माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपलपैकी एक आहेत. अशातच त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नातील फोटोंचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी यावेळी लग्नातील आठवणी सांगितल्या आहेत. यामधून त्यांचे व माधुरीचे काही न पाहिलेले पारंपरिक लूकमधील फोटो पाहायला मिळत आहेत.

श्रीराम नेनेंची माधुरीसाठी खास पोस्ट

श्रीराम नेने यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत मोठी कॅप्शन दिली आह. यामधून त्यांनी म्हटलं की, “एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याचं वचन दिल्यानंतर दोन दिवसांनी, आम्ही कुटुंबीयांच्या उपस्थितीत, पारंपरिक विधी, आशीर्वाद आणि हिंदू विवाहातील पवित्र सप्तपदीसह आमचं प्रेम साजरं केलं. १७ ऑक्टोबर १९९९ रोजी आम्ही आयुष्याच्या प्रत्येक सुख-दुःखात, प्रत्येक आव्हानात एकमेकांच्या सोबतीने चालण्याचं वचन दिलं. आज २७ वर्षांनंतर, त्या सात पावलांनी आम्हाला अशा टप्प्यावर आणून ठेवलं आहे, ज्याची आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. प्रेमात पडलेल्या दोन व्यक्तींपासून ते एका सुंदर कुटुंबापर्यंत आणि एकत्र पाहिलेल्या स्वप्नांच्या या प्रवासापर्यंत… हा संपूर्ण प्रवास खूप सुंदर राहिला आहे.”

डॉ.नेने पुढे यामधून पुढे म्हणाले, “माधुरी, आजही तूच माझी सर्वांत आवडती व्यक्ती, माझी जिवलग मैत्रीण आणि माझ्या आयुष्यातील सर्वांत सुंदर गोष्ट आहेस. असंच एकमेकांच्या सोबतीने पुढे जात राहू”.

दोन दिवसांपूर्वीच श्रीराम नेने यांनी त्यांच्या साखरपुड्यातील काही खास फोटो शेअर केले होते. श्रीराम नेने व माधुरी एकमेकांबरोबरचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असतात. अलीकडेच दोघांनी फराह खानला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलं. त्यावेळी त्यांनी लग्नाआधी दोघांनी फक्त तीन महिने एकमेकांना डेट केलं होतं असं म्हटलेलं तर श्रीराम नेनेंनी त्यांच्या रिसेप्शनला अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी आले होते, मात्र ते अमिताभ बच्चन यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही ओळखत नव्हते असं सांगितलं.

दरम्यान, सध्या माधुरी दीक्षित ‘सोनी मराठी’वरील ‘कोण होणार करोडपती’ या शोचं सूत्रसंचालन करत आहे. सध्या तिच्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांचाही खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सोशल मीडियावरुन पाहायला मिळत आहे. यामध्ये ती स्पर्धक तसेच चित्रपटांच्या प्रमोशनसाठी आलेल्या सेलिब्रिटींशी संवाद साधत असतानाचे व्हिडीओ, त्यातील किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.