अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांसाठी ट्रोलिंग नवं नाही. त्यांच्या एखाद्या वक्तव्यापासून ते त्यांच्या लूकपर्यंत नेटकरी त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात. बऱ्याचदा एखाद्या गोष्टीवरून कलाकारांना ट्रोल केलं जातं. या ट्रोलिंगबद्दल काही कलाकार मौन बाळगणं पसंत करतात, तर काही जण मोकळेपणाने बोलतात. अशातच आता दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाने ट्रोलिंगबद्दल त्याचं मत व्यक्त केलंय.

‘लायगर’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान विजयने ट्रोलिंग आणि तो स्वतः ट्रोल्सचा कसा सामना करतो, याबद्दल खुलासा केला. तो म्हणाला, “ट्रोलिंग हा नेहमीच आपल्या आयुष्याचा भाग राहिला आहे. ट्रोलिंग हे फार कॉमन असून ती अगदी रोजची गोष्ट आहे. मी अभिनेता होण्याआधी, जवळचे नातेवाईक किंवा शेजारी-पाजारी राहणारे काका-काकू निकाल, कॉलेज, नोकरी इत्यादींबद्दल ट्रोल करायचे आणि आता इंडस्ट्रीत आल्यावर नेटकरी सोशल मीडियावर ट्रोलिंग करतात. यात नवं काहीच नाही. खरं तर काहीही असो, पण ट्रोलिंग नेहमीच होत असते.”

हेही वाचा – दाक्षिणात्य चित्रपट समीक्षकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, धनुष, विजय देवरकोंडाने वाहिली श्रद्धांजली

विजय देवरकोंडाचा ‘वर्ल्ड फेमस लव्हर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी झाला होता. त्यानंतर आता ‘लायगर’ चित्रपटातून तो जोरदार कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. या सध्या तो याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली असून या चित्रपटातून विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट असून यात विजय देवरकोंडा मिक्स्ड मार्शल आर्ट्स फायटरच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात अनन्या पांडेही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये विजय आणि अनन्याशिवाय रम्या कृष्णन, रोनित रॉय आणि मकरंद देशपांडे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.