अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरवला गेलेला ‘मॅजिक’ हा चित्रपट १ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या आयुष्यात घडणाऱ्या उलथापालथींची एक रंजक गोष्ट ‘मॅजिक’ चित्रपटात दाखविण्यात आली आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर पद्मश्री अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला.
‘तुतरी व्हेंचर्स’ या निर्मिती संस्थेच्या राजू सत्यम यांनी याआधी बॉलीवूड, तमिळ चित्रपटांची निर्मिती केली असून ‘मॅजिक’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी सिनेसृष्टीत निर्माता म्हणून पाऊल टाकले आहे. रवींद्र विजया करमरकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. योगेश विनायक जोशी, रवींद्र विजया करमरकर यांनी कथालेखन, तर योगेश विनायक जोशी, अभिषेक देशमुख यांनी पटकथा आणि संवाद लेखन केले आहे. केदार फडके यांनी छायांकन, देवेंद्र भोमे, चिनार-महेश यांनी संगीत, महेश कुडाळकर यांनी कला दिग्दर्शकाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी एन्काउंटर स्पेशालिस्टच्या प्रमुख भूमिकेत असून, सिद्धिरूपा करमरकर, जुई भागवत, प्रियांका पालकर, मयूर खांडगे, अभिजीत झुंजारराव, रूपा मांगले, नितीन भजन, गुरुराज कुलकर्णी, योगेश केळकर, प्रदीप डोईफोडे, रसिकराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘मॅजिक’ चित्रपटाच्या टीझरमध्ये पोलीस ठाण्यात आपल्याच विचारात गर्क असलेला अभिनेता जितेंद्र जोशी याचा चेहरा आपल्याला दिसतो. त्यानंतर त्याच्यासमोर एका मुलीचा अस्पष्ट चेहरा दिसू लागतो. त्या मुलीकडे पाहताना त्याच्या मनातली घालमेल, अस्वस्थ भावना चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतात. पार्श्वसंगीत म्हणून वापर केलेली घड्याळाची टिकटिक अंगावर काटा आणते. गुंतवून ठेवणाऱ्या या टीझरमुळे चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. उत्तम कलाकार, रंजक कथानक असलेला ‘मॅजिक’ मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी नव्या वर्षाच्या प्रथमदिनाची वाट पाहावी लागणार आहे.
