महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातील युवावर्गाला जोडणारा, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देत त्यांच्या करिअरचा पाया घालणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका स्पर्धा’ उपक्रमाचा जागर दोन वर्षांनी पुन्हा एकदा सुरू झाला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांत राज्यभरातील नाटय़कर्मी आणि नवोन्मेषाने रंगभूमीवर काही करू पाहण्यासाठी धडपडणारे युवक यांना जोडणारी नाटय़ चळवळच उभी राहिली आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेविषयी नाटय़कर्मीना काय वाटते हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

‘बोलीभाषांमधील गोडी अनुभवता आली’
‘लोकसत्ता’सारखे नामांकित व्यासपीठ असल्यामुळे लोकांकिका स्पर्धेला नेहमीच मानाचे स्थान असते आणि ही स्पर्धा एकांकिकाविश्वात महत्त्वाची ठरते. स्पर्धकांनीसुद्धा या स्पर्धेला विशेष महत्त्व देऊन आजवर या स्पर्धेत दर्जेदार सादरीकरण केले आहे. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणाई येऊन एकांकिकांचे सादरीकरण करत असल्यामुळे एकांकिकांच्या विषयांमध्ये वैविध्यता असते, हे एक परीक्षक म्हणून मला जाणवले आहे. सर्वसमावेशक असे विषय स्पर्धकांनी हाताळले आहेत. याचसोबत प्रेक्षकांना लोकांकिका स्पर्धेतील एकांकिकांच्या माध्यमातून विविध प्रांतांतील बोलीभाषांमधील वेगळेपण आणि गोडी अनुभवता आली. प्रत्येकाला स्पर्धेमध्ये स्वत:ला सिद्ध करायचे असते आणि त्यासाठी जी चढाओढ होते, ती खूप महत्त्वाची असते. ती चुरस आणि चढाओढ लोकांकिका स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असते. या स्पर्धेला नेहमीच तरुणाईचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून स्पर्धेचा माहोल हा छान राहिला आहे. – विजय केंकरे

Chess Candidates 2024, World Championship contender, D Gukesh, Gukesh
अनुभवात कमी, रँकिंगमध्ये खाली…तरीही कँडिडेट्स स्पर्धेत गुकेश कसा ठरला विजयी? आनंदप्रमाणे जगज्जेता बनण्याची शक्यता किती?
candidates chess gukesh beat abasov
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश पुन्हा संयुक्त आघाडीवर; प्रज्ञानंदने नेपोम्नियाशीला बरोबरीत रोखले; कारुआनाकडून विदितचा पराभव
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
Hapus mango, problems before Hapus mango,
लहरी निसर्गाचा फटका, कर्नाटककडून स्पर्धा, कीडरोगाचा धोका… ‘कोकणचा राजा’ हापूस आंब्यासमोर आणखी किती संकटांची मालिका?

‘स्पर्धेला जनमानसामध्ये महत्त्वाचे स्थान’
‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा मुलांना एक राज्यव्यापी व्यासपीठ मिळवून देते. नाटय़ क्षेत्रातील आणि दूरदर्शन चित्रपट क्षेत्रातील मान्यवर या स्पर्धेमध्ये प्रेक्षक म्हणून हजेरी लावतात. यामुळे गुणी विद्यार्थी कलावंतांना दिग्गजांचे मार्गदर्शन मिळत असते आणि या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांना व्यावसायिक मनोरंजन क्षेत्रात संधी मिळू शकते. आयोजनातील सातत्यामुळे आणि परीक्षणाच्या दर्जामुळे गेली काही वर्ष ही स्पर्धा तरुणांमध्ये तसंच जनमानसामध्ये एक महत्त्वाचं स्थान मिळवू शकली आहे. स्पर्धकांनीसुद्धा आजवर या स्पर्धेला महत्त्व देऊन या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद दिला आहे. यामुळे या वर्षीसुद्धा आणखी जास्त चांगल्या एकांकिका पाहायला मिळतील याची मला तरी खात्री आहे. तर एक परीक्षक म्हणून मला मुलांचा उत्साह आणि त्यांचे प्रामाणिक प्रयत्न गेली काही वर्षे जाणवत आले आहेत. या स्पर्धेतील एकांकिकांच्या आशयातील वैविध्य आणि सादरीकरणातील व्यावसायिकता चकित करणारी असते. विशेषत: मुंबई किंवा पुण्याव्यतिरिक्त जी केंद्रे आहेत, तेथील विद्यार्थी कोणत्याही सोयीसुविधा नसताना ज्या तन्मयतेने प्रयत्न करत असतात ते कौस्तुकास्पद आहेत. – अजित भुरे

