रेश्मा राईकवार

‘दिल दिमाग और बत्ती’ हे पडद्यावर झळकणारं चित्रपटाचं शीर्षक आणि त्याबरोबरीने वाजणारं पार्श्वसंगीत इथपासूनच आपल्या डोक्यात आठवणींच्या काही फिल्मी तारा जुळायला लागतात. सत्तर – ऐंशीच्या दशकात बनलेले मेळय़ात हरवलेल्या दोन-दोन-तीन-तीन भावंडांची रंजक कथा सांगणारे अनेक लोकप्रिय चित्रपट आपल्याला आठवायला लागतात. त्याकाळी चवीने पाहिल्या गेलेल्या या चित्रपटांचा विडंबन अवतार म्हणजे हृषीकेश गुप्ते दिग्दर्शित ‘दिल दिमाग और बत्ती’ हा चित्रपट. जुन्या चित्रपटांचं स्मरणरंजन आणि मराठीतील नावाजलेल्या कलाकारांना एका वेगळय़ा अभिनय-मांडणी शैलीत पाहण्याची संधी देणारा हा आगळा प्रयोग आहे.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
albatya galbatya 3d movie coming soon vaibhav mangle play Chinchi Chetkin Role
रंगभूमी गाजवल्यानंतर रुपेरी पडद्यावर 3D मध्ये पाहायला मिळणार ‘अलबत्या गलबत्या’ चित्रपट, ‘हा’ अभिनेता दिसणार चेटकिणीच्या भूमिकेत
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

विडंबन साहित्य हा प्रकार आपल्याकडे खूप लोकप्रिय आहे, त्या तुलनेत एखाद्या लोकप्रिय फॉम्र्युलाबाज चित्रपटांचे विडंबन किंवा त्याची आजच्या काळात केलेली रंजक मांडणी पाहण्याची संधी मिळणं तसं दुर्मीळ. मराठीत मनमोहन देसाई शैलीतील नव्हे पण घोळात घोळ कथानक आणि पात्रं घेऊन केलेले यशस्वी मराठी चित्रपट अनेक आहेत. धनंजय माने इथेच राहतात का?.. सारखे मीम्स आजच्या काळातही भुरळ घालणारे, अनेक कलाकारांचा फौजफाटा असलेले विनोदी चित्रपट आपल्याकडे झाले आहेत. मात्र जत्रेत हरवलेले दोन भाऊ, नशिबाने किंवा दैवाने केलेला घात, मग नवरा एकीकडे आणि बायको दुसरीकडे .. त्यानंतर योगायोगांची एक मालिकाच सुरू होते. अगदी साईंच्या दरबारात आईच्या अंध डोळय़ात दृष्टी येते आणि तिला तिची मुलं परत भेटतात असं काहीसं अतक्र्य कथानक असलेल्या चित्रपटांचा मराठीत खुसखुशीत समाचार घेण्याचा विचार करणारा ‘दिल दिमाग और बत्ती’ हा पहिलाच प्रयोग म्हणता येईल. अर्थात त्याचं श्रेय हे लेखक – दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते यांचं आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द दिग्दर्शक मनमोहन देसाई आणि त्यांच्या रंजक चित्रपटांना दिलेली ही सलामी आहे, असं दिग्दर्शकाने चित्रपटाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या चित्रपटाची सुरुवातही मनमोहन भुलाभाई देसाई नामक व्यक्तीपासून होते. कोण्या एका ज्योतिषाने या देसाईंना त्यांच्या पत्रिकेत सिनेमा योग असल्याने पुत्र विरहाचा योग असल्याचं भाकीत वर्तवलं आहे. प्रत्यक्षात देसाई त्यांचा हरवलेला घरजावई अमिताभला शोधतायेत. त्यांची मुलगी जया, तिची तिन्ही मुलं अमर, दिलीप आणि ज्योती यांच्यापासून कथेला सुरुवात होते. मग वर म्हटल्याप्रमाणे या तिन्ही भावंडांची ताटातूट, त्यांचं वेगवेगळय़ा जागी लहानाचं मोठं होणं, त्यांचा स्वतंत्र गोतावळा या उपकथानकालाही आणखी काही उपकथानकं जोडली गेली आहेत. त्यामुळे मूळ कथेचे हे सगळे छोटेमोठे धागे आणि त्यांना पुढे नेण्यासाठी उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा या सगळय़ा अजब गोष्टीचा गजब मेळ घालत दिग्दर्शकाने ‘दिल दिमाग और बत्ती’ रंगवला आहे.

