मुंबई : एकांकिका स्पर्धेतून नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यासाठी युवा रंगकर्मींना मंच उपलब्ध होत असतो. यामुळे आपल्या आजूबाजूला जे घडते आहे, त्याविषयी आपल्या मनात उमटणारी प्रतिक्रिया, आपल्याला जे अस्वस्थ करणारे आहे, आपल्या जे भिडणारे आहे ते एकांकिकांमधून बेधडकपणे मांडायला हवे, असे मत दिग्दर्शक अभिराम भडकमकर आणि अद्वैत दादरकर यांनी ‘लोकसत्ता रंगसंवाद’ या वेबसंवादात व्यक्त केले.

‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेल्या युवा रंगकर्मींना एकांकिकांचे स्वरूप, लेखन-दिग्दर्शन-अभिनय- नेपथ्य अशा विविध अंगांचे बारकावे याविषयी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने ‘लोकसत्ता रंगसंवाद’ या वेबसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसीय वेबसंवादात लेखक, दिग्दर्शक, पटकथा लेखक अभिराम भडकमकर आणि लेखक, दिग्दर्शक अभिनेते अद्वैत दादरकर यांनी युवा रंगकर्मींना मोलाचे मार्गदर्शन करण्याबरोबरच एकांकिका आणि रंगमंचीय सादरीकरण यांचे विविध पैलू समजावून सांगितले. युवा रंगकर्मींनी उत्स्फूर्तपणे विचारलेले प्रश्न आणि मान्यवरांनी त्यावर दिलेली समर्पक उत्तरे हे या वेबसंवादाचे वैशिष्ट्य ठरले. अद्वैत दादरकर यांच्याबरोबर झालेल्या ‘रंगसंवाद’ या कार्यक्रमासाठी झी टॉकीज हे नॉलेज पार्टनर होते.

एकांकिकांच्या माध्यमातून स्वतःला हवे ते मांडता येते, पुढे व्यवसायिक नाटक करताना एकांकिकांसारखे प्रयोग करता येतीलच असे नाही. त्यामुळे स्वतःच्या भवतालाचा शोध घ्या, जे वाटते ते खरेपणाने मांडा. प्रामाणिक आणि मनापासून केलेल्या कामात प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याची ताकद असते, असे मत अद्वैत दादरकर यांनी मांडले. तर एकांकिकांसाठी संहिता लेखन करताना आपल्या आजूबाजूला जे घडते आहे, त्याविषयी आपल्या मनात उमटणारी प्रतिक्रियांची अभिव्यक्ती कथेतून व्हायला हवी तरच प्रेक्षक त्या एकांकिकांशी जोडले जातात, असे मत अभिराम भडकमकर यांनी व्यक्त केले.

Award Banner

कलामाध्यमात औपचारिक शिक्षण महत्त्वाचे ठरते. मात्र, चौफेर वाचन, चित्रपट-नाटक पाहणे, मान्यवरांचे विचार ऐकणे अशा विविधांगी पद्धतीच्या अनौपचारिक अभ्यासातूनही कलाजाणिवा प्रगल्भ होत असतात. एकांकिका हे अशा अनौपचारिक शिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. यामुळे युवा रंगकर्मींनी जास्तीत जास्त स्पर्धांमधून सहभाग घेत अनुभव घ्यावा, असा सल्ला अभिराम भडकमकर यांनी युवा रंगकर्मींना दिला.

नाटक ही सांघिक कला आहे. यासाठी चित्रकला, संगीत, नृत्य, वाचन यांसह अनेक कलांचा आस्वाद घ्यायला, त्या अभ्यासायला शिका. नाट्यक्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांनी नाटके पाहायला हवीत, वाचायला हवीत. मराठी रंगभूमीचा इतिहासही माहिती असायला हवा. कलाकार म्हणून तयारी करताना अभ्यासाचे महत्त्व पटवून देतानाच अद्वैत दादरकर यांनी माणसे बघणे हा रियाज आहे हेही अधोरेखित केले.