सलमान आणि सोनम कपूरचा आगामी चित्रपट ‘प्रेम रतन धन पायो’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी हे दोन्ही कलाकार अनेक ठिकाणी दौरे करण्यात सध्या व्यस्त आहे. सलमानच्या इतर चित्रपटांप्रमाणे हा चित्रपटदेखील १०० कोटी क्लबमध्ये वर्णी लावतो की नाही हे थोड्याच दिवसात कळेल. मात्र, त्यापूर्वी या चित्रपटातील काही अशा गोष्टी जाणून घेऊया ज्या तुम्हाला क्वचितच माहित असतील.
१. राजश्री प्रोडक्शनची निर्मिती असलेला ‘प्रेम रतन धन पायो’ हा भावनिक-कौटुंबिक चित्रपट असल्याचे म्हटले जातेय. पण या चित्रपटातील तीन दृश्यांना सेन्सॉर बोर्डाने कात्री लावल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे. या चित्रपटात ‘चिनार’ शब्दाचा उल्लेख काढण्यात आला आहे. तसेच, चित्रपटातील अंताक्षरी सिक्वेन्सदेखील कापण्यात आला. धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये यासाठी एक गाणे बदलण्यासही सांगण्यात आल्याचे कळते.
२. या चित्रपटाची कथा १८९४ साली प्रसिद्ध झालेल्या अॅन्थनी होप यांच्या ‘द प्रिझनर ऑफ झेंडा’ या नोवेलपासून प्रेरित असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी या नोवेलवर तीनदा चित्रपट काढण्यात आले असून ते १९३७, १९५२ आणि १९७९ साली प्रदर्शित झाले होते.
३ ‘जलते दिये’ या रोमॅण्टिक गाण्यासाठी जवळपास ७००० दिवे सेटवर लावण्यात आले होते. या गाण्याचे चित्रीकरण होईपर्यंत हे दिवे जळत राहावेत म्हणून त्याकरिता १५० माणसांना तैनात करण्यात आले होते.
४. सूरज बडजात्या आणि सलमान यांच्यात घनिष्ठ मैत्री आहे. ‘हम साथ साथ है’ चित्रपटानंतर आता तब्बल १६ वर्षांनी हे दोघे एकत्र काम करत आहेत. चित्रपटातील बिहाइन्ड द सीन्स व्हिडिओमध्ये सलमानने सांगितले की, केवळ १७-१८ व्या वर्षी सूरजने ‘मैने प्यार किया’ची कथा लिहली होती. ‘हम आप के है कौन’च्या वेळी तो २५ वर्षांचा होता तर ‘हम साथ साथ है’ च्या प्रदर्शनावेळी सूरजचे वय २९ वर्ष होते.
५. ‘प्रेम रतन धन पायो’च्या कथेवर सूरज काम करत असल्यामुळे सलमानने चार वर्षात कोणताही कौटुंबिक चित्रपट हाती न घेतल्याचा खुलासा सूरजने केला.
येत्या दिवाळीत ‘प्रेम रतन धन पायो’ प्रदर्शित होत आहे.