बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितनं अभिनय क्षेत्रात पुन्हा दमदार एंट्री करत सर्वांची मनं जिंकली आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त माधुरी दीक्षित ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी देखील काम करणार आहे. तिची बहुचर्चित वेब सीरिज ‘द फेम गेम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्यात तिच्यासोबत अभिनेता मानव कौलची मुख्य भूमिका आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माधुरी दीक्षितनं तिच्या खासगी आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत.
‘द क्विंट’शी बोलताना माधुरी दीक्षितनं ती अमेरिकेत राहत असतानाचे काही किस्से शेअर केले. माधुरी म्हणाली, ‘मी जेव्हा डेनवर शहरात राहत होते त्यावेळी तिथे स्थायिक असलेले अनेक भारतीय चाहते माझ्या घराच्या आसपास फेऱ्या मारायचे जेणेकरून माझी एक झलक पाहायला मिळावी. माझ्या शेजाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर ते मला म्हणाले कोणीतरी तुमच्या घराच्या आसपास फिरताना दिसत आहे आणि तुमच्यावर नजर ठेवून आहे असं वाटतंय. तुम्ही पोलिसांना बोलवू इच्छिता का?’




माधुरी पुढे म्हणाली, ‘मी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मग त्यांना सांगितलं की मी भारतातील प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक आहे. त्यांना ही गोष्ट माहीत नव्हतं त्यामुळे ते देखील चकीत झाले. एवढंच नाही तर माझ्या मुलांना अमेरिकेत असताना कधीच सेलिब्रेटींसारखं वागवलं नव्हतं पण जेव्हा ते भारतात आले तेव्हा इथलं वातावरण त्यांच्यासाठी खूपच वेगळं होतं.’
माधुरी दीक्षितच्या आगामी वेब सीरिजबद्दल बोलायचं तर या वेब सीरिजमध्ये ती अभिनेता मानव कौलसोबत दिसणार आहे. माधुरीसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल सांगताना मानव म्हणाला, ‘मी जेव्हा पहिल्या दिवशी शूटिंगसाठी जात होतो. त्यावेळी मला तिचे सर्व चित्रपट आणि गाणी आठवत होती. माधुरीसोबत रोमँटिक सीन शूट करायच्या विचाराने मला नर्व्हस वाटत होतं.’ मानव कौल आणि माधुरी दीक्षित यांच्या व्यतिरिक्त ‘द फेम गेम’ या वेब सीरिजमध्ये संजय कपूर आणि सुहासिनी मुळे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ही वेब सीरिज येत्या २५ फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.