चैताली जोशी

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही हिंदी सिनेमांमध्ये नव्या जोडय़ांचे पेव फुटले आहे. या नव्या जोडय़ा सिनेमांसाठी यशाचा हिट फॉम्र्युला ठरेल का, हे या जोडय़ांची नवलाईच सांगू शकते.

गेल्या वर्षी हिंदी सिनेमांमधलं वैविध्य लक्ष वेधून घेणारं होतं. सरसकट सगळे सिनेमे चांगले नसले तरी काहींनी त्यांची दखल घ्यायला लावली. असे काही सिनेमे होते ज्यांच्याकडून खूप अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात मात्र त्याचं काहीच झालं नाही. तर ज्यांच्याकडून अपेक्षा नव्हती त्यांनी बाजी मारली. ‘दंगल’ने सगळ्यात शेवटी एंट्री घेऊन षटकार मारला. तर काही सिनेमांनी नव्या जोडय़ांना आणून जुनाच ट्रेण्ड नव्याने पुन्हा आणला. अनेक सिनेमांमध्ये नायक-नायिकेच्या अशा जोडय़ा एकत्र आल्या ज्यांनी यापूर्वी कधीच एकत्र काम केलं नाही. पण या नव्या जोडय़ांच्या सिनेमांपैकी मोजक्या सिनेमांनी चमक दाखवली, तर काही ढेपाळले. हाच नव्या जोडय़ांचा जुना ट्रेण्ड याही वर्षी दिसून येत आहे. आगामी अनेक सिनेमांमध्ये नव्या जोडय़ा बघायला मिळणार आहेत. यातल्या बऱ्याचशा सिनेमांची नावं आकर्षक वाटत असली तरी ते प्रदर्शित झाल्यावर कितपत अपेक्षेला खरे उतरतात ते लवकरच कळेल.

सुशातसिंग राजपूत या अभिनेत्याने त्याचं अभिनयकौशल्य वेळोवेळी सिद्ध केलं आहे. तो चर्चेत असतो ते त्याच्या सिनेमांमुळे नाही तर त्याच्या अंकिता लोखंडे या अभिनेत्रीसोबत असलेल्या प्रेमप्रकरणामुळे. पण मध्यंतरी तो चर्चेत होता ते क्रिती सनन या अभिनेत्रीसोबत त्याच्या जोडलेल्या नावामुळे. त्याचं झालं असं, ‘राबता’ या सिनेमात ते दोघं एकत्र काम करीत आहेत. त्यावरून त्यांच्या लिंकअप्सच्या चर्चा सुरू झाल्या. आता यात खरं किती, खोटं किती ते दोघंच जाणो. तूर्तास ही चर्चा थांबली आहे. पण या चर्चेच्या निमित्ताने दोघं एकत्र एका सिनेमात येत आहेत ही बातमी पुढे आली. हा सिनेमा रोमँटिक सिनेमा असेल. ही नवी रोमँटिक जोडी त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कितपत खुलवतेय हे सिनेमा बघितल्यावरच समजेल. गेल्या वर्षी रणदीप हुडा आणि काजल अग्रवाल या जोडीचा दो लफ्जों की कहानी हा रोमॅँटिक सिनेमा प्रदर्शित झाला होता. या नव्या जोडीकडूनही चांगल्या अपेक्षा होत्या. पण तसं काही झालं नाही. त्यामुळे येणाऱ्या सिनेमांकडून खरं तर अपेक्षा करायलाच नकोत.

चेतन भगत आता लेखक कमी आणि सिनेमांचा कथा-पटकथा लेखक जास्त वाटतो. आता तो कोणतंही पुस्तक लिहिताना एखाद्या सिनेमासाठीच तो लिहितोय असंच वाटू लागलंय. टू स्टेट्स या पुस्तकावर आधारित टू स्टेट्स हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तो सज्ज झालाय ते त्याच्या ‘हाफ गर्लफ्रेण्ड’ या पुस्तकावर आधारित ‘हाफ गर्लफ्रेण्ड’ या सिनेमासाठी. त्याच्या पुस्तकांवर आधारित असलेले सिनेमे देखणेच असायला हवेत असा कदाचित छुपा नियम असावा. म्हणूनच हाफ गर्लफ्रेण्डसाठीसुद्धा त्यांनी नवी कोरी जोडी निवडली आहे. दोन कपूर्स. अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर हे दोघे पहिल्यांदा या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. ‘हाफ गर्लफ्रेण्ड’ ही कादंबरी अनेकांची वाचून झाली असेल. पण त्यावरील सिनेमा कसा असेल याचा अंदाज आता बांधणं अवघड आहे.

‘मेरी प्यारी बिंदू’ या आगामी सिनेमाचं टीझर आता प्रदर्शित झालं असलं तरी याबद्दलची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. परिणीती चोप्राने तिच्या आवाजात एका गाण्याच्या दोन ओळी गाऊन त्याचा व्हिडीओ मध्यंतरी सोशल साइटवर पोस्ट केला होता. तेव्हापासून असा एक सिनेमा येणार आहे अशी बातमी मिळाली. त्यांतर दोन आठवडय़ांपूर्वी याच सिनेमाचं ‘माना के हम प्यार नही’ हे परिणीती चोप्राने गायलेलं गाणं प्रदर्शित झालं. या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळाला. आणखी एका कारणासाठी या सिनेमाची चर्चा आहे, ती म्हणजे यातली जोडी. परिणीती चोप्रा आणि आयुषमान खुराना ही नवी कोरी जोडी यामध्ये दिसणार आहे. त्यामुळे परिणीतीने गायलेलं गाणं, ही नवी जोडी हा सिनेमाचं आकर्षण ठरलेलं आहे. आता ही आकर्षणं या सिनेमाला यशस्वी करण्यात पुरेशी ठरतात का हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. या सिनेमाबरोबरच आयुषमान खुरानाचा आणखी एक सिनेमा या वर्षी प्रदर्शित होणार आहे. ‘बरेली की बर्फी’ या सिनेमात तो क्रिती सननसोबत दिसणार आहे. आयुषमानने आत्तापर्यंत केलेल्या त्याच्या प्रत्येक सिनेमात वेगवेगळ्या नायिका आहेत.
गेल्या वर्षी नव्या जोडय़ांचे अनेक सिनेमे प्रदर्शित झाले. त्यापैकी काही बॉक्स ऑफिस हिट झाले तर काही आशयघन असूनही बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. सुलतान हा बॉक्स ऑफिस हिट ठरला. आता या हिट होण्यामागे यातली जोडी कारणीभूत आहे की साक्षात सलमान खान हे वेगळं सांगायला नकोच. दुसरीकडे वजीर, एअरलिफ्ट, रुस्तम हे सिनेमे चांगले ठरले पण सुलतान इतकं बॉक्स ऑफिस हिट ठरले नाहीत. त्यातल्या त्यात

एअरलिफ्टने त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या मोहेंजोदारो या सिनेमाला चांगली टक्कर दिली. बाकी सिनेमांना मात्र चमक दाखवता आली नाही. नव्या जोडय़ा म्हणून त्या सिनेमांबद्दल आकर्षण वाटत होतं. पण, त्या आकर्षणाचा फारसा उपयोग झाला नाही. ‘की अ‍ॅण्ड का’ या सिनेमाचा विषय चांगला होता. पण तरी तो ओके ओके या वर्गातच फिट्ट बसला. ‘घायल वन्स अगेन’, ‘रॉक ऑन टू’, ‘फोर्स टू’ हे सिक्वेल्स कधी आले कधी गेले हे कळलंही नाही. तीच गत ‘फितूर’, ‘बागी’, ‘बँजो’ आणि ‘बार बार देखो’ या सिनेमांची. वर्षांच्या शेवटी आलेला ‘बेफिक्रे’ हा सिनेमाही गंडला. थोडक्यात काय तर गेल्या वर्षी आलेल्या नव्या जोडय़ांचे सिनेमे काही अपवाद वगळता त्यांची जादू दाखवू शकले नाहीत.