‘तरुणाईची सळसळती ऊर्जा..’
विविध सामाजिक उपक्रमांसोबत ‘वक्ता दशसहस्र्षु’ वक्तृत्व स्पर्धा आणि ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा हे दोन ‘लोकसत्ता’चे सांस्कृतिक उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. ‘लोकसत्ता’सारखे महत्त्वाचे वृत्तपत्र या स्पर्धा आयोजित करत असल्यामुळे त्यांना निश्चितच एक महत्त्व प्राप्त होते. या दोन्ही स्पर्धामध्ये मी परीक्षक म्हणून सहभागी झालो आहे. मी लोकांकिकामध्ये विविधांगी विषयांवरच्या एकांकिका पाहिल्या आहेत आणि त्यांच्या लेखक व दिग्दर्शकांसोबत आजही संपर्कात आहे. निरनिराळय़ा विषयांवर आधुनिक स्वरूपातील लेखन एकांकिकांसाठी झालेलं आहे आणि तरुणाईची ही सळसळती ऊर्जा रंगभूमीचा भविष्यातील काळ बळकट करणारी आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर लोकांकिका स्पर्धेचे उत्तम व्यवस्थापन केले जाते आणि एकांकिका बघण्यासाठी मनोरंजनसृष्टीतील सर्व मान्यवर एकत्र येतात, याचे मला कौतुक वाटते. करोनामुळे आपण सर्वानी दोन वर्षे ही घुसमटीच्या आणि निराशाजनक वातावरणात घालविली आहेत. अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयातसुद्धा जाता आले नाही. त्यामुळे यंदाच्या एकांकिकांचा आशय हा जीवनाकडे सकारात्मक पद्धतीने पाहणारा असेल. याचसोबत यंदाच्या लोकांकिका स्पर्धेतून एक नवा दृष्टिकोन, ऊर्जा आणि उत्साह पाहायला मिळेल, असे मला वाटते. – चंद्रकांत कुलकर्णी

‘उत्तम व्यवस्थापन’
लोकांकिका स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी मला परीक्षणाची संधी मिळाली आणि उत्तम अशा व्यवस्थापनामुळे ते स्पर्धेचं पहिलं वर्ष आहे, असं मुळीच जाणवलं नाही. लोकांकिका स्पर्धेला स्पर्धक विशेष महत्त्व देऊन उत्साहाने व मेहनत घेऊन एकांकिका सादर करतात. यामुळे दरवर्षी स्पर्धेत खऱ्या अर्थाने चुरस वाढते व स्पर्धेचा माहोल अत्यंत छान अनुभवायला मिळतो. नेपथ्याच्या बाबतीत बोलायचं तर प्रकाशयोजना व नेपथ्य हे दिलेल्या वेळेत कसं करता येईल याकडे व त्यासंबंधित गुणांकडे स्पर्धक विशेष लक्ष देत असतात. कुठेही भपकेबाजपणा पाहायला मिळत नाही आणि ते बरोबरही आहे. नेपथ्याचं फार ‘अवडंबर’ न करता, अगदी सोपं – साधं नेपथ्य उभारण्याकडे स्पर्धकांचा कल असतो. – प्रदीप मुळय़े

मुख्य प्रायोजक-सॉफ्ट कॉर्नर
सहप्रायोजक-झी युवा, टुगेदिरग
पॉवर्ड बाय-इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड
साहाय्य-अस्तित्व
टॅलेंट पार्टनर-आयरिस प्रॉडक्शन