चित्रपटाच्या शीर्षकापासूनच आपल्याला या कथेतून नेमके काय दाखवायचे आहे, याबद्दल लेखक – दिग्दर्शकाने स्पष्टता ठेवली आहे. साहित्यविश्वात प्रसिध्द असलेल्या लेखक ह्रषीकेश गुप्ते यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. त्यांनी आत्तापर्यंत लिहिलेल्या कथा – कादंबऱ्यांपेक्षा या सिनेमाच्या कथेची जातकुळी पूर्ण भिन्न आहे. विरोधाभासाची ही सुरुवात बहुधा इथूनच होत असावी, पण हे गोंधळनाटय़ मुळात संहितेत त्यांनी चपखल उतरवलं आहे, शिवाय दिग्दर्शनातही नवखेपणा जाणवत नाही. चित्रपटाची मांडणी त्याच्या विषयानुषंगाने भडक असणं साहजिक आहे. मात्र कलाकारांच्या अभिनयामुळे हेही आव्हान सुसह्य झालं आहे. विडंबन अनुषंगाने चित्रपटाची मांडणी करताना पूर्वार्ध बऱ्यापैकी रेंगाळला आहे. अनेक व्यक्तिरेखांचं येणं आणि कथेत स्थिरस्थावर होणं यात पूर्वार्ध निघून जातो, त्या तुलनेत उत्तरार्धात गोष्टी खूप वेगाने होत असल्याने कुठेही कंटाळा येत नाही. गाण्यांची रचना करतानाही ‘कर्ज’ किंवा त्याच्यापेक्षा अलीकडचे उदाहरण घ्यायचे तर ‘कभी हाँ कभी ना’ चित्रपटातील गाण्यांची हमखास आठवण येते. जुन्या चित्रपटातील लोकप्रिय गाण्यांचे तुकडे पार्श्वसंगीत म्हणून इतके खुबीने पेरले आहेत की आपण सहज त्यांच्या आठवणींशी जोडले जातो. या चित्रपटाच्या कथेनुरूप संगीत देण्याचे काम अवधूत गुप्ते यांनी चोख बजावले आहे. पण इतकी सगळी भट्टी जमून आलेला हा चित्रपट विनोदाच्या मात्रेत प्रचंड कमी पडला आहे. चित्रपटात एकापेक्षा एक गमतीदार घटना घडत जातात, मात्र त्यातली गंमत आपल्याला हसून हसून पुरेवाट करत नाही. तेवढय़ापुरती काही क्षण आपले रंजन करतात.

दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, किशोर कदम, सोनाली कुलकर्णी या दिग्गज कलाकारांना एका वेगळय़ाच रूपात पाहण्याची संधी या चित्रपटाने दिली आहे. सातत्याने गंभीर आणि आशयपूर्ण भूमिकांमधून काम करणारी ही कलाकार मंडळी या विडंबन प्रयोगातही तितकीच समरस झाली आहेत. आनंद इंगळेंचा इरसाल नमुना असलेला दिग्दर्शक यात भाव खाऊन जातो. त्या तुलनेत मयूरेश पेम, सागर संत, संस्कृती बालगुडे, सखी गोखले या नव्या दमाच्या कलाकारांच्या व्यक्तिरेखा जुन्यांच्या तुलनेत कमी प्रभावीपणे उतरल्या आहेत. पुष्कर श्रोत्रीचा अमिताभ आणि धर्मेद्रही अफलातून आहे. बाकी अमिताभ, धर्मेद्र, जया, हेमा, रेखा.. अशा अनेक व्यक्तिरेखा, त्यांचे वास्तवातील संदर्भ आणि सिनेमात त्याचा गंमत केलेला म्हणून उलटसुलट वापर अशा चिवित्र गोष्टींची रेलचेल या चित्रपटात आहे. विनोदी शैलीतील चित्रपटाचा एक वेगळा प्रयोग म्हणून दिमाग बाजूला ठेवत दिलसे चित्रपट पाहिला तर बत्ती अगदीच गुल होणार नाही.

दिल दिमाग और बत्ती

दिग्दर्शक – हृषीकेश गुप्ते

कलाकार – दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, किशोर कदम, सोनाली कुलकर्णी, वैभव मांगले, आनंद इंगळे, मेघना एरंडे, पुष्कर श्रोत्री, सागर संत, सखी गोखले, पुष्कराज चिरपुटकर, मयूरेश पेम आणि संस्कृती बालगुडे.