Roopa Ganguly Life Story: काही कलाकारांना व्यावसायिक आयुष्यात प्रचंड यश मिळतं, पण वैयक्तिक आयुष्यात मात्र वाट्याला संघर्ष येतो. १९८८ सालच्या ‘महाभारत’ या प्रचंड गाजलेल्या ऐतिहासिक मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या बाबतीतही असंच घडलं. ही अभिनेत्री म्हणजे रूपा गांगुली. रूपा यांचं करिअर खूप यशस्वी राहिलं. पण खासगी आयुष्य चढ-उतारांनी भरलेलं राहिलं. आता ३६ वर्षांनी रूपा गांगुली कुठे आहेत, काय करतात, जाणून घेऊयात.

रूपा गांगुली यांचा जन्म पश्चिम बंगालमधील कल्याणी येथे झाला. त्यांनी १९८४ मध्ये ‘पार’ चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. ‘प्रतीक’, ‘तूफान’, ‘प्यार के देवता’, ‘कमला की मौत’, ‘अग्नी कन्या’ यांसारख्या अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले. पण त्यांना खरी ओळख ‘महाभारत’मुळे मिळाली. ‘महाभारत’मध्ये त्यांनी द्रौपदी ही भूमिका केली होती.

रूपा गांगुलींनी का सोडलेला अभिनय?

२००९ मध्ये ‘सच का सामना’ या शोमध्ये रूपाने आपल्या आयुष्यातील अनेक गुपितं सांगितली होती. रूपाने १९९२ मध्ये ध्रुवा मुखर्जीशी लग्न केलें. त्यांना आकाश नावाचा मुलगा आहे. १५ वर्षांच्या संसारानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. रूपा गांगुलींनी सांगितले होतं की, पतीच्या दबावामुळे त्यांनी अभिनय सोडला होता. पती रूपाला पैसे देत नसत, त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी वारंवार पैसे मागावे लागायचे, यामुळे त्या खूप नाराज होत्या.

पुन्हा प्रेम आणि तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न

घटस्फोटानंतर रूपा गांगुली पुन्हा प्रेमात पडल्या. बंगाली गायक दिव्येंदू मुखर्जीबरोबर त्या काही वर्षे नात्यात राहिल्या. पण हे नातं नंतर टिकलं नाही. आयुष्यातील नैराश्यामुळे रूपा गांगुलींनी तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असा खुलासा स्वतः केला होता. आधीच्या दोन अनुभवांमुळे त्यांच्या मनात पुरुषांविषयी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती.

रूपा गांगुलींना मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार

रूपा गांगुली यांना अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि दोन BFJA पुरस्कार मिळाले आहेत. २०१६ मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजप महिला मोर्चाचे अध्यक्षपदही भूषवले आहे. त्यांनी ‘पश्चिम बंगाल मोशन पिक्चर आर्टिस्ट्स फोरम’मध्ये महासचिव आणि उपाध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे.

‘महाभारत’मुळे ओळखल्या जातात रूपा गांगुली

रूपा गांगुली यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास, महाभारतातील द्रौपदीच्या भूमिकेने त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. खासकरून तो ‘वस्त्र-हरण’चा प्रसंग आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या भूमिकेसाठी त्यांना ‘स्मिता पाटील मेमोरियल पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले होते.

रूपा गांगुली सध्या कोलकाता येथे राहतात आणि तिथूनच त्यांचे सामाजिक आणि चित्रपट क्षेत्रातील काम सुरू आहे. त्या हिंदी सिनेसृष्टीत सक्रिय नसल्या तरी बंगाली चित्रपटांमध्ये काम करत आहेत.