यावर्षी येणाऱ्या सिनेमांमध्ये आणखी एक वैशिष्टय़ दिसून येतंय. ते म्हणजे त्या सिनेमांची नावं. ‘टॉयलेट’, ‘टय़ुबलाइट’, ‘रिलोडेड’, ‘ड्राइव्ह’, ‘मुबारका’, ‘बादशाहो’ अशी एकापेक्षा एक भन्नाट नावं आहेत. शीर्षकं जरा कॅची म्हणजे लक्ष वेधून घेणारी असली की सिनेमाकडेही प्रेक्षक वळतात असं बॉलिवूडकरांचं साधं, सोपं गणित आहे. हेच गणित या वर्षी पुन्हा एकदा ही मंडळी आजमवताना दिसत आहेत. या हट के शीर्षकांसोबतच काही सिनेमांमध्ये नव्या जोडय़ाही दिसणार आहेत. सिनेमाकडे वळण्याचं हे आणखी एक कारण. टॉयलेट-एक प्रेमकथा या सिनेमात अक्षय कुमार भूमी पेडणेकर या नायिकेसोबत दिसणार आहे. ‘दम लगा के हैशा’ या सिनेमातून पदार्पण केलेल्या भूमीने अनेकांची वाहवा मिळवली होती. त्यानंतर मात्र ती कुठल्याच सिनेमात दिसली नाही. थोडा ब्रेक घेऊन आता ती पुन्हा मोठय़ा पडद्यावर दिसायला सज्ज झाली आहे. तापसी पन्नूने ‘पिंक’ या सिनेमात चोख काम केलं. तिचं कौतुकही झालं. नुकताच प्रदर्शित झालेला ‘नाम शबाना’ या सिनेमाला मात्र संमिश्र प्रतिसाद मिळाला. तिच्या हिंदी सिनेमांची सुरुवात एका हलक्याफुलक्या सिनेमाने झाली होती. त्यानंतर मात्र तिने मोजके सिनेमे केले. पण आता पुन्हा ती एका हलक्याफुलक्या विषयाच्या सिनेमातून एका नव्या हिरोसोबत दिसणार आहे. वरुण धवनसोबत ती ‘जुडवा टू’ या सिनेमात दिसेल. १९९७ साली आलेला ‘जुडवा’ या सिनेमाचा हा दुसरा भाग. तापसीसह या सिनेमात जॅकलिन फर्नाडिसही झळकणार आहे. पण, जॅकलिन आणि वरुण धवनने याआधी ‘ढिशूम’ या सिनेमात एकत्र काम केलं आहे.

या वर्षी जॅकलिन फर्नाडिस दोन नव्या साथीदारांसोबत दोन सिनेमांमध्ये झळकणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘रिलोडेड’ या सिनेमात तर सुशांतसिंग राजपूतसोबत ‘ड्राइव्ह’ या सिनेमात ती दिसणार आहे. गेल्या वर्षीच्या जॅकलिनच्या सिनेमांमध्ये ती फारशी चमक दाखवू शकली नव्हती. तिचा एकही सिनेमा गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर हिट ठरला नाही. या वर्षी तिचे चार सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे तिचे हे सिनेमे काय जादू दाखवतील हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. कोणत्याही बडय़ा स्टारच्या मुलाने किंवा मुलीने सिनेसृष्टीत पदार्पण केलं की तो चर्चेचा विषय ठरतो. तशीच चर्चा झाली होती अथिया शेट्टी हिने अर्थात सुनील शेट्टीच्या मुलीने पदार्पण केल्यानंतर. ‘हिरो’ या तिच्या पहिल्या सिनेमानंतर आता ती ‘मुबारका’ या सिनेमातून झळकणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अर्जुन कपूर आणि इलिआना डिक्रूज हे दोघेही असतील. त्यामुळे हे आगळं वेगळं त्रिकूट यात दिसेल. इलिआना डिक्रूजचा आणखी एक सिनेमा या वर्षी प्रदर्शित होणार आहे. ‘बादशाहो’ या सिनेमात तिचा साथीदार असेल अजय देवगण. इलिआना आणि अजय ही जोडीही यंदा नव्या जोडय़ांपैकी एक आहे.

एकुणात, यंदाही मागच्या वर्षीसारखे नव्या जोडय़ांचे सिनेमे बरेच आहेत. मुद्दा आहे की ते बॉक्स ऑफिस आणि आशयाच्या पातळीवर कितपत खरे उतरतात हा. पूर्वी हिट जोडय़ांचे सिनेमे हिट व्हायचे. तसंच एखादी हिट जोडी घेऊन सिनेमेही केले जायचे. म्हणूनच श्रीदेवी-अनिल कपूर, अनिल कपूर-जुही चावला, धर्मेद्र-हेमा मालिनी, अमिताभ बच्चन-रेखा, माधुरी दीक्षित-संजय दत्त, शाहरुख खान-काजोल अशा अनेक जोडय़ा आजही लोकप्रिय आहेत. पण, आता भर असतो तो प्रयोगशीलतेवर. यातलाच एक प्रयोग म्हणजे हट के जोडय़ांना एकत्र आणून सिनेमा करणं. यामागे आणखी एक महत्त्वाचं कारण आहे. नव्या जोडय़ांमध्ये नायक आणि नायिकेच्या वैयक्तिक पातळीवर असणाऱ्या चाहत्यांची संख्या खूप असते. या दोघांचे चाहते एकत्र आले की त्यांची संख्या मोठी असते. याचा फायदा सिनेमाला होतो. हा सगळा विचार या नव्या जोडय़ांच्या प्रयोगावर केलेला असला तरी या नव्या जोडय़ांची नवलाई कितपत टिकते हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com
@chaijoshi11

सौजन्य – लोकप्रभा