि आई यांच्यासह प्रभूकुंज निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी दाखल


लतादीदींच्या जाण्यामुळे भारताचे सर्वात मोठे वैभव काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशी गायिका पुन्हा होईल असे वाटत नाही. गाणारे लोक अनेक आहेत पण लतादिदींसारखा आवाज, गाण्यातील भाव आणि संदेश हे दुर्मिळ आहे. भारतातील सर्व भाषांमधून गाणी गाणाऱ्या त्या एकमेव गायिका असाव्यात. त्यांनी गायलेली भक्तीगीते, भावगीते आणि देशभक्तीपर गीते ही सामान्य माणसांना आनंद आणि प्रेरणा देणारी होती. वेगवेगळ्या क्षेत्रात कष्ट करणाऱ्या श्रमिकांनी थकल्यानंतर लतादीदींचे गाणे ऐकले किंवा त्यांचा आवाज कानावर पडला की, क्षणात श्रमपरिहार होत असे.लतादीदींचा आणि माझा अनेक वेळा भेटण्याचा प्रसंग आला. त्यांच्या हस्ते मिळालेला जीवन गौरव पुरस्कार हा जीवनातील सर्वाधिक आनंदाचा क्षण होता.
पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार मिळाला तेव्हाही एवढा आनंद झाला नसेल. त्यांनी गायिलेले ‘ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहिद हुए हैं उनकी, जरा याद करो कुर्बानी’ हे गीत विसरणे कदापि शक्य नाही. हे गीत ऐकताना पंतप्रधानांच्या आणि उपस्थितांच्याही डोळ्यात पाणी आले होते. आजही ते गीत ऐकताना डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. हे गाणे ऐकून लाखो लोकांच्या मनात देशभक्तीची प्रेरणा जागृत होते.भगवतगीतेत श्रीकृष्णाने म्हटल्याप्रमाणे ‘अंतःकाळी जो माझे नामस्मरण करतो त्याचा पवित्र आत्मा मलाच येऊन मिळतो’ याप्रमाणे लतादिदींना चिरशांती मिळालेलीच आहे यात शंका नाही. लतादिदींना भावपूर्ण श्रद्धांजली, असे अण्णा हजारे म्हणाले.
भारतीय संघाकडून काळी फित बांधून लतादीदींना श्रद्धांजली
माझ्या संगीत क्षेत्रातील कामाची सुरुवातच मुळात लतादिदींबरोबर, त्यांच्या आशीर्वादाने झाली. खळेकाकांचे एक गीत होते, 'राम भजन कर मन' ते लतादिदींनी गायले आणि त्यात मी वीणा वाजविली होती. त्यामुळे सुरुवातच संगीत क्षेत्रातील 'देवा'बरोबर झाली आणि आज मी जो काही आहे तो त्यांच्या आर्शिवादामुळेच. माझ्यासाठी त्या देवासारख्या आहेत. माझ्या वाढदिवसाला त्यांनी मला सोन्याची गणपतीची मूर्ती दिली होती. ती मूर्ती माझ्या देव्हाऱ्यात असून मी रोज त्या मूर्तीची पूजा करतो. त्यामुळे या मूर्तीच्या रूपाने माझ्या डोक्यावर त्यांचा हात कायम असणार आहे. दिदींशी माझे नियमित फोनवर बोलणे व्हायचे. अलीकडे आम्ही व्हाट्सअपवरून जास्त संवाद साधायचो. त्यांना मोबाइल तंत्रज्ञानाची बरीच माहिती होती. अनेक व्हिडिओ त्या मला एडिट करून पाठवायच्या. माझी काही गाणी पाठवली की भरभरून कौतुक करायच्या; मस्त इमोजी पाठवायच्या. त्यांच्याशी होणारा हा संवाद आता शक्य नाही. पण त्यांच्या गाण्यातून, आठवणीतून हा संवाद अविरत सुरू राहील. त्या आपल्यातून गेल्या असल्या तरी प्रत्येकाच्या मनात आहेत आणि राहतील, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी व्यक्त केली.
सचिन तेंडुलकर, आदित्य ठाकरे, बाळा नांदगावकर, अनिल देसाई, जावेद अख्तर, अनुपम खेर यांसह दिग्गज व्यक्ती प्रभूकुंज येथे दाखल, पोलीस पथकाकडून पार्थिवाला मानवंदना देण्यात येणार
शिवाजी पार्क बंदोबस्त व व्यवस्था
-बंदोबस्ताला १० हजार पेक्षा जास्त पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करणार
– उद्यान गणेश मंदिराशेजारी स्टेजचे बांधकाम सुरु, तेथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
– त्याच्या बाजूला १० मीटर अंतरावर अंत्यविधी होणार
– समोर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी स्टेज
– शिवाजी पार्क मैदानाशेजारी नो पार्किंग झोन करणार, रस्त्यावर गाड्या उभ्या करण्यास बंदी
– परिसरातील मार्गांवर वाहतूकीचे निर्बंध लावणार, एक हजार वाहतूक कर्मचारी शिवाजीपार्क, दादर, माहिम, प्रभादेवी परिसरात तैनात राहणार
– सावरकर स्मारकात प्रमुख अतिथी थांबवण्याची व्यवस्था करणार, आदित्य ठाकरेंनी महापालिका, पोलीस अधिकाऱ्यासह स्मारकाची पाहणी केली
– प्रमुख राजकीय नेत्यांना उद्यान गणेश मंदिरा शेजारच्या प्रवेशद्वारातून प्रवेश मिळणार
– पोलिसांकडून शिवाजी पार्क परिसरात तात्पुरते नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार
पंतप्रधानांसह अनेक व्हिआयपी मंडळी उपस्थित राहणार असल्यानं सुरक्षेच्या प्रोटोकॉलमुळे अंत्यविधीच्या कार्यक्रमात बदल,
शिवाजी पार्कमध्येच अंत्यसंस्कार होणार,
सर्वसामान्यांनाही अंत्यदर्शन घेता येणार,
शिवाजी पार्कच्या जिमखाना गेट येथून सर्वसामान्यांना प्रवेश दिला जाणार,
तर उद्यान गणेश येथून व्हीआयपींना प्रवेश
लतादीदींचे पार्थिव 'प्रभूकुंज' निवासस्थानी दाखल, अनेक दिग्गज अंत्यदर्शनासाठी दाखल
आशुतोष गोवारीकर , जावेद आख्तर, अनुपम खेर यांसह सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज प्रभुकुंजवर दाखल,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल


लतादीदींचं निवासस्थान प्रभूकुंजबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे

लतादीदी यांचे पार्थिव ब्रीच कँडी रुग्णालयातून प्रभूकुंज या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. साधारण दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर शिवाजी पार्कवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
“लता मंगेशकर यांच्या निधनामुळे केवळ मीच नाही तर संपूर्ण देशभरातील लोकांच्या मनात जी वेदना होत आहे, तिचे शब्दांमध्ये वर्णन करणे कठीण आहे. भगवंत त्यांच्या कुटुंबास हे दु:ख सहन करण्याचे धैर्य प्रदान करो. मी माझ्याकडून आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दांमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Lata Mangeshkar Passes Away : …आता तो आनंदघन बरसणार नाही – सरसंघचालक
जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!, असे ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे शिवाजी पार्कवर दाखल,
आदित्य ठाकरेंकडून अंत्यसंस्काराच्या तयारीचा आढावा
सुरक्षा व्यवस्थेसह व्हिआयपी एंट्री या सर्व स्थितीचा आढावा
गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगशेकर यांचे निधन ही सर्वात दुखद घटना आहे. या संगीतक्षेत्रातील मोठी हानी असून एक पोकळीच निर्माण झाली आहे. स्वरसम्राज्ञी एकच होती आणि एकच राहणार. मी माझ्या मूळ गावी असताना लहानपणी त्यांचे गाणे ऐकत असे आणि पुढे जाऊन त्यांचासोबत गाणे गाण्याची संधीही मिळेल हे मला वाटलेच नव्हते. हे मी माझे भाग्य समजतो. मुंबईला आलो तेव्हा संघर्षाच्या काळात त्यांच्याशी भेट झाली. त्यांची एक आठवण कायम राहिल अशी आहे. त्यांच्यासोबत अनेक स्टेज शो केले. १९९२ मध्ये माझ्या वाढदिवशी बेंगलुरुमध्ये त्यांच्यासोबत गाण्याचा शो होता. समोर लाखो श्रोते होते. तेव्हा लता मंगेशकर यांनी मला भेट म्हणून सोन्याची चैन दिली आणि सर्व श्रोत्यांसमोर प्रिन्स ऑफ सिंगिंग अशी एक उपाधीही दिली. त्यांचे त्यावेळी आशीर्वादही मिळाले व ते कायम राहिले. मी त्यांच्यासोबत २०० गाणी गायली आहेत. डर, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, दुश्मन यासह अनेक चांगल्या चित्रपटात त्यांच्यासोबत गाण्याची संधी मिळाली, अशा शब्दात ज्येष्ठ पार्श्वगायक उदित नारायण यांनी प्रतिक्रिया दिली.
लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.
लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या. लता मंगेशकर यांचे मूळ नाव हेमा असे ठेवण्यात आले होते. पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांनी लता नाव ठेवल्याचे म्हटले जाते.