९० आणि २०००च्या दशकातील अनेक मुलांचा आवडता शो म्हणजे ‘MAD’. जुन्या वस्तूंपासून भन्नाट गोष्टी तयार करण्यापासून ते मोठमोठी चित्रं काढण्यापर्यंत या शोमधून मुलांना दर रविवारी काहीतरी नवीन शिकायला मिळायचं. हरून रॉबर्ट उर्फ रॉब या शोमुळे घराघरात पोहोचला. मात्र, शो बंद झाल्यानंतर रॉब नेमका कुठे गेला, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. विशेष म्हणजे, हरूनच्या आई-वडिलांची इच्छा होती की त्याने डॉक्टर व्हावं. त्याचे वडील इंडियन एअरलाइन्समध्ये काम करत होते, तर आजोबा अमेरिकन दूतावासात कार्यरत होते. त्यामुळे हरूनने मेडिकलची प्रवेश परीक्षा द्यावी, अशी कुटुंबाची अपेक्षा होती.
हरूनने ‘Motor Mouth’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “माझ्या आई-वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. मी सायन्सचा विद्यार्थी होतो आणि मेडिकलची प्रवेश परीक्षा दिली होती. त्याचदरम्यान माझा एक मित्र आर्ट्स कॉलेजमध्ये प्रवेश घेत होता. ते पाहून मलाही तिथे जाण्याची इच्छा झाली.” पुढे तो म्हणाला, “यामुळे घरी बरंच नाट्य झालं. माझे आई-वडील खूप नाराज झाले होते. अगदी ‘३ इडियट्स’सारखं वातावरण झालं होतं. शेवटी मात्र त्यांनी माझं म्हणणं मान्य केलं.” रॉबला दिल्लीच्या कॉलेज ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागली. त्याने सांगितलं की, अनेकांनी त्याच्या वडिलांना ही परीक्षा सोपी नसल्याचं सांगितलं होतं. मात्र, रॉबने पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास केली, त्यामुळे त्याच्या वडिलांनाही आश्चर्य वाटलं.
‘असा’ मिळाला मॅड शो
रॉबला स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक वर्षाची संधी मिळाली. त्याने मेहनत घेतली आणि चित्रकलेचं कौशल्य सुधारत राहिला. त्याच्या कलेची दखल घेतली जाऊ लागली आणि त्यातून त्याला पैसेही मिळू लागली. रॉबने सांगितलं की, “त्या काळात मी सहज महिन्याला १,००० रुपयांपर्यंत कमाई करत होतो.” पुढे तो म्हणाला की, तो शिकत, वाचत, काम करत आणि कमाईही करत असल्याचं वडिलांनी पाहिलं. त्यामुळे त्यांनीही त्याला या क्षेत्रात पुढे जाण्याची परवानगी दिली. “शेवटी पालकांना आपल्या मुलाने आनंदी असावं असंच वाटतं,” असं रॉबने सांगितलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर हरून मुंबईत आला. काही आठवड्यांतच त्याला एका शोसाठी कलाकाराची गरज असल्याचं समजलं. हीच संधी पुढे पोगोवरील त्याच्या प्रसिद्ध ‘MAD’ शोमध्ये बदलली.
‘Cyrus Says’ या पॉडकास्टमध्ये रॉबने सांगितलं की, ‘MAD’ शो करण्यासाठी त्याला तयार होण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागले. सुरुवातीला त्याने आपल्या अॅनिमेशनची सीडी घेऊन निर्मात्यांची भेट घेतली. मात्र, कॅमेऱ्यासमोरही यावं लागणार असल्याचं समजताच तो तिथून निघून गेला. अनेकदा फोन केल्यानंतर तो पुन्हा गेला. दिलेली स्क्रिप्ट त्याला जमली नाही, त्यामुळे त्याने स्वतःची स्क्रिप्ट आणि प्रॉप्स तयार करून ऑडिशन दिलं. अखेर त्याची निवड झाली. रॉबला बराच काळ आपण किती लोकप्रिय झालो आहोत, याची कल्पनाच नव्हती. त्याने सांगितलं की, “त्यावेळी सोशल मीडिया नव्हता. शो लोकप्रिय झाला आहे, हे मला बराच काळ कळलंच नाही.” विशेष म्हणजे, शो सुरू झाला तेव्हा रॉबच्या स्वतःच्या घरी टीव्हीही नव्हता. त्यामुळे त्याला स्वतःचा ‘MAD’ शो पाहण्यासाठी मित्राच्या घरी जावं लागायचं.
शोच्या पहिल्या सीझननंतर एका कार्यक्रमासाठी रॉब चेन्नईला गेला होता. तिथे स्टेजवर पोहोचताच शेकडो मुलांनी त्याचं नाव घेत त्यावा आवाद दिला. तेव्हा आपण मुलांमध्ये किती लोकप्रिय झालो आहोत, याची त्याला खरी जाणीव झाली. त्याच्या लोकप्रियतेमुळे अनेक मजेशीर प्रसंगही घडायचे. रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर काही जण त्याच्याकडे स्ट्रॉ देत “कुछ बनाके दिखाओ” असं म्हणायचे. कधी तो त्यांचं मनोरंजन करायचा, तर कधी नम्रपणे नकार द्यायचा.
रॉबने ‘MAD’ का सोडला आणि गोव्यात का गेला?
‘MAD’ शो सोडल्यानंतर रॉब गोव्यात राहायला गेला. सध्या तो पत्नी आणि दोन मुलांबरोबर तिथे राहतो. मुंबईतील धावपळीच्या आयुष्यातून दूर जाऊन शांत वातावरणात राहण्याची इच्छा असल्याचं त्याने सांगितलं. इंटरनेटमुळे कुठूनही काम करता येत असल्याने गोव्यात राहण्याचा निर्णय घेतल्याचंही त्याने सांगितलं. त्याची पत्नी गोव्याची असल्याने हा निर्णय घेणं त्यांना योग्य वाटलं. रॉबने सांगितलं की, त्याने आणि त्याच्या पत्नीने मुलांना सोशल मीडिया आणि प्रसिद्धीपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तो आपल्या कुटुंबाबद्दल फारसं बोलणंही टाळतो.
‘आज पूर्वीपेक्षा जास्त कमावतो’
आपल्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलताना रॉबने सांगितलं की, आज तो पूर्वीपेक्षा खूप जास्त कमाई करत आहे. रॉबने सांगितलं की, “मी खूप भाग्यवान आहे, कारण मला काम शोधण्यासाठी फार प्रयत्न करावे लागत नाहीत. मला अनेकदा काम मिळतं आणि त्यापैकी काही कामांसाठी चांगले पैसेही मिळतात.” सध्या तो फेस्टिव्हल आणि इव्हेंट्ससाठी आर्ट इन्स्टॉलेशनही करतो. त्यामुळे कमाईचा आणखी एक मार्ग त्याच्याकडे आहे. चॅनेलबरोबर करार असल्यामुळे पूर्वी त्याला बाहेरच्या ब्रँड्ससाठी काम करता येत नव्हतं. आता तो कोणत्याही चॅनेलशी जोडलेला नसल्याने काम करण्याचं स्वातंत्र्य अधिक मिळालं असून, पूर्वीपेक्षा जास्त कमाई करत असल्याचं रॉबने सांगितलं.
