कोरिओग्राफर सरोज खान यांचे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांनी वयाच्या ७१ वर्षी जगाचा निरोप घेतला. सरोज खान यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करीत आहेत. बॉलिवूडची डान्सिंग क्विन म्हणून ओखळल्या जाणाऱ्या माधुरी दिक्षितने देखील सरोज खान यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले आहे.

माधुरी आणि सरोज खान यांच्यामध्ये एक वेगळच नाते होते. सरोज खान यांनी माधुरीला बॉलिवूड डान्स शिकवला होता. माधुरीने पीटीआयशी बोलताना ‘सरोज खान यांना माझी समस्या माहित होती. मी एक क्लासिकल डान्सर होते. मी कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले होते. त्यामुळे मला बॉलिवूड डान्स फारसा येत नव्हता. सरोज यांनी मला बॉलिवूड डान्स शिकण्याचा सल्ला दिला होता. मी बॉलिवूड डान्सिंग त्यांच्याकडूनच शिकले’ असे म्हटले.

तसेच माधुरीने ट्विट करत सरोज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘माझी चांगली मैत्रीण आणि गुरु सरोज खान यांच्या जाण्याने मला धक्काच बसला आहे. मला सतत त्यांची आठवण येईल’ असे म्हणत तिने ट्विटमध्ये श्रद्धांजली वाहिली आहे.

सरोज खान यांनी माधुरीच्या चित्रपटांमधील अनेक गाणी कोरिओग्राफ केली. त्यामध्ये ‘तेजाब’, ‘बेटा’, ‘सैलाब’, ‘देवदास’, ‘कलंक’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. १९७४ मध्ये ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाद्वारे त्यांना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यांनी आतापर्यंत २ हजारांपेक्षा अधिक गाणी कोरिओग्राफ केली. तसेच सरोज खान यांना आतापर्यंत ३ वेळा राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आले आहे.

तसेच मिस्टर इंडिया, चांदनी, नगिना, डर, बाजीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, ताल, फिजा, स्वदेस, तनू वेड्स मनू, एजंट विनोद, रावडी राठोड, मणिकर्णिका, या आणि अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे.