मुंबई : ‘कौन बनेगा करोडपती’ या हिंदीतील लोकप्रिय प्रश्नमंजूषा कार्यक्रमाची मराठी आवृत्ती असलेल्या ‘कोण होणार करोडपती’ या शोच्या आठव्या पर्वाला लवकरच सुरूवात होणार आहे. अभिनेते सचिन खेडेकर, स्वप्नील जोशी आणि दिग्दर्शक नागराज मंजूळे यांच्यानंतर ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची धुरा प्रसिध्द अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने घेतली आहे. ‘कलाकार म्हणून प्रत्येकवेळी वेगवेगळ्या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांसमोर येण्याची संधी मिळते, पण पहिल्यांदाच माधुरी दीक्षित म्हणून ‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमात लोकांबरोबर संवाद साधण्याची संधी मिळाली आहे’, अशा शब्दांत हा कार्यक्रम स्वीकारण्यामागचे कारण तिने स्पष्ट केले.

‘कोण होणार करोडपती’ या प्रश्नमंजूषा कार्यक्रमाची सुरुवात पहिल्यांदा २०१३ मध्ये ई टीव्ही मराठी वाहिनीवर झाली होती, तेव्हा पहिल्यांदा या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अभिनेते सचिन खेडेकर यांनी केले होते. खेडेकर यांनीच आत्तापर्यंत बर्‍यापैकी या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची धुरा सांभाळली. त्यानंतर अभिनेता स्वप्नील जोशी आणि दिग्दर्शक नागराज मंजूळे यांनी एकेका पर्वाचे सूत्रसंचलन केले होते. मात्र, यंदा आठव्या पर्वासाठी लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्याकडे कार्यक्रमाची सूत्रे देत सोनी मराठी वाहिनीने प्रेक्षकांना सुखद धक्का दिला आहे.

हिंदी चित्रपटातून आघाडीची अभिनेत्री म्हणून कित्येक दशके गाजवल्यानंतर माधुरीने २००२ साली दूरचित्रवाहिनीवर सोनी एंटरटेन्मेट वाहिनीसाठीच ‘कही ना कही कोई है’ या शोचे सूत्रसंचलन केले होते. आता २४ वर्षांनी पुन्हा एकदा ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमातून ती सूत्रसंचलक म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

‘चित्रपटांमधून काम करत असताना एक व्यक्तिरेखा म्हणून आपण प्रेक्षकांसमोर असतो. ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात मी स्वत: असणार आहे. माधुरी दीक्षित म्हणून माझ्यासमोर बसलेल्या स्पर्धकांशी मी संवाद साधणार आहे. त्यामुळे अभिनयाव्यतिरिक्त माझे व्यक्तिमत्त्व, माझी उत्स्फूर्त बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळेल’ असे वाटत असल्याने हा कार्यक्रम स्वीकारल्याचे माधुरी दीक्षितने सांगितले. ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम माझ्यासाठी केवळ प्रश्नोत्तरांपुरता मर्यादित नाही. तर या कार्यक्रमातून प्रत्येक स्पर्धकाची कथा, त्यांची भावनिक बाजू अनुभवण्याबरोबरच संवाद साधता साधता मिळणारे हास्याचे क्षण, अचानक येणारे आश्चर्याचे प्रसंग हे अकृत्रिम वातावरण असणार आहे. मला नेहमीच लोकांबरोबर संवाद साधायला आवडते, त्यामुळे कार्यक्रमात सहभागी होणारे स्पर्धक आणि प्रेक्षकांबरोबर खराखुरा संवाद साधण्याचा हा अनुभव मला अधिक उत्साहित करतो, असेही तिने स्पष्ट केले. सध्या या कार्यक्रमासाठी नोंदणी सुरू झाली असून लवकरच सोनी मराठी आणि सोनी लिव्हवरून हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.