Mahakumbh Viral Girl Monalisa Bhosle Interfaith Marriage Photos: २०२५ मध्ये उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यादरम्यान रुद्राक्ष माळा विकणाऱ्या मोनालिसा भोसले नावाच्या एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तिच्या डोळ्यांनी लाखो लोकांचे लक्ष वेधून घेतले होते आणि सोशल मीडियावर ती खूप व्हायरल झाली होती. नंतर तिला चित्रपटाची ऑफरही मिळाली होती. हिच मोनालिसा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मोनालिसाने आंतरधर्मीय लग्न केलं आहे.
मोनालिसा भोसलेने केरळमध्ये तिच्या मुस्लीम प्रियकराशी लग्न केलं. मूळची मध्य प्रदेशातील इंदूरची असलेली मोनालिसा हिच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. मोनालिसा केरळला गेली आणि तिथल्या प्रशासनाकडे संरक्षण मागत तिने लग्न केलं. तिने फरमान खान या मुस्लीम तरुणाशी लग्न केलंय. फरमान मुळचा महाराष्ट्रातील असून तो अभिनेता व मॉडेल आहे.
आंतरधर्मीय लग्नाला कुटुंबीयांचा विरोध
मोनालिसा व फरमान खानच्या नात्याला व लग्नाला तिच्या कुटुंबीयांचा विरोध होता. पोलिसांनी यासंदर्भात चौकशी केली आणि सांगितलं की मोनालिसा सज्ञान आहे आणि त्यामुळे तिला कोणाशी लग्न करायचं, हा निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे.
मंदिरात झालं लग्न
बुधवारी, ११ मार्च रोजी तिरुवनंतपुरममधील अरुमानूर येथील श्री नयनार देव मंदिरात या जोडप्याचं लग्न झालं. या लग्नाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

मोनालिसा आणि फरमान यांची प्रेम कहाणी
मोनालिसा आणि फरमान खान यांची दीड वर्षापूर्वी फेसबुकवर ओळख झाली. मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी या नात्याला आणि लग्नाला खूप विरोध केला. मोनालिसाचे वडील जयसिंग भोसले यांनी तिच्यावर त्यांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न करण्यासाठी दबावही टाकला होता. पण मोनालिसा फरमानशी लग्न करण्याबद्दल ठाम होती. त्यामुळे ते केरळला गेले आणि तिथे लग्न केलं.
दरम्यान, मोनालिसा मल्याळम सिनेमात पदार्पण करणार आहे. ती ‘नागम्मा’ सिनेमाचे शूटिंग केरळमधील पूवर याठिकाणी करत होती. पण तिच्या वडिलांनी तिला जबरदस्ती गावी नेण्याचा प्रयत्न केला. यानंतर घाबरलेल्या मोनालिसाने फरमान खानशी तिरुवनंतपुरममधील थंपानूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संरक्षण मागितलं. नंतर त्यांनी मंदिरात लग्न केलं.
