व्हॅलेंटाइन विशेष, सौजन्य – 

प्रेम कसं करायचं या प्रश्नावर अनेकांचं उत्तर असतं बॉलीवूडमधल्या हीरो हीरॉइन्ससारखं.. बॉलीवूडमधल्या ज्या प्रेमकहाण्यांवर आजवर अनेक प्रेमकहाण्या घडल्या, तरल्या त्या बॉलीवूडमधलेच ऑल टाइम रोमँटिक सिनेमे…
प्रेम ही एक अशी गोष्ट आहे, ज्याची खरी मजा तुम्ही स्वत: प्रेमात पडल्यानंतरच येते असं म्हणतात. प्रेमाच्या नुसत्या कल्पनेनेही मन भावनिक होऊन एका वेगळ्या विश्वात भरारी घ्यायला लागतं. सर्वानाच आपल्या आयुष्यातील पहिलं प्रेम कधीही न विसरता येणारं असतं. काळ बदलला तशा प्रेमाच्या आणि प्रेम व्यक्त करण्याच्या संकल्पनाही बदलल्या, पण तरीही त्यामागची भावना मात्र तीच कायम राहिली. या प्रेमाचे वेगवेगळे आविष्कार आत्तापर्यंत आपल्याला अनेक चित्रपटांमधून पाहायला मिळाले. काळानुरूप बदलत जाणारी प्रेमाची संकल्पना आणि त्याचं प्रकटीकरण चित्रपटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्यात आलंय. या वर्षी चित्रपट पाहून व्हॅलेन्टाइन डे साजरा करायचा तुमचा मूड असेल तर जरा खाली दर्शविलेले चित्रपट आवर्जून बघाच, कारण या भारतीय चित्रपटांमधून तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला आपल्या मनातील गोष्ट कशी सांगायची याच्या काही चांगल्या टिप्स मिळू शकतात. शेवटी प्रत्येक भारतीय चित्रपटात रोमान्स ठासून भरलेला आहे. तेव्हा प्रोग्रॅम बनवा आणि आपल्या व्हॅलेन्टाइनसोबत पूर्ण दिवस एन्जॉय करा.


प्यासा :
परिस्थितीचे धक्केखाणारा एक वैफल्यग्रस्त कवी आणि त्याला समजावून घेऊ पाहणारी एक वारांगना यांच्यातील ही प्रेम कहाणी म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अजरामर गाथा आहे. गुरुदत्त यांनी दिग्दíशत केलेला हा चित्रपट आपल्याला एका अनोख्या प्रेमभावनेचे दर्शन घडवतो. कविमनाच्या एका कलाकाराला परिस्थितीमुळे येणारी व्याकूळता आणि प्रेमासाठी असणारी त्याची ओढ याचं सुंदर चित्रण या चित्रपटात केलं आहे. वहिदा रेहमान आणि गुरुदत्त यांच्यातील अंगभूत अभिनयकौशल्यामुळे ही प्रेमकथा एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचते. दोन भिन्न सामाजिक परिस्थितीतून आलेल्या प्रेमी जिवांची ही एक तरल रोमँटिक कहाणी असलेला हा चित्रपट अनेक प्रेमी युगुलांसाठी फारच प्रेरणादायी ठरलेला आहे.


मुघल-ए-आजम :
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा चित्रपट म्हणजे एक अतिभव्य प्रेमकथा. क्लासिक म्हणून गणल्या गेलेल्या के. आसिफ यांच्या या चित्रपटात सलीम आणि अनारकली यांच्यातील उत्कट प्रेम अतिशय तरल पद्धतीने दाखवण्यात आलंय. दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्यातील प्रेमसंबंध चित्रपटात विलक्षण पद्धतीने चित्रित करण्यात आले आहेत. प्रेमी युगुलामध्ये प्रेमासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा जेव्हा जेव्हा आपण उल्लेख करतो, तेव्हा तेव्हा प्रत्येकाला या चित्रपटाची आठवण होणे स्वाभाविक आहे. अभिनयाव्यतिरिक्त या चित्रपटातील गाण्यातील अदाकारी, प्रेमभावना आणि मानवी नातेसंबंध याविषयीचे महत्त्व अधोरेखित करतात. अनेकांना हा चित्रपट प्रेरणा देऊन जातो आणि खऱ्या अर्थाने प्रेम या संकल्पनेचे वेगवेगळे पलू आपल्यासमोर मांडतो.


आंधी :
प्रेम हे वय आणि काळ याच्या पुढे असतं, असं मत मांडणारा गुलजार यांचा हा चित्रपट प्रेमाविषयीचे रूढ संकेत मोडून त्यापुढे जाण्याचा प्रयत्न करतो. अनेक वर्षांपूर्वी परिस्थितीमुळे वेगळं व्हावं लागणारे दोन प्रेमी अचानकपणे पुन्हा भेटतात आणि त्यांचे प्रेम पुन्हा बहरते. त्याच आवेषाने आणि त्याच प्रेमभावनेने ते एकमेकांचा सहवास एन्जॉय करू पाहतात.


बॉबी :
नुकत्याच तारुण्यात पदार्पण केलेल्या एका अवखळ मुलीची (िडपल) आणि एका उमद्या तरुणाची (ऋषी कपूर) ही रोमँटिक प्रेमकथा. ऐन तरुण वयात एकमेकांच्या प्रेमात असलेले हे जोडपे, प्रेमाला कुठलेही बंधन नसते हेच या चित्रपटात सांगण्याचा प्रयत्न करतात. अनेक अडचणींवर मात करत नि:स्वार्थी प्रेम कसं यशस्वी होतं हे दाखवून देणारी ही एक अत्यंत उत्कट भावस्पर्शी प्रेमकथा. हम तुम एक कमरे मे बंद हो.. म्हणत गाणारी ही जोडी चित्रपटसृष्टीमध्ये रोमँटिक जोडी म्हणून अत्यंत हिट ठरली.


दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे :
श्रीमंत पण थोडासा बिघडलेला एक तरुण, एका तरुण, सुंदर आणि परंपरावादी मुलीच्या प्रेमात पडतो, आणि तिच्या प्रेमासाठी जगाशी लढा द्यायला सज्ज होतो. रोमँटिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या यश चोप्रा बॅनरचा चित्रपट असल्यामुळे यात तुम्हाला अस्सल भारतीय संस्कृतीतील प्रेमाचा आविष्कार पाहायला मिळतो. प्रेमात असणारी उत्कटता, एकमेकाविषयी असणारी प्रेमभावना, आपल्या नात्यामधील विश्वास, त्यासाठीचा करावा लागणारा त्याग आणि आपल्या प्रेमासाठी दोघांनाही करावा लागणारा अंतिम संघर्ष प्रत्येकाला मंत्रमुग्ध केल्याशिवाय राहात नाही. बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खानला या चित्रपटामुळे रोमँटिक हीरो म्हणून जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढी कुणालाही मिळाली नसेल. या चित्रपटामुळे शाहरूख खान आणि काजोल या रोमँटिक जोडीचं एक समीकरणच रूढ झालं.


लम्हे :
यश चोप्रा यांनी दिग्दíशत केलेला हा चित्रपट काळाच्या खूपच पुढचा होता. प्रेमसंबंधीचे काही नवीन पलू या चित्रपटाने आपल्यासमोर मांडले. आई नि मुलीवर एकाच वेळेस प्रेम करणारा एक तरुण यात दाखवला होता. या चित्रपटात प्रेमाच्या नेहमीच्या संकल्पनांनाच छेद दिला आहे आणि त्यानिमित्ताने प्रेम कुणावर करावं आणि करू नये? किंवा प्रेम एकावरच करावं की अनेकांवर? असे काही नवीन प्रश्नही उपस्थित केले आहेत. कथेतील या वेगळेपणामुळे अनेकांनी त्या वेळेस भुवया उंचावल्या होत्या. पण यश चोप्रा यांचे परिपक्व दिग्दर्शन आणि अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या उत्तम अभिनयामुळे हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीत एक उत्तम प्रेमकथा म्हणून सर्वाच्या लक्षात राहतो.


हम दिल दे चुके सनम :
उत्कटता, बेभानता आणि प्रेमासाठी असलेली समर्पणाची भावना या सर्व भावनांचा मिलाप संजय लीला भन्साली यांच्या या चित्रपटात अतिशय उत्तमपणे केल्याचे आपल्याला दिसेल. नंदिनी (ऐश्वर्या राय) आणि समीर (सलमान खान) यांच्यातील ही एक सुंदर प्रेमकथा आहे. भारतीय सभ्यता आणि परंपरा यांच्यापुढे प्रेम ही भावना दुय्यम आहे असे वाटत असतानाच, नंदिनी आपलं लग्न झालेलं असतानाही आपल्या प्रियकराच्या शोधात परदेशात जाते, पण आपल्या पतीसोबत प्रवास करत असताना खरं प्रेम काय असतं याचा तिला साक्षात्कार होतो. प्रेमभावनेचे अनेक पदर आणि नात्यांचे अनेक वेगवेगळे पलू या चित्रपटातून आपल्या समोर येतात. या चित्रपटातील संगीत खूपच लोकप्रिय झालं होतं.


कुछ कुछ होता है :
अनेक तरुण-तरुणींना हा चित्रपट आपल्या स्वत:शी पडताळून पाहता येईल, कारण अनेकांना यात आपल्या ‘बेस्ट फ्रेंड’मध्ये आपलं प्रेम दिसून येईल. तरुणाई, कॉलेजविश्व, प्रेम आणि मत्री यातील खरी गंमत या चित्रपटात आपल्याला अनुभवायला मिळते. तरुणांना रोज दिसणाऱ्या, अनुभवता येणाऱ्या घटना या चित्रपटात असल्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने आजच्या तरुणाईचं प्रतिनिधित्व करतो. दिग्दर्शक करण जोहर याने अतिशय कल्पकतेने तरुणाईला आवडणारा विषय आणि ही मत्रीपूर्ण प्रेमकथा हाताळली आहे.


आशिकी-२ :
तरुण पिढीला या चित्रपटाच्या गाण्यांनी अक्षरश: वेड लावलं होतं. राहुल जयकर (आदित्य रॉय कपूर) आणि आरोही शिर्के (श्रद्धा कपूर) यांच्यातील ही एक म्युझिकल रोमँटिक कहाणी आहे. दोघांमधील प्रेम-द्वेष, त्यांचे व्यावसायिक यश-अपयश आणि एकमेकांच्या स्वभावाच्या असलेल्या मर्यादा याची जेव्हा एकमेकांना जाणीव व्हायला लागते तेव्हा त्यांना अनेक पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो. खऱ्या प्रेमासाठी आसुसलेल्या या प्रेमी जोडप्याने केलेला एकमेकांसाठीचा त्याग हा प्रेमामधील महत्त्वाचा गुण या चित्रपटात अधोरेखित होतो.


हम आपके है कौन :
सूरज बडजात्या दिग्दíशत या चित्रपटात आपल्याला मोठय़ा घराण्यातील पारंपरिक वातावरण पाहायला मिळतं. एकत्र कुटुंब पद्धतीत लहानाचा मोठा झालेला प्रेम (सलमान खान) आपल्या वहिनीची बहीण निशाच्या (माधुरी दीक्षित)च्या प्रेमात पडतो. सुसंस्कारित घरात फुलणारं त्यांचं प्रेम अनेक कसोटय़ांमध्ये अखेर पास होतं. घरातील मोठय़ांचा आदर आणि स्वत:पलीकडे जाऊन आपल्या घराचा केलेला विचार भारतीय संस्कृतीचं मोठेपण सिद्ध करतं. अत्यंत कौटुंबिक वातावरणात घडणारी एक तरल प्रेमकहाणी असं या चित्रपटाचं वर्णन करता येईल.


साथिया :
मणिरत्नम यांच्या मूळ तमिळ चित्रपटाची ही िहदी आवृत्ती. डॉक्टर असलेली सुहानी (राणी मुखर्जी) आणि एक बिनधास्त मुलगा आदित्य (विवेक ओबेरॉय) एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि मग लग्नही करतात. लग्नापूर्वीचं त्यांचं प्रेम आणि लग्नानंतरचं प्रेम यात जमीन-अस्मानचा वास्तववादी फरक असतो. मग एकमेकांचे इगो प्रॉब्लेम्स आणि त्यातून मग वेगळं होणं. हे सगळं झाल्यानंतरही एकमेकांचं असलेलं प्रेम काही कमी झालेलं नसतं. शेवटी हे प्रेमच त्यांना पुन्हा एकत्र येण्यास भाग पाडतं. कितीही संकटं आली आणि कुठल्याही परिस्थितीत राहायची वेळ आली तरी खरं प्रेम जिंकतंच, असा संदेश हा सिनेमा देतो. थोडक्यात, एका अल्लड प्रेमाकडून परिपक्व नात्याकडे होणारा हा प्रवास प्रेमी जोडप्यांनी आवर्जून पाहावा असाच आहे.


टाइमपास :
सध्या सर्वच सिनेमागृहांमध्ये जोरात चालू असलेला रवी जाधव दिग्दíशत हा मराठी चित्रपट, शाळा संपवून नुकत्याच कॉलेजमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थीवर्गामध्ये अतिशय लोकप्रिय झाला आहे. भिन्न आíथक स्तर असलेल्या दोन प्रेमी जिवांची (दगडू आणि प्राजक्ता) ही कथा तितक्याच मनोरंजकपणे पडद्यावर दाखवण्यात आली आहे. आपल्याला आवडणाऱ्या मुलीचं प्रेम मिळवण्यासाठी काय वाटेल ते बिनधास्तपणे करणारा दगडू तरुण मुलांसाठी एक प्रेरणास्थान आहे. त्याची रांगडी भाषा आणि मनामध्ये असणारं हळवं प्रेम सर्वानाच अपील करतं.