बॉलिवूड अभिनेता सलमान खानला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. हे प्रकरण त्याची निर्मिती असणाऱ्या ‘लवयात्री’ चित्रपटाशी संबंधित आहे. ‘लवयात्री’ या चित्रपटाविरोधात गेले वर्षभर कोर्टात खटला सुरु होता. सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल देताना या चित्रपटाचे नाव, यातील गाणी व दृश्य यासंबंधी आता कोणालाही एफआयआर नोंदवता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. तसेच सलमान खानविरोधात कोणतीही कारवाई केली जाणार नाही असेही न्यायालयाने सांगितले आहे. चित्रपटामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असा दावा करत काहीजणांनी सलमान खानविरोधात न्यायालयात धाव घेतली होती.

काय आहे प्रकरण ?

लवयात्री हा चित्रपट गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे नाव सुरुवातीला ‘लवरात्री’ असे ठेवण्यात आले होते. परंतु या चित्रपटाच्या नावावरुन गुजरातमध्ये आक्षेप घेतला गेला. त्यानंतर चित्रपटाचे नाव बदलून ‘लवयात्री’ असे ठेवण्यात आले. चित्रपटाचे नाव नवरात्री या सणाशी मिळते जुळते असल्यामुळे गुजराती लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे सांगत काही मंडळींनी सलमान विरोधात कोर्टात खटला दाखल केला होता. पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. परंतु गेले वर्षभर सुरु असलेल्या या प्रकरणाचा निकाल अखेर सलमानच्या बाजूने लागला आहे.