कलाकारांना त्यांच्या कामामुळे लोकप्रियता अनुभवायला मिळते. पण याचबरोबर अनेकदा त्यांना ट्रोलिंग, हॅकिंग सारख्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. विशेषकरुन अभिनेत्रींबरोबर बऱ्याचदा असे प्रकार घडल्याचं आढळलं आहे.अशातच आता अभिनेत्री आणि नर्तिका माधुरी पवारनेसुद्धा धक्कादायक अनुभव सांगात मोठा खुलासा केला आहे. तिला जाणीवपूर्वक त्रास दिला गेला आणि तिचा फोन नंबर हॅक केला असं म्हटलं आहे.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या फोटोंखाली अश्लील कमेंट्स, ट्रोलिंग, कॉल बॉम्बींग (जाणीवपूर्वक सातत्याने कॉल करणे) असे अनेक प्रकार जाणीवपूर्वक घडवून आणले गेले आणि तिला त्रास देण्यात आला असा दावा केला आहे. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल सांगताना तिला काही रीलमुळे लोकप्रियता मिळाली नाहीये तर अनेक वर्षे मेहनत करुन कलेच्या जोरावर ही लोकप्रियता मिळवल्याचंही म्हटलं आहे.

माधुरीने सांगितला धक्कादायक प्रकार

मुलाखतीत माधुरी पवार म्हणाली, “याची सुरुवात आता झालेली नाहीये. हा विषय आहे तीन-साडे तीन वर्षांपासून सुरू झालेला. सोशल मीडियावर मी आधीपासूनच सक्रीय आहे. त्यामुळे मी याबद्दल काही बोलले नाही पण मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात माझं खूप मोठं फॅन पेज होतं ते हॅक करण्यात आलं. मी दुसरं अकाउंट सुरू केलं तिथेही लोकांनी मला पाठिंबा दिला पण ती व्यक्ती काही तिथे थांबली नाही आणि कॉल बॉम्बिंग हा प्रकार सुरू झाला. मला आधी हा प्रकारच माहीत नव्हता. तो समजून घ्यायलाच मला तीन महिन गेले.ऑगस्टपासून दही हंडी, नवरात्र असे सगळे सण सुरू होतात. कुठल्याही कलाकारासाठी आर्थिकदृष्ट्या हा खूप चांगला काळ असतो. वर्षभर आम्ही मालिका, चित्रपटात काम करतो आणि सण वारांच्या निमित्ताने कार्यक्रम असतात.वर्षभर काम करुन मिळवलेले पैसे आणि या कार्यक्रमांतून मिळालेले पैसे यात खूप फरक असतो.२०० दिवस काम केल्यानंतर जेवढे पैसे मिळतात ते इकडे तुम्ही तीस दिवसातच तेवढ्या दिवसाचे पैसे भरून काढू शकतात.”

माधुरी पुढे म्हणाली, “कारण कलाकारांना आज काम आहे तर उद्या नसेल. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं असतं. त्याचवेळी नको नको त्या कमेंट्स येणं सूरू झालं आम्ही अकाउंट चेक केलं की ते फेक अकाउंट असल्याचं समजायचं मग तक्रार कुठे करणार असा प्रश्नही निर्माण झाला. पण त्यावर इतक्या अश्लील कमेंट्स होत्या की त्या मी सांगूही शकत नाही. मी त्याकडे दुर्लक्ष केलं.” पुढे तिने कॉल बॉम्बिंग या प्रकाराबद्दल सांगितलं आहे. ती म्हणाली, “हा प्रकार असा असतो की एका मिनिटात तुम्हाला चार-पाच कॉल्स येतात. तुमचा फोन दिवस रात्र वाजत असतो.तुम्ही जेव्हा फोन उचलता तेव्हा वेगळ्याच भाषेत आवाज ऐकू येतो. मला कर्नाटकमधून फोन यायचे. मला वाटलं एखादा व्हिडीओ व्हायरल झाला अलसे त्या परिसरात म्हणून होत असेल पण दिवसाला किती फोन येत असतील दहा-वीस येतील ना पण मला झोपही लागत नव्हती कारण कलाकार असल्याने अनोळखी फोन कॉल्सला मी प्रतिसाद द्यायचे पण वेगळीच भाषेच आणि वेगळेच लोक असायचे. मग करायचं काय असा प्रश्न निर्माण झाला. गेल्या वर्षी मी फक्त एकच इव्हेंट केला. मला सुपारी क्वीन म्हटलं जातं पण तरी मी एकच कार्यक्रम केला. मला कळतंच नव्हतं की काय घडतंय मग मी सायबरची मदत घेतली.”

“मी दुबईला गेले होते. नऊवारी नेसले होते. तो लूक व्हायरल झाला होता.बऱ्याच जणांनी कौतुकही केला. पण एका तशाच व्हिडीओवर खूप घाणेरड्या भाषेत लिहिलं होतं. विकीपिडायवरही माझं पेज होतं. ज्यावर माझी माहिती होती तेही आज गायब झालंय. आताही दहा दिवसांपूर्वी माझ्या पोस्टवर अश्लील कमेंट्स सुरू झाल्या आहेत. तिला पुढे हे सगळं करण्यामागे कोणाचा हात आहे माहित आहे का असं विचारल्यानंतर ती म्हणाली, माहीत आहे पण, जेव्हा कायदा ही गोष्ट बाहेर आणेल आणि कायदा त्याला पकडून देईन तेव्हा लोकांना कळेल.”

माधुरीने पुढे सांगितलं की हे तीन वर्षांपासून घडत असून ती याबद्दल बोलली नाही पण आता प्रकरण हाताबाहेर गेल्याने ती भाष्य करत असून हे गरजेचं असल्याचं सांगितलं आहे. मात्र यामुळे जे तिला पाठिंबा देणारे आहेत त्यांचंही मत परिवर्नत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं जात आहे.