Director Shares Post On Monalisa Marriage : २०२५ च्या महाकुंभमेळ्यात मोनालिसा नावाची रुद्राक्ष विकणारी मुलगी खूप चर्चेत आली होती. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर तिला एका सिनेमाची ऑफरसुद्धा आली. घारे डोळे आणि तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर ती सगळीकडे खूपच चर्चेत आली होती. अशातच ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे तिचे नुकतंच झालेलं लग्न.
मोनालिसाने काल (११ मार्च) रोजी केरळमध्ये तिच्या मुस्लीम प्रियकर फरमान खान याच्याशी लग्न केले. मोनालिसाने पोलिस संरक्षणात केरळमध्ये आधी सिव्हिल मॅरेज केले आणि त्यानंतर मंदिरातही विवाह केला असल्याचे सांगितले जात आहे. मोनालिसाच्या लग्नामुळे तिला इंडस्ट्रीत आणणारे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनाही मोठा धक्का बसला आहे.
दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली आहे, त्याचबरोबर त्यांनी मोनालिसावर काही गंभीर आरोपही केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की, मोनालिसा ही ‘लव्ह जिहाद’ची बळी ठरली आहे.
हे लव्ह जिहाद आहे : दिग्दर्शक सनोज मिश्रा यांचा दावा
सनोज मिश्रा यांनी इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे, “हे लव्ह जिहाद आहे आणि हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस आहे. मोनालिसा आज पुन्हा चर्चेत आहे. जंगलात राहणारी ही गरीब मुलगी महाकुंभमध्ये व्हायरल झाल्यावर पळून आपल्या गावी (डेरा महेश्वर) गेली होती. तिचे नैसर्गिक सौंदर्य मला आवडलं होतं, म्हणून मी तिला अभिनेत्री बनवण्याची घोषणा केली. यानंतर संपूर्ण जगाने तिचे स्वागत केले, पण हे माझ्या विरोधकांना (वसीम रिझवी आणि प्रसिद्धीसाठी काहीही करणाऱ्यांना) आवडले नाही. त्यांनी माझ्यावर खोटे आरोप करून मला तुरुंगात पाठवले.”
मोनालिसाचं आयुष्य इतकं सोपं नव्हतं : सनोज मिश्रा
त्यांनी पुढे लिहिले की, “मी तुरुंगात असताना चित्रपटाची कथा लिहिली. अनेक जण म्हणत होते की सनोज मिश्रा कधीच चित्रपट बनवू शकणार नाही. पण मी चित्रपट पूर्ण करून त्यांना उत्तर दिले. मोनालिसाचं आयुष्य इतकं सोपं नव्हतं. तिची खरी आई वेगळी राहत होती आणि ती गरिबीत जगत होती. अनेकदा मोनालिसाने मला तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी सांगितल्या होत्या. एक दिवस तिने आईकडे परत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण तिच्या वैयक्तिक आयुष्यात जास्त हस्तक्षेप करणे मला योग्य वाटले नाही.”
सनोज मिश्रा यांनी मोनालिसाबद्दल शेअर केलेली पोस्ट
“मोनालिसाला आज तिचे हे पाऊल ‘बंड’ वाटत असेल, पण हा ‘लव्ह जिहाद’ आहे आणि ती याची बळी ठरली आहे”. पुढे त्यांनी असा आरोप केला की, मोनालिसाला शिकवण्यासाठी त्यांनी ठेवलेला शिक्षक नंतर तिचा मॅनेजर बनला आणि त्यानेच तिला चुकीच्या लोकांच्या संपर्कात आणले. त्यानेच तिला आणि समाजाला माझ्याविरुद्ध भडकवले होते.
दरम्यान, सनोज मिश्रा यांच्या या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, मोनालिसाच्या लग्नाच्या निर्णयामुळे ते खूप दुखावले असल्याचे या पोस्टमधून तरी दिसत आहे. सनोज मिश्रा यांनीच मोनालिसाला त्यांच्या चित्रपट ‘द डायरी ऑफ मणिपूर’मधून संधी दिली होती. तसेच तिच्या शिक्षण आणि अभिनयासाठीही त्यांनी प्रशिक्षण दिले होते